ग्रामिण, कृषी संस्कृतीतील स्त्री-गीतांत आढळणारा ‘विठू’, ज्यांचं नांव-गांव कोणालाही ठाऊक नाही अशा स्त्रीयांच्या भावविश्र्वातलं विठ्ठलरूप ग्रामिण बोलींत हजारो अविट ‘वव्या’तून व्यक्त झालं आहे..परपंचात परस्वाधीन असलेल्या बायकांचं नशिब काही पुरुषांएवढं थोर नसतं, की उठले की चालले टाळ कुटत. . पांडुरंगाची ओढ त्या माऊल्यांना काही कमी नसते परंतू घरंच आणि दारचं करता करता, त्यांचं पंढरीला जाणं काही न काही कारणांमुळं लांबत जातं. मग आज नाही तर उद्या नाहीतर परवा अशी आशा लागून लागून आणि मला उद्या पंढरीला जायचंय ही आशा सहज गीत रुप घेते,
“आखाडीला मी नाही गेले,
कार्तिकीला ग जाईना.।
पंढरीचा विठू विटे..
उभा मी पाहीन..!”
मग कधीचरी तो योग येतो, ती पांडुरंगनगरी पोहोचते अन् पंढरीचं वर्णन करताना, सहज पान्हा फुटावा तशी तीची प्रतिभा बहरून येते,
“पंढरपुरामधी तिथं बघण्या काय तोटा,
चंद्रभागेचा रसता ग मोठा..”
विठ्ठलाचं मंदीर लांबूनच पाहाताना तिला तिचं माहेर दिसू लागतं. अवघं गोत त्या मंदीरात आहे असा भास तिला होऊ लागतो. विठोबा माऊलीच्या मंदीरात येऊन कल्पवृक्षाच्या सावलीचा थंडावा तिला जाणवतो. मंदीराच्यापाशी जाताच तिला माहेरी गेल्याची भावना दाटून येते अन् तिच्या मुखातून आपोआप ‘ववी’ स्त्रवते,
“विठ्ठल बाप, रूकमीन आई,
चंद्रभागेतीरी कुंडलीक भाई..!
इट्टल माजा पिता, म्हायराला नेतो,
गिनान्याची पोथी हाती, वाचायला देतो..!!”
विठल्लाच्या त्या मंदीरात तिला तिची आई, बाप, भाऊ, बहीण सर्व काही दिसतं. आणि का दिसू नये? परपंचातल्या अनेक दु:खाचा तो विठू साक्षिदार असतो, त्याच्याच भरवश्यावर तर ती परपंचाचा गाडा ओढत असते..!
पण स्त्रीयांना एवढं सुख सहजासहजी कुठे मिळायला? इट्टलाला भेटताना जी ‘दलालां’ची अडचण आपल्याला येते, ती तीलाही येते..त्या बडव्यांच्या ती हाता-पाया पडते, विनवण्या करते आणि शेवटी फणक-याने तिच्या तोंडून शब्द बाहेर पडतात,
“राऊळात जातो, बडवी कशासाठी?
देऊळात उभा विठ्ठल जगजेठी..!
द्येव इट्टल बोलताती, बाळगोपाळ येउ द्या सारं..!
पांडुरंगाच्या दर्शनाला, बडवे करतात हानामार..!!”
शेवटी तीची आणि बापरखमावराची भेट होते. ती कृतकृत्य होते समाधानानं तिचं मन भरून येतं. विठुमाऊली आपल्याला मायेनं पाहातेय, विठ्ठलाची तिच्यावरची स्निग्ध दृष्टी तिला आई-बापाच्या साडी-चोळीसारखीच वाटते, ती म्हणते,
“हौस मला मोठी
पंढरीच्या माहेराची..!
साडी चोळी ल्यावी..
पुंडलीकाच्या आहेराची..!!
पंढरीची भेट घेऊन पुन्हा घरी परतताना ही अनाम प्रपंचीक भक्त तुक्याच्या ओवीचा आधार घेत आर्ततेने म्हणते..-
“कन्या सासुरासी जाये,
मागे परतूनी पाहे..!
तैसे झाले माझ्या जीवा,
केंव्हा भेटसी केशवा..!!”
काय माहित आता पुन्हा कधी भेट होईल ते. विठ्ठलाचं रुप नजरेत याठवून ती त्याचा निरोप घेते..!
महाराष्ट्रातील ग्रामिण संस्कृतील आपल्या प्रपंचात बुडून गेलेल्या बायांनी जात्यावर दळतांना, सडा-सारवण करताना आपल्या लाडक्या विठ्ठलाशी जीवीची हितगुजं ओवीरुपानं अनंतपरीनं सांगीतली.. ज्यांच्या नामरूपाचा कोणताही उल्लेख नाही अशा बायकांच्या भावविश्र्वातील विठ्ठलरूप मराठीत हज्जारो ओव्यांतून व्यक्त होत राहीलं आहे..
— नितीन साळुंखे
9321811091
संदर्भ –
1. मराठी व्यत्पत्ती कोश -कृ. पां. कुलकर्णी
2. लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा – डाॅ. तारा भवाळकर
Leave a Reply