त्रिपुरा मधील भाजपा च्या विजया नंतर जणू काही भारतातील साम्यवादी संपले या आनंदात लेनिन चा पुतळा पाडून जमीन दोस्त केला .अर्थात हे करणारे कार्यकर्ते निश्चित कुणी शेठ ,मालक ,भांडवलदार अथवा श्रीमंत वर्गातील नव्हते तर चिथावणीला बळी पडलेले सर्व सामान्य कार्यकर्ते होते.त्यातील अनेकांना साम्यवाद ,भांडवलदार,हुकुमशाही ,लोकशाही या संदर्भातील अभ्यासाची पार्श्वभूमी नव्हती .नेत्यांची आज्ञा मानणारे ते सामान्य कार्यकर्ते होते.लेनिन हा भारतीय नाही आणि जनसामान्या वरील होणा-या अत्याचाराचे तो एक प्रतिक आहे हे त्यांच्या मनावर बिंबवण्यात आले होते.
मार्क्सने शास्त्रशुद्ध समाजवाद मांडला, लेनिनने त्यास मूर्त स्वरूप दिले. क्रांती घडवून आणली, झारशाहीला संपवले आणि नवी समाजवादी सत्ता प्रस्थापित केली. नव्या सरकारचे कामकाज कसे असावे याची रूपरेषा आखली..
लेनिन हा रशियन क्रांतीचा प्रणेता असला तरी तो मध्यमवर्गीयांतून पुढे आलेला होता. मार्क्सच्या अर्थविषयक सिद्धान्ताचा अभ्यास करून ते प्रत्यक्षात प्रशासनात आणणारा तो राज्यकर्ता होता.शालेय शिक्षणानंतर लेनिन कायदा व अर्थशास्त्र शिकण्यासाठी कझान विद्यापीठात दाखल झाला . पण तेथील मुलांनी लेनिनच्या भावाच्या फाशीच्या विरोधात केलेल्या निदर्शनांमुळे लेनिनसह ४५ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. क्रांतिकारकाचा भाऊ म्हणून लेनिनकडे पाहण्यात येऊ लागले. त्यामुळे इतर विद्यापीठातही लेनिन यांना प्रवेश नाकारण्यात आला. वयाच्या १८ व्या वर्षी लेनिन आपल्या आई आणि भावंडांसह समारा येथे राहिले.समारा येथील वास्तव्यात लेनिन यांना पुस्तके मिळवून वाचून काढण्याचा नाद लागला. याच काळात कार्ल मार्क्स यांचे दास कॅपिटल वाचण्यात आल्याने समाजवादच रशियाच्या समस्यांवर तोडगा असल्याचे त्यांचे मत झाले. कायदा, तत्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, सामाजिक व राजकीय समस्या, मार्क्सवाद अशा विविध विषयांवर चौफेर वाचन आणि प्रभावी भाषणशैली यामुळे लेनिन समाजवादी गटाचा प्रमुख कार्यकर्ता बनला .
आज आपण कामगारविषयक जो कायदा वाचत आहोत त्या कायद्याचा प्रणेता लेनिन होता हे सध्या किती कर्मचा-यांना माहित आहे? सेवानिवृत्ती नंतर मिळणारे फायदे , ज्यात प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी याचा समावेश होतो आणि त्यावर करही लागत नाही हे पण कामगार संघटना आणि त्यांच्या मागण्यांवर तत्कालीन सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने झालेले आहे. या कामगार संघटना जगभर लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सच्या प्रेरणेतून उभ्या राहिल्या आहेत.
लेनिन याने कामगार कायदा, सिव्हिल कोड त्यानुसार नोकरदार, कामगार आणि शेतमजूर यांचं केलेले वर्गीकरण आणि त्यासंबंधी केलेली नियमावली पुढे जगभरातील कामगार कायदे, वेतनाचे नियम, कामगारांचे इतर हक्क यासाठी प्रेरक आणि मार्गदर्शक ठरले.
जगभरात अनेक राजसत्ता नांदल्या आणि त्यांचा अस्त झाला . आजही जग हुकुमशहा आणि लोकशाही मध्ये विभागली आहे.उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोन्ग हे त्याचे ताजे उदाहरण आहे.काही जण हुकूमशाहीचे पुरस्कर्ते असतात तर काही लोकशाहीवर निष्ठा ठेवणारे असतात.लोकशाही असो वा हुकुमशाही ,राजसत्ता राबवणारे ती कशी राबवतात यावर त्या त्या सत्तेचे भवितव्य अवलंबून असते.
प्रत्येक प्रकारच्या सत्तेचा काही काळ उत्कर्षाचा असतो तर काही काळ ती सत्ता धुळीस मिळवणारा असतो .काही मोजक्या लोकांचा हात त्यामागे असतो.सत्तेपासून दूर राहिलेली मंडळी सत्ते साठी क्रांती वगेरे शब्द वापरतात आणि सत्ता संपादन करतात.लेनिन सारखी विचारवंत आणि मध्यम वर्गातून आलेली मंडळी यास अपवाद असतात.
यवनी राज्यकर्त्यांच्या काळात जसे शिवछत्रपती निर्माण झाले तसेच रशियात लेनिन काळाचा आणि त्याच्या समाजवादाचा उदय झाला.शिवरायांचा काळ अत्यंत आदर्श असा राज्य कारभाराचा काळ होता .सत्ता लोलुप ,स्वार्थी ,आणि रयतेचे हित नजरे आड करणा-या मंडळींमुळे तो काळ इतिहास जमा झाला.
नाशिक ते मुंबई या मोर्च्यातून सुद्धा याच इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे कि काय याचीच शंका येतेय.कष्टकरी ,शेतकरी ,मजूर आणि सर्व सामान्य जनता यांची जेव्हा पिळवणूक होते तेव्हा त्यांचा आक्रोश कुठल्याही राजसत्तेला उलथवून टाकणारा असतो.आधुनिक काळातील सरदार ,उमराव यांच्या साठी हि धोक्याची घंटी आहे.फ्रेंच राज्य क्रांतीची आग संपूर्ण फ्रांस मध्ये पसरण्या साठी एका जकात नाक्यावरील एका व्यापा-याचा संताप कारणीभूत ठरला होता.इंग्रजी सत्ते विरुध्द झालेल्या उठावास मंगल पांडे सारखा एक सामान्य शिपाई कारणीभूत झाला होता हे विसरून चालणार नाही.त्यामुळे आग जर धुमसत असेल तर वेळच्या वेळी ती शांत करणे गरजेचे आहे.
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply