माणसाने विझलेले दिवे सुध्दा पहायचे असतात, मग तेजाळणार्या दिव्याची महती समजते. तेजाच्या वलयाची जाणीव होते.दिवे जळून विझले की त्यांची असहायता समजते. ते का विझले असावेत याचा अंदाज घेता येतो. विझलेल्या दिव्यांची वेदना समजून घेता येते.
आपण जेंव्हा वेदनेच्या परिछायेत असू त्यावेळची जाणीव होते. आणि तस पाहिले तर प्रत्येक दिव्याला विझावच लागत. कधी वेळ आल्यावर तर कधी अवेळी पण.दिवे जेंव्हा प्रकाशमान असतात तेंव्हा प्रत्येकाला ते आवडतात. पण याचा अर्थ असा नाही की अंधार उपयोगी नसतो. अंधार पण वेदनेला पोटात जागा देतो.आसवं मुक्तपणे ओघळू देण्यासाठी अंधाराएवढी सुरक्षित जागा कोणतीही नाही.
अंधार आहे म्हणून प्रकाशाला किंमत आहे. वेदना आहे म्हणून आनंदाला महत्व आहे. प्रकाश हा अंधारातून जन्म घेतो. म्हणून विझलेला दिवासुध्दा आपण पहायलाच हवा तरच तेजोमय दिव्याचे महत्त्व कळेल.
— दीपक गायकवाड
आदित्य ॲकॅडमी
अखंड महाराष्ट्र विद्यार्थी चळवळ
Leave a Reply