II ॐ नमो भगवते वासुदेवाय II
॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
भगवान “श्रीकृष्णा” विषयी एक अप्रतिम लेख.. नक्की वाचा आणि शेअर करा..!
मथुरेच्या आजूबाजूच्या भागाला “व्रज” भूमी म्हणतात. हे नाव मोठ्या अभिमानाने तुमचा फुटबॉलप्रेमी देश “ब्राजील” मिरवतो आहे. “व्रजन्ति गावो यस्मिन्निति व्रज: ! अर्थात जिथे गायी चरतात, फिरतात तो व्रज प्रदेश होय. याच्या आसपासच्या प्रदेशातल्या काही लोकांची आडनावे पाहिलीत तर “कुशवाहा”, “चरवाहा” म्हणजे गायींना चारणारे अशी आडनावे आहे. लालूप्रसाद किंवा रामविलास पासवान यांच्या पक्षातील लोकांची आडनावे पहा म्हणजे लक्षात येईल मित्रांनो.
” कृष्ण” या शब्दाचा एक अर्थ आहे. काळा किंवा सावळा. कृष्ण शब्दाचा अर्थ आहे आकर्षित करणारा. {कर्षयती किंवा {आ} कर्षणम करोति इति म्हणजे आकर्षित करणारा असा तो.} वासुदेव हे कृष्णाचे नाव आहे. वासु+देव. वास: म्हणजे एका स्थितीत रहाणे. {पहा उपवास म्हणजे उप= च्या जवळ आणि वास म्हणजे रहाणे] विश्वाच्या तिन्ही स्थितींचे नियमन करणारा देव म्हणजे वासुदेव. हा कृष्ण वसुदेव आणि देवकीचा पुत्र आहे. सामवेदात असे म्हंटले आहे की आहात आणि अनाहत नाद जिथे एकाच गतीत वाहतात या एकत्रित प्रवासाला “वासुदेव” असे म्हणतात.
जीवसृष्टीला एक योग्य स्थिती प्राप्त व्हावी म्हणून जो कार्य करतो तो वासुदेव असे अथर्ववेदात सांगितले आहे. गांधर्ववेद म्हणतो की ध्वनी आणि प्रकाश यांच्या संमिलीत, एकत्रित अवस्थेला वासुदेव म्हणतात. कृष्णाचा जन्म अष्टमीला झाला तर रामाचा नवमीला. अष्टमी म्हणजे आठ हा क्षयांक म्हणजे कमी कमी होत जाणारा आकडा आहे. आणि कृष्णासारखाच फसवणारा आकडा आहे.
८ चा पाढा म्हणून बघा. ८ दुने १६ = ७, ८ त्रिक २४ = ६ …….पहा ८ पेक्षा कमी होत चालली संख्या. मायेचा आकडा आहे हा आठ. माया या आठ आकड्यासारखी फसवी असते. आठ हा कर्माचा कारक क्रमांक आहे. तर नवमी म्हणजे नऊ हा पूर्णांक आहे. आपण नऊ हा आकडा ज्यात मिळवू किंवा गुणाकार करू तितकीच त्याची बेरीज येते. म्हणजे ९ + ७ = १६ = ७, ९ + ८ = १७ = ८ …… किंवा …..९ दुणे १८ = ९, ९ त्रिक २७ = ९. नऊ हा पूर्ण ब्रह्माचा कारक आकडा आहे.
“सांदिपनी” हे कृष्णाचे गुरु. यांच्या आश्रमात कृष्ण ६४ दिवसात १४ विद्या आणि ६४ कला शिकला. इथे कृष्ण, सुदामा आणि इतर सर्व जातीपातींचे शिष्य एकत्रच शिक्षण घेत होते. कृष्ण रा क्षत्रिय राजाचा पुत्र म्हणून किंवा सुदामा हा ब्राह्मण म्हणून त्यांना कोणत्याही कामात सवलत किंवा सूट नव्हती. लाकडे जंगलातून तोडून लाकडाच्या मोळ्या आणण्यापासून ते शेती राखणे, गुरे चारणे, गुरु आणि गुरुपत्नी यांची सेवा करणे वगैरे ही सर्व कामे सगळ्यांना करावी लागत असत.
