विस्तीर्ण समुद्र किनारी,
फिरत फिरत निघाले,
वाळूत चालताना ठसे,
पावलांचे उमटलेले, –!!!
दूर क्षितिजी सूर्यबिंब,
घाईत होते चालले,
रंगांची आरास पाहून,
अचंबित की झाले,–!!!
ढगांमागून निघाला,
संधिप्रकाश आता,
दिसू लागला धरणीवर,
पखरुन घातलेला, –!!!
याच ढगांवर स्वार होऊन,
निघाला सोन्याचा गोळा, आभाळाला सप्तरंगी,
आज साज चढवलेला,–!!!
किती रंगांची रासक्रीडा,
गगनी होती चाललेली,
चकित होऊनी धरा,
कशी रंगात रंगलेली,–!!!
उन म्हणावे तर थोडे,
काढता पाय घेतलेले,
तमाने पुढे येऊन,
पाऊल आत टाकले, –!!!
चांदण्यांचे पुंज,
दिसू लागले जागोजागी,
आकाशाचा निळा गालिचा,
भरून गेला पदोपदी,–!!!
लांबवर दूरस्थ किनारा,
दिसत होता तटस्थ उभा,
केव्हाच सारी उडून गेली,
येथील पक्ष्यांची सभा, –!!!
पार लांबवर उंच उंच,—
बुडू लागला सोन्याचा गोळा, समुद्रात तो, का समुद्र त्यात,
बघूनही कळेना मला,–!!?
लाटेवर लाट वरचढ ठरुनी,
निघाली कशी पुढे ,
निरोप द्याया सज्ज,
नाराज वातावरण केवढे,–!!!
गगनी उगवला तोच आपला, लाडका चंदामामा,
सारे विसरून गेले प्रकाशा,
अंधाराची त्याला आभा,–!!!
पांढरी,तांबडी,केशरी,करडी,
जांभळी राखाडी, सोनेरी,
सूर्यबाप्पाची मिरवणूक निघाली,
सप्तरंगी मस्त रथांतुनी,–!!!
स्तिमित होऊनी धरा,
बघत राहिली किती,
त्या रंगांची रासक्रीडा,–!!!
सूर्यदेव मध्ये उभे तसे,
गोकुळी खेळे हरी,जसा,
भोवती नाचताना गोपिका,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply