नवीन लेखन...

‘कुटुंब रंगलंय काव्यात’ चे विसूभाऊ बापट

जन्म. १ एप्रिल

मराठी रंगभूमीवर इतिहास घडवणाऱ्या कलाकृतींपैकी एक म्हणजे विसुभाऊ बापट यांचं ‘कुटुंब रंगलंय काव्यात’. ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या कार्यक्रमाला जानेवारी २०२२ रोजी ४० वर्षे पूर्ण झाली. काव्याची गंगा अविरतपणे रसिकांसमोर घेऊन येणाऱ्या विसूभाऊ बापट यांनी गेली ४० वर्ष न थकता, न कंटाळता आणि सतत काहीतरी नवं सादर करण्याचा ध्यास मनात घेत या कार्यक्रमाने अनेक कुटुंबांना निखळ आनंद दिला. जुने दिग्गज कवी आणि नवोदित कवींच्या कविता सादर करण्यासाठी किंबहुना प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी विसुभाऊंनी हातातली नोकरीही सोडली आणि हा आगळावेगळा कवितेचा एकपात्री प्रयोग यशस्वी करुन दाखवला. मुंबई-महाराष्ट्रासह विदेशातही त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.

मराठी भाषा आणि मराठी कविता जगविण्याचा कसोशिने प्रयत्न करणारे प्रा.विसूभाऊ बापटांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. ”ज्ञानेश्वरांची भाषा आहे… ती पेलणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे.” असे प्रत्येक कार्यक्रमात प्रा.विसूभाऊ बापट अभिमानाने सांगतात. महाराष्ट्रातील शेकडो कवींच्या हस्ताक्षरात त्यांच्या हजारो दुर्मिळ कविता प्रा.बापटांनी लिहून घेतलेल्या आहेत. ह्या कवितांतील अनेक बारकावे, त्यातील सौंदर्य, उत्कट भावना आणि कवितेमधील शब्दांची ताकद याचे रंगतदारपणे विवेचन प्रा.बापट ‘कुटुंब रंगलय काव्यात’ ह्या कार्यक्रमातून सादर करतात. त्याला तोड नाही.

प्रा.बापट हे वाणिज्य शाखेचे प्राध्यापक होते. परंतु केवळ मराठी भाषेच्या अस्मितेसाठी त्यांनी कवितेचा मार्ग स्वीकारला. मराठी भाषेतील मूळ काव्यरचनांचा अभ्यास त्यांनी केलाय. तसेच मूळ रचनाकारांचा शोध घेतलाय. इतकेच नव्हे तर मराठी साहित्य आणि साहित्यकारांना तसेच रसिकांना माहीत नसलेल्या हजारो कविता प्रा.बापटांनी मुखोद्गत केल्या आहेत. विविध वयोगटातील रसिक प्रेक्षकांना आनंद मिळेल याचे भान ठेवून प्रा.बापटांनी ह्या दुर्मिळ कवितांवर स्वरसाज चढविला. तदनंतर त्यांनी ‘कुटुंब रंगलय काव्यात’ ह्या एकपात्री कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषेतील कविता जिवंत ठेवण्याचा विडा उचलला. जो आजही कायम आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुलुंड विभागाने दहावी शालांत परीक्षेत यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळयात प्रा.बापटांना निमंत्रित केले होते. इंग्रजी माध्यमातून दहावी पास झालेल्या तसेच मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेची ताकद कळावी म्हणून मनसेचे सरचिटणीस शिशिर शिंदे यांनी प्रा.बापटांचा ‘कुटुंब रंगलय काव्यात’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. राजकारणात असले तरीदेखील साहित्यावर अमाप प्रेम करणारे शिशिर शिंदे यांची ही अभिनव कल्पना बहुसंख्य पालकांना व शिक्षकांना आवडली. परंतु दुर्दैवाने आजच्या मराठी भाषेच्या पीछेहाटीत मराठी माणसांचा सहभाग जास्त आहे. हे आवर्जून प्रा.बापटांना वारंवार सांगावे लागत होते. अभिजात मराठी कविता शाळेतील विद्यार्थ्यांना ऐकविण्याऐवजी त्या राजकीय पुढाऱ्यांसमोर सादर कराव्या लागतात. याचे कारण दुर्दैवाने महाराष्ट्रातील शाळांतून हा कार्यक्रम सादर व्हावा असे कोणत्याही मराठी शाळेच्या संस्था चालकांना वाटत नाहीय. मात्र केवळ मनोरंजनासाठी राजकीय अडाणी नेते प्रा.बापटांना आमंत्रित करतात. विशेष म्हणजे मराठी भाषेच्या अस्मितेसाठी कोणतेही मानधन न घेता ‘कुटुंब रंगलय काव्यात’ शाळांमधून सादर करण्याची इच्छा प्रा.बापट जाहीरपणे प्रकट करतात. त्यांचे हे विनंतीवजा इच्छा प्रकटीकरण ही मराठी भाषेची आणि मराठी जणांची खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे असे आम्हांस वाटते.

बहिणाबाईंच्या कवितांवर चार तास कार्यक्रम होऊ शकतो. बालकवितांमध्ये १२ प्रकार आहेत. मराठी भाषेतील स्वर, व्यंजने, अनुस्वार आदींचे सौंदर्य कवितेच्या माध्यमातून पहाताना मिळणारा आनंद मराठीजनांनी उपभोगावा हे प्रा. बापटांना कळकळीने सांगावे लागत आहे. याहीपेक्षा आणखीन दुर्दैव ते कोणते? मी मराठी हे आज धेड मजुरी हिंदीत किंवा इंग्रजीत सांगण्याची पाळी मराठी माणसांवर का आली? ह्या प्रश्नांची समर्पक उत्तरे प्रा. विसूभाऊ बापट त्यांच्या काव्यांतून देतात. तेव्हा मराठी भाषा लोप पावत चाललीय ही खंत प्रा.बापटांकडून अभिव्यक्त होताना दिसते. गेली अनेक वर्षे मराठी कवितेस समर्पित झालेले प्रा.बापटांचे जीवन मराठी भाषा टिकविण्यासाठी कार्यरत आहे.

२०११ मध्ये दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर विसूभाऊ बापट यांच्या मराठी कवितांवर आधारित ‘शर्यत रे आपुली’ हा रिॲ‍लिटी शो केला होता. विसूभाऊ बापट यांच्या पत्नी उमा बापट यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली होती, दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेत्री आणि निर्मात्या स्मिता तळवळकर यांनी सांभाळली होती.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..