“बलराम” हा कृष्णाचा भाऊ. हल किंवा नांगर हे त्याचे शस्त्र. म्हणून त्याला हलधर सुद्धा म्हंटले जाते. हा शेषनाग होय. म्हणजे विष्णू हे चुंबकीय किंवा आकाश तत्व, ब्रह्मा [ब्रह्म नव्हे तर ब्रह्मदेव] हे विद्त्युत तत्व म्हणजे वीज किंवा वायुतत्व आणि या दोन नंतर “शेष” राहिलेले म्हणजे उरलेले जे तत्व आहे ते “गुरुत्वाकर्षण” हे जे तत्व आहे ते म्हणजे महेश. या बद्दल मी पुन्हा कधीतरी सविस्तर लिहीन. मागे मी यावर पोस्ट टाकली होती. तर हे गुरुत्वाकर्षण म्हणजे हा बलराम होय.
कृष्णाचा मामा “कंस”. उग्रसेन राजा एकदा लढाईला गेलेला असताना एका राक्षसाने त्याची राणी पवनकुमारी हिच्या बरोबर संभोग करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा ती त्याला म्हणाली की “ आपल्या संबंधातून मला होणारा पुत्र जर विश्वाचा सम्राट होणार असेल तर माझी ना नाही”. राक्षसाने होकार दिल्यावर जे व्हायचे ते झाले आणि कंसाचा जन्म झाला. हा अर्थातच राक्षसाचा पुत्र असल्याने सात्विक वृत्तीचा नव्हताच. त्यामुळे त्याने राजा उग्रसेनाला कैदेत टाकले. वासुदेव-देवकीला सुद्धा त्याला मारणारा पुत्र होणार असल्याने तुरुंगात टाकले. कंस म्हणजे मर्यादा. कंस म्हणजे विशिष्ट वृत्तीचा, तत्वाचा किंवा गोष्टीचा आधिक्य किंवा अतिरेक. कंस म्हणजे बंदिस्तपणा. कंस म्हणजे संकुचितपणा. अशा या सामर्थ्याला मर्यादा असलेल्या “कंसमामाचा” त्याच्याच भाच्याकडून म्हणजे कृष्णाकडून पराभव होऊन तो मारला गेला.
“रुक्मिणी” ही कृष्णाची पट्टराणी होय. म्हणजे प्रमुख राणी. सत्यभामा, जांबवंती [स्यमंतक मण्याच्या निमित्ताने कृष्णाला जांबुवंत याच्याकडून प्राप्त झालेली त्याची मुलगी. होय…हा तोच जांबुवंत ज्याने रामेश्वर येथे श्री हनुमंत याला त्याच्या सामर्थ्याची आठवण करून देऊन तू समुद्र उल्लंघून जाऊ शकतोस असे सांगितले होते. युद्धात श्रीरामाला मदत केली होती. कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा. आठ हा आकडा अष्टधा प्रकृती दाखवतो. आकाश, वायू, अग्नी, जल आणि भूमी ही ५ महाभूते, मन, चित्त आणि बुद्धी ही ती अष्टधा प्रकृती होय.
“नरकासुर” कोण? तर “रक” म्हणजे अवस्था. “स”रक”णे म्हणजे असलेल्या या अवस्थेतून हालणे. “न”रक” म्हणजे एकाच अवस्थेत अडकून राहणे. तुंबून रहाणे. आपल्या शरीरातील १६००० नाड्या (रक्त वाहिन्या नव्हे तर हे आपल्या श्वासासारखे आपल्या शरीरातील सूक्ष्म प्रवाह मार्ग आहेत) आणि त्यांचा उगम नाभीतून होतो असे भारतीय योगशास्त्र सांगते. तर कृष्ण या अवस्थेत एक योगी आपल्या शरीरातील या १६००० नाड्या शुद्ध करतो. त्यांना घाणीच्या तुरुंगातून बाहेर काढतो.
“राधा” म्हणजे “धारा”. उपासनेची अखंड, न थांबणारी धारा म्हणजे “राधा” होय. मधल्या काळात पुराणे सांगणाऱ्या लोकांनी त्याच्या अर्थाची वाट लावून जसे कृष्णाला गोपिंमध्ये सतत रमणारा दाखवला तसेच राधेला सुद्धा कृष्णावर हल्लीच्या “पिक्चर” सारखे प्रेम करताना दाखवले. कृष्ण गोकुळातून कायमचा बाहेर पडला तेव्हा तो काहीतरी ७-८ वर्षांचा होता. आणि राधा ही लग्न झालेली एक स्त्री होती. मग त्यांचे प्रेम वैषयिक असेल का? पण विचारच करायचा नाही म्हंटले की मग सारेच संपले.
मग साहजिकच हिंदू धर्म विरोधकांना बोलायला, हिंदू धर्माची चेष्टा करायला कोलीतच मिळते. जसे दत्तगुरुंच्या मातेला ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे “नग्न”पणे म्हणजे “न + अग्न” अर्थात अग्नीवर न शिजवलेले अन्न वाढायला सांगतात तर त्याचा अर्थ या पुराणिकांनी किंवा भागवत कथाकारांनी पार नग्नपणे वाढायला सांगितले असा लावला. हल्ली सुद्धा जे यती, तापसी, योगी, किंवा व्रतस्थ ब्राह्मण असतात ते शिजवलेल्या अन्नाचा दोष लागतो म्हणून न शिजवलेले कोरडे अन्न ज्याला शिधा म्हणतात ते द्यायला सांगतात.
“गोप” म्हणजे इंद्रीयांमधील “गोप”निय योगइच्छा तर “गोपि”का” म्हणजे या गोपांना कार्य करण्याची शक्ती देणारी “योगशक्ती” बर का महाराजा. इंद्र म्हणजे आपल्याच अंगातील, शरीरातील, इंद्रीयांतील लपून बसलेली वासना. आणि हाच तो “इंद्र” वेद आणि पुराणात लैंगिक किंवा इतर अनेक प्रकारचे गोंधळ घालताना दाखवला आहे. वेदात आणि पुराणात एकच शब्द अनेक अर्थांनी किंवा अनेक शब्द एकाच अर्थाने वापरलेले आहेत.
“मुरली” म्हणजे आपल्या अंतरात जी खोल “मुरलेली” असलेली ईशशक्ती आहे ती शरीराद्वारे प्रकट करणे होय. आपल्या शरीराला नवी छिद्रे असतात. या नवछिद्रांची बासरी, किंवा वेणू, किंवा पावा किंवा मुरली हा कृष्ण अवस्थेतला योगी वाजवत असतो. कोणती असतात ही छिद्रे…? दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, मुख, गुदद्वार, आणि डोक्याचे ब्रह्मरंध्र ( पाठभेद- इथे काहीजण शरीराच्या त्वचेवरील छिद्रे हा नववा पाठभेद म्हणून मानतात.) ही नऊ रंध्रे किंवा छिद्रे या बासरीची छिद्रे आहेत. बांसरी म्हणजे बांसुरी आहे. म्हणजे बांस ( वंश म्हणजे बांबू या शब्दावरून बांस हा हिंदी शब्द आला आहे. ) म्हणजे वेळू किंवा बांबूच्या नळीतून निघालेले किंवा काढले जाणारे सूर किंवा जी यातून सूर बाहेर काढते ती ..ती पोकळ असते. तिला प्राण म्हणजे वायू आपण फुंकावा लागतो.
“कृष्ण” हा द्वापार युगाचे प्रतिक आहे. द्वापार युगात वासना वाढली होती. आणि ती याच्यापुढे कलियुगात वाढतच जाणार होती. म्हणून कृष्ण हा पायावर पाय दुमडून बासरी वाजवत उभा असताना दाखवला जातो. म्हणजे लोकांनी वासनेवर संयम ठेवावा. सावळा विठ्ठल म्हणजे कृष्णच होय. या विठ्ठलाच्या रुपात शिव आणि विष्णू या देवतांचे एकत्रीकरण केलेले आहे.
“सुदर्शन चक्र” हे कृष्णाचे शस्त्र होते. सुदर्शन म्हणजे सु- चांगले + दर्शन = चांगले दर्शन. सव्य म्हणजे क्लोकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेने डावीकडून उजवीकडे या प्रदक्षिण चक्राकार गतीमुळे हे विश्व निर्माण होते. ही गती अपसव्य म्हणजे उलट झाली तर हे विश्व नष्ट होते. चक्र हा शब्द चृ: म्हणजे हालचाल करणे आणि कृ: म्हणजे करणे या दोन शब्दांपासून बनलेला आहे. म्हणजेच चक्र हे हालचाल करते. हे एकच शस्त्र असे आहे की ते सतत गतिमान रहाते. स्थिर रहात नाही.
सुदर्शन चक्र कृष्णाच्या करंगळीवर आणि विष्णूच्या तर्जनीवर असते. पण ते फेकायचे असेल तर मात्र कृष्ण सुद्धा ते तर्जनीने म्हणजे पहिल्या बोटाने फेकत असे. Bumrang हे उलटते आणि परत येते तसे पण सुदर्शन चक्र सुरक्षितपणे शत्रूचा नाश करून फेकणाऱ्या व्यक्तीकडे परत येते. फेकणाऱ्या व्यक्तीचा हे चक्र फेकल्यावर सुद्धा पूर्ण ताबा किंवा नियंत्रण असते. यमुना किंवा शून्य मार्गातून ते जात असल्याने जसे आपल्या शरीरातील मज्जातंतूंनी पाठवलेल्या संदेशांना अजिबात वेळ लागत नाही तसा चक्राला कुठेही जायला वेळ लागत नाही. याचा आवाज तर होतच नाही पण याला अडथळा आला तर या चक्राची गती वाढते. याला ह्रंस गती असेही म्हणतात.
“घोडा आणि कृष्ण” हे दोनच पूर्णपुरुष म्हणवले जातात. त्याचे “एक कारण” म्हणजे या दोघांनाही स्तनाग्रे नसतात. कृष्णाची भक्ती ही अत्यंत अवघड आहे. राधा आणि मीराची भक्ती बघा. या दोघींना खूप खूप त्रास सहन करावा लागला. मीरेला तर विष प्यावे लागले. कारण निळा रंग हा अत्यंत मारक रंग आहे. निळ्या रंगाचा जास्त वापर झाल्यास मनावर मालिन्य येते. दारिद्र्य येते. मन आक्रसते. आळस येऊ लागतो. उत्साह संपतो. म्हणून आपल्या पूजेत लाल, पांढरा, पिवळा आणि हिरवा हेच रंग प्राचुर्याने किंवा जास्त प्रमाणात असतात. हे रंग सौभाग्य, आनंद, संपत्ती हे सारेकाही देणारे आहेत.
‘पिवळा’ रंग हा शाळेत वर्गात भिंतीला लावल्याने मुलांचे अभ्यासात मन लागते. वस्तू हलकी वाटते. म्हणून मोठमोठे JCB, रोड रोलर्स यांना पिवळा रंग लावलेला असतो. नाहीतर त्यांच्या वजनाने ते आपल्याला बघणे सुद्धा सहन झाले नसते. पिवळा रंग हा धन, संपत्ती देणारा रंग आहे. याचे अधिक्य झाले तर उष्णता, पित्त वाढते.
‘लाल’ रंग हा उत्साह देतो पण जास्त झाला तर डोकेदुखी, राग, संताप येणे, भीती वाटते हे त्रास होतात. राग आणि भीती या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. राग आला की असे काही कृत्य घडते की नंतर भीती वाटावी असे होते आणि जास्त काळ भीती वाटली की नंतर संताप येतो.
‘हिरवा’ रंग हा सर्व रोग नष्ट करणारा आहे. सर्व सुखे देणारा आहे. हिरव्या रंगाची वेव्हलेंग्थ ही लाल आणि निळ्या या रंगांच्या दोन टोकांमधील अगदी मधोमध असलेली वेव्हलेंग्थ आहे. पण अतिरेक झाला तर शिथिलता येते. पांढरा रंग हा स्वच्छतेचा कारक रंग आहे. त्याचा अतिरेक झाला तर आपण काहीतरी लपवतो आहोत, आपल्यावर डाग आहे हे तो दाखवतो. पुढारी बघा..!
आजपासून साधारणपणे ५१३० वर्षांपूर्वी कृष्णाने एका पारध्याचा बाण अंगठ्याला लागण्याचे निमित्त करून देह सोडला. महाभारताच्या वेळेस कृष्णाचे वय साधारणपणे ८३-८४ वर्षे होते तर भीष्माचार्य हे १२५ ते १३० वर्षांचे होते. अर्जुनाचे वय सुद्धा कृष्णाच्या वयाच्या आसपासचे होते. रामायण साधारणपणे साडेसात हजार ते दहा वर्षांपूर्वी झालेले आहे. वेद त्याच्याही खूप आधीचे आहेत.
आपण करत असलेली उपासना वाईट गोष्टींचा नाश व्हावा म्हणून वापरली जावी असे वाटत असेल तर उपासना संपल्यावर “श्रीकृष्णार्पणमस्तु” असे म्हणावे. जर आपली उपासना सकारात्मक, विधायक कार्यात वापरली जावी अशी इच असेल तर “श्रीब्रह्मार्पणमस्तु” असे म्हणावे.
॥ श्रीब्रह्मार्पणमस्तु ॥
II ॐ नमो भगवते वासुदेवाय II
॥ ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने
प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ॥
॥ परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ॥
॥ महाराज सिध्दारूढ माऊली ॥
॥ श्री सद्गुरूनाथ महाराज की जय ॥
॥ श्री गोपाळकृष्ण महाराज की जय ॥
— गणेश उर्फ अभिजित कदम,
श्रीहरी मंदिर कुडाळ सिंधूदुर्ग
Leave a Reply