नवीन लेखन...

व्रतस्थ भैरव

अजून रात्र संपूर्णपणे उलटलेली नाही पण, पुर्वांगावर उन्हाचे कोवळे कवडसे किंचित दिसायची चिन्हे दिसत होती. एखादा प्रकाश किरण, गर्द झाडांच्या फांदीतून अल्पसा प्रकाश दाखवत होता. नदीचे पाणी निश्चल होते आणि वातावरणात आवाजाचे कसलेच चिन्ह दिसत नव्हते. काठावरील, जीर्ण देवळात मात्र समईचा क्षीण प्रकाश आणि त्याची तिरीप, दूरवरून जाणवत होती पण पूजेची लगबग दिसत नव्हती. इतक्यात, कुणीतरी देवळातली प्रचंड घंटा वाजवल्याचा आवाज झाला आणि मनात भैरव रागाचा “षडज” जागा झाला!! भैरव राग, हा भारतीय संगीतातील अति प्राचीन रागांपैकी एक राग मानला जातो. पुढे, रागांचे वर्गीकरण करताना, “भैरव” नावाचा “थाट” निर्माण केला आणि त्याच्या आजूबाजूचे राग त्यात सामावून घेतले.
खऱ्या अर्थाने “संपूर्ण-संपूर्ण” जातीचा राग आहे आणि यात, “निषाद”,”धैवत” हे दोन स्वर कोमल लागतात तर बाकीचे पाचही स्वर शुद्ध स्वरूपात, या रागात वावरत असतात. वादी स्वर “धैवत” तर संवादी स्वर “रिषभ” आहे.
भारतीय संगीतात ज्या ६ कोटी आहेत आणि त्यातील, कलासंगीत या कोटींत, रागदारी संगीताचा अंतर्भाव होतो, त्याबद्दल जरा वेगळ्या शब्दात विवेचन करायचे झाल्यास, कलेच्या प्रत्येक पातळीवर रागसंगीताची धाव अमुर्ताकडे असते. भाषा आणि साहित्य, यांना रागसंगीतात नेहमीच गौण भूमिका असते, त्यामुळे शब्द माध्यम हे नेहमीच रागसंगीतात परके असते तसेच दैनंदिन आयुष्यापासून अलग राहणे वगैरेमधून प्रस्तुत अमूर्तता सिद्ध होण्यास मदत होते. रागसंगीतात आपले स्वत:चे विश्व निर्माण करून त्यातील सर्व संदर्भ संगीततत्वांच्या सहाय्याने सिद्ध व्हावेत अशी धडपड दिसते. याचा परिणाम सादरीकरण अधिकाधिक संदिग्धतेवर भर देणारी असते आणि त्यामुळे  कलासंगीताची स्वतंत्र आविष्करणे म्हणूनच अनेक वेळा गणिताशी तोलली जातात. संगीताकडे संगीत म्हणून(च) पाहा, हा आग्रह सर्वांना पेलण्यासारखा नसतो!! परिणामत: रागसंगीत फारच कमी लोकांपर्यंत पोचते. 
थोडक्यात, रागदारी संगीतात सगळेच आविष्कार गणिताच्या तत्वांवर सिद्ध करता येत नाही. संगीत अति अमूर्त आणि लवचिक असल्यामुळे, सगळ्या रसिकांच्या परिप्रेक्षात हे संगीत पोहोचणे अवघड जाते. याचाच परिणाम, या संगीतात, शब्द हे माध्यम नेहमीच परके ठरते.     
याच दृष्टीकोनातून इथे पंडित जसराज यांनी सादर केलेला राग “भैरव” रागातली चीज ऐकण्यासारखी आहे, “हरी नारायण आनंद” ही चीज खास आहे. रागदारी संगीतात, शब्दांना देखील महत्व देऊन, राग मांडला जाऊ शकतो, हे या गायकाने सप्रमाण सिद्ध केले आहे. अर्थात, इथे रागसंगीताचा ढाचा लक्षात ठेवणे जरुरीचे आहे कारण शब्दांना कितीही महत्व द्यायचे झाले तरी एका ठराविक मर्यादेनंतर, शब्दोच्चारांवर मर्यादा या आपसूक पडतात(च). तीनही सप्तकांत सहज विहार  तरीही,मंद्र सप्तकात अधिक अंतर्मुख गायन करण्याची स्वाभाविक प्रवृत्ती. याचा परिणाम, भारतीय संगीतातील “अनवट” स्वराचे अत्यंत प्रभावी सादरीकरण. “अनवट” स्वर हा भारतीय संगीतातील अतिशय कठीण पण तितकाच प्रभावशाली अलंकार. सततचा रियाज अत्यावश्यक तरीही प्रत्यय नेमका येईल, याची अजिबात खात्री नाही. अशा परिस्थितीत, पंडितजींनी या स्वरावर असामान्य प्रभुत्व प्राप्त केले आहे.
रचनेची सुरवात इतकी ठाय लयीत आणि मंद्र सप्तकात आहे की ऐकणारा त्या स्वरांच्या ध्वनिमध्ये(च) गुंगून जातो. स्वररचना बांधताना, स्वर “अनुरणात्मक” कसा होईल आणि त्यामुळे स्वरांना एकप्रकारची “गोलाई” कशी प्राप्त होईल, इकडे रसिकांचे ध्यान वळवून घेण्याची वृत्ती आढळते. त्यामुळे, भैरवसारखा राग अतिशय भरीव, घाटदार होतो. आलापी ऐकताना, आपल्याला प्रत्येक स्वर “अवलोकता” येतो आणि त्या स्वराचा आनंद घेता येतो. साथीला वीणा असल्याने, सादरीकरणात, भैरव रागाला अत्यावश्यक अशी गंभीरता प्राप्त होते. वीणा वादन देखील अतिशय बारकाईने ऐकले तर त्यात, “गमक” आणि “मींड” यां अलंकाराचे उपयोजन फारंच सुंदररीत्या  केलेले आढळेल. अर्ध्या तासातील अर्धी रचना तर केवळ असामान्य आलापी आणि खर्जातील स्वरांवर तोललेली आहे. रचनेच्या मध्यावर, पखवाजाच्या बोलांनी रचनेला जो काही भरीवपणा प्राप्त होतो, तो तर अनिर्वचनीय अनुभव आहे.
“जागते राहो” हा चित्रपट तसा हिंदी सिनेमाच्या नेहमीच्या पठडीतला नाही, केवळ एका रात्रीची कथा, रस्त्यावर हिंडणाऱ्या भिकाऱ्यासदृश माणसाला  आणि त्याला केवळ पाण्याची ओंजळ हवी असते आणि त्यासाठी, त्या रात्री इतके विचित्र अनुभव येतात, याचीच सगळी कथा आहे आणि चित्रपटाच्या शेवटी, त्याला एक गृहिणी झाडाला पाणी पाजताना दिसते आणि त्याच गृहीनिकडून त्याची तहान भागली जाते. या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर, प्रभातवेळी त्याला पाणी मिळत असताना पार्श्वभागी, लताबाईंचा असमान्य टिपेचा स्वर ऐकायला मिळतो. हा स्वर देखील इतका “आश्वासक” असतो, की लगेच अंगावर येतो.
“जग उजियारा छाये,
मन का अंधेरा जाये,
किरनो कि रानी गाये,
जागो हे मेरे मन मोहन,
जागो मोहन प्यारे”.
या रचनेत आणखी एक गंमत आहे. पहिला शब्द “जागो” आहे आणि सुरवातीला जो आलाप आहे, त्यात संगीतकार सलिल चौधरींनी “कोरस” वापरला आहे. “कोरस” स्वरांचा वापर, जसा या संगीतकाराने केला आहे, तितका समर्थ वापर इतरांकडे फार विरळाच ऐकायला मिळाला. या कोरस स्वरांत, त्यानी पाश्चात्य धाटणीचे स्वर मिसळले आहेत पण ते देखील कसे मिसळले आहेत, ते खरच अभ्यासण्यासारखे आहे. “जग उजियारा छाये” पासून, आपल्या पारंपारिक भैरव रागाची आठवण येते पण तरी देखील रचना इतकी समृद्ध आहे की गाण्यातील कुठल्या सौंदर्याकडे कशा बाजूने बघावे, याबाबत संभ्रम पडावा!! गाण्यात केरवा ताल आहे पण तो देखील फार वेगळ्या प्रकारे वापरला आहे. या गाण्याचा शेवट देखील किती सुंदर केला आहे. संगीतकार म्हणून सलिल चौधरी यांच्या अप्रतिम गाण्यांत, या गाण्याचा नंबर नक्की फार  क्रमांकाने लावावा लागेल.
मराठीतील हे एक अतिशय सुंदर गाणे आहे. संगीतकार श्रीधर फडक्यांची ओळख या गाण्याने रसिकांना झाली, असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. या गाण्यापर्यंत श्रीधर फडके यांची ओळख, सुधीर फडक्यांचा मुलगा, अशा स्वरूपाची होती पण या रचनेने, श्रीधर फडक्यांची “स्वतंत्र” ओळख निर्माण झाली. या रचनेत बसंत राग देखील आहे. खरेतर सुगम संगीतात ठामपणे एकच राग सांगणे अवघड असते जर ते गाणे त्या रागाचे लक्षणगीत नसेल तर. आता, पुरिया कुटुंबात अनेक रागांच्या सावल्या आहेत तेंव्हा त्यात राग श्री गौरी देखील आहे, जो या रचनेत तुरळक आढळतो. संत एकनाथ महाराजांची शब्दकळा आहे. गायक सुरेश वाडकरांनी हे गाणे गायलेले आहे.
“ओमकार स्वरूपा सद्गुरु समर्था,
अनाथांचा नाथा, तुजनमो”.
गाण्यात पखवाज वापरला आहे  भजनाला एक प्रकारचे गंभीर आणि खोल वातावरण प्राप्त होते. गाण्यचे सुरवातीचा शब्द,”ओंकार” या शब्दाला अनुसरून चाल बांधण्यात आली आहे. भारतीय संगीताची उत्पत्ती ही “ओम” या शब्दातून झाली आहे, असा एक संकेत मानला जातो. खरतर, “ओम” हा “मुर्घ्नी” स्वराचे अस्तित्व स्पष्ट करण्यासाठी अधिकतर वापरला जातो. या विचारानुसार, गाण्याची सुरवात अत्यंत गंभीर आणि खर्जाच्या सुरांनी होणे, क्रमप्राप्तच ठरते आणि इथे “भैरव” रागाची  खूण पटते.
जसे गाणे पुढे विस्तारित होते, त्यानुसार, लय तीच राहून, चालीची वळणे मात्र वेगवेगळ्या स्तरावर बदलत राहते आणि त्यामुळे गाण्याचे गायन फार अवघड होऊन बसते. अर्थात, गाणे ऐकायला अतिशय श्रवणीय आणि थोडे “बुद्धीवादी” होते. गाण्यातील वळण, कुठल्या शब्दावर बदलते आणि त्यामुळे, शब्दांचा आशय कसा अधिक खोलवर व्यक्त होतो, याचा मागोवा घेणे, खूपच मनोरंजक ठरते.
जेंव्हा हिंदी चित्रपटाला “फिल्म फेयर” पारितोषिके देण्याचे ठरले, तेंव्हा पहिल्याच वर्षी, “बैजू बावरा” या चित्रपटाच्या संगीतासाठी संगीतकार नौशाद यांना हा मान मिळाला. सगळा चित्रपट, शास्त्रोक्त संगीताच्या अभिवृद्धीशी संलग्न असल्याने, चित्रपटातील सगळीच गाणी, रागांवर आधारित आहेत. “मोहे भूल गये सांवरिया” हेच ते प्रसिध्द गाणे. हिंदी गाण्यांत काही ताल अतिशय प्रसिद्ध आहेत आणि त्यात केरवा ताल येतो. या गाण्यात तोच ताल वापरला आहे.
“जो मैं जानती, के प्रीत किये दुख होय,
नगर ढिढोरा पिटती, के प्रीत किये दुख होय;
मोहे भूल गये सांवरीया, भूल गये सांवरीया,
आवन कह गये, अजहू न आये,
लीनी ना मोरी खबरिया.”
तसे जर बारकाईने ऐकले तर गाण्याची चाल फक्त “भैरव” रागाचे सूचन करीत नसून, “भैरवी” चे सूर देखील, या रचनेत अंतर्भूत आहेत. त्यामुळे हे गाणे “भैरव” रागाचे लक्षणगीत म्हणून, गृहीत धरणे योग्य नाही. गाण्याची सुरवात भैरव रागांच्या सुरांनी होते. जसे गाणे पुढे सरकते तशी काही ठिकाणी भैरवीचे ऐकायला मिळतात. अगदी खोलवर ऐकले तर “कलिंगडा” या अनवट रागाचे सूर देखील या रचनेत मिसळले आहेत की काय, अशी शंका यावी, इतपत त्या रागाच्या सुरांचे अस्तित्व आहे. अर्थात, रागांच्या ठेवणीचा विषय जरी बाजूला ठेवला तरी, गाणे म्हणून ही रचना अतिशय सुश्राव्य, गोड आहे. शब्दांना नेमका न्याय देणारी चाल आहे.
भैरव रागावर आधारित आता आपण आणखी गाण्यांच्या लिंक्स बघुया, त्यायोगे या रागाशी आपले अधिक जवळीक होईल.
“गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी;
काय हरवले सांग शोधिसी, या यमुनेच्या जळी”.
श्रेष्ठ कवी बालकवींच्या प्रतिभेतून उमटलेली ही कविता. कविता म्हणून वाचताना देखील शब्दांतील लय ध्यानात येते आणि आशय लगेच मनात ठसतो. गाणे म्हणून सादर करताना, पंडित जितेंद्र अभिषेकींनी चाल भावगीताच्या अंगाने दिली आहे. गाण्यात तसे बघितले तर “भैरव” अगदी स्पष्ट देशात नाही. गाण्यातील काही हरकती या रागाशी जवळीक दाखवतात. तसे बघितले तर आशालता वाबगावकर यांच्या आवाजाला काही मर्यादा आहेत प्रांती आवाजात अंगभूत गोडवा आहे आणि तोच ध्यानात घेऊन, गाण्याची रचना द्रुत लयीत केली आहे. एखादे नितांतरमणीय सुगम गीत ऐकावे, असा या गाण्याचा पहेराव आहे.
— अनिल गोविलकर 

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..