भारताचं दक्षिणेकडील अखेरचं टोक म्हणजे कन्याकुमारी. इथेच अरबी व हिंदी महासागर एकत्र येतात. स्वामी विवेकानंद या समुद्राच्या किनाऱ्यावरील एका खडकावर ७२ तास ध्यानस्थ बसले होते. जीवनाचं अंतिम रहस्य त्यांना या जागेवर उलगडलं. स्वामीजींमुळे कन्याकुमारी हे स्थान प्रसिद्धी पावलं. अशा या कन्याकुमारी स्थानकाशी भारताचं अति-पूर्वेकडील शेवटचं स्थानक दिब्रुगड हे विवेक एक्सप्रेस नावाच्या लांब पल्ल्याच्या एकमेव गाडीनं आज जोडलं गेलं आहे. स्वामी विवेकानंदांच्या स्मरणार्थ ‘विवेक एक्सप्रेस’ हे नाव या गाडीला दिलं गेलं. ४२८६ कि.मी. लांबीचा प्रवास ही गाडी साडे ब्याऐंशी तासांत म्हणजे ३ दिवसांपेक्षा जास्त वेळात पूर्ण करते. या गाडीला ५२ थांबे आहेत व वाटेत लागणाऱ्या स्टेशनांची एकूण संख्या आहे ६५७. तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल व आसाम, अशा प्रांतांतून जाणारी विवेक एक्सप्रेस आठवड्यातून एकदा निघते. जगातील सर्वांत लांब पल्ल्यांच्या गाड्यांत हिचा आठवा क्रमांक लागतो.
भूतान, अरुणाचल प्रदेश, मणिपूर या भागांतील रहिवाशांना भारताच्या दक्षिणेतील महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी विवेक एक्सप्रेस ही गाडी हा उत्तम पर्याय आहे. दक्षिणेकडील सैनिकांना दिब्रुगडला पोहचून तेथून थेट चीनच्या सरहद्दीपर्यंत जाण्यास, तसेच नागालँड, मणिपूरमध्ये कामावर रूजू होण्यास ही गाडी म्हणजे जीवनरेषा आहे.
केरळातील नारळाचा एक मोठा व्यापारी गेली २८ वर्षे गाड्या बदलत त्रास करून घेत दिब्रुगडला पोहचत असे. आज त्याच्या गावातून तो थेट दिब्रुगडपर्यंत जातो व धंदा सांभाळतो. भूतान देशातील थिंपू येथे केरळमधील एक बाई शाळेत शिक्षिकेची नोकरी करतात. सुटी लागल्यावर केरळला परतण्यासाठी ही गाडी त्यांना वरदानच आहे.
दिब्रुगडचं धुकं, ढग, थंडावा, हिरवीगार शेतं व थेट केरळ-तामिळनाडूचा समुद्रकिनारा, नारळी पोफळीच्या बागा, अशी निसर्गाची विविध रूपं या मार्गावरील प्रवासात आनंद देतात. या गाडीचा प्रत्येक डबा म्हणजे भारताच्या निरनिराळ्या प्रांतातील प्रवाशांचं संमेलनच असतं. विविध भाषा, जेवणाच्या वेगवेगळ्या पद्धती, चहापानाचे अनेक प्रकार, हे सर्व अनुभवण्याची एक अनोखी संधी घेण्यासाठी या गाडीनं एकदा तरी जरूर प्रवास करावा. एवढ्या लांबच्या प्रवासात मुख्य अडचण अशी येते, की ही गाडी बहुधा उशिरानंच पोहोचते. इतका दूरचा प्रवास म्हटल्यावर ही गैरसोय अपरिहार्य आहे. काही वेळा कन्याकुमारी ते दिब्रुगड प्रवासात उंदीरसुद्धा सोबत करतात, पण विवेक एक्सप्रेस ही अखंड भारताची गौरवशाली गाडी आहे हे मात्र खरे. आणखी तीन गाड्या विवेक एक्सप्रेस या नावाने धावतात. त्या पुढीलप्रमाणे
१. मुंबई-जम्मू तावी विवेक एक्सप्रेस
२. द्वारका थुटुकडी विवेक एक्सप्रेस (तामिळनाडू
३. संत्रागची मंगलोर विवेक एक्सप्रेस (कर्नाटक)
विवेक एक्सप्रेसप्रमाणेच जगातील काही लांब पल्ल्याच्या गाड्या अशा आहेत.
१. रशिया – मॉस्को ते व्हॉलडेव्हॉस्क
Trans-Saibarian Rail ९२५९ कि.मी. प्रवास-अवधी १७६ तास
२. मॉस्को ते बीजिंग (रशिया-चीन) ८९६४ कि.मी. प्रवास-अवधी १४४ तास
३. गुंगझाओ ते ल्हासा (चीन). ४९८० कि.मी. प्रवास-अवधी ९४ तास
४. टोरंटो ते व्हॅकव्हुअर (कॅनडा). ४४६६ कि.मी. प्रवास-अवधी ८६ तास
५. सिडने-पर्थ (ऑस्ट्रेलिया). ४३६२ कि.मी. प्रवास-अवधी ६५ तास
६. मॉस्को ते बीजिंग-मंगोलिया-उलनबटोरमार्गे. ७८२६ कि.मी. प्रवास-अवधी १३१ तास
७. बीजिंग-शांघाय ते ल्हासापर्यंत जाणाऱ्या गाड्या.
- लांब पल्ल्याच्या रेल्वे जाळ्यात चीनचा नंबर पहिला आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply