(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व दिवाळी २०२२ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेला श्री रवींद्र गुर्जर यांनी लिहिलेला लेख)
गेली तीन वर्षे आपण अत्यंत कठीण कालखंडाचा यशस्वी सामना केला. आता त्यातून हळूहळू बाहेर पडत आहोत. सन 2019 पासून माझी कामं एवढी वाढली आहेत की, लोक म्हणतात, ‘बाबा, तुम्हाला वयच नाही. उलट वयाचा उलटा प्रवास चालू आहे.’ 2021 मध्ये मी 75 वर्षे पूर्ण केली.
वय हा एक आकडा आहे. कोणी पन्नाशीतच म्हातारा झालेला दिसतो, तर कोणी 80 व्या वर्षीही तरुणासारखा कार्यरत असतो. मी सुमारे 50 वर्षे लेखन-प्रकाशन-ग्रंथालय क्षेत्रात अव्याहत काम करत आहे. लोकसंपर्क संपूर्ण महाराष्ट्र भारतभर आणि बाहेरच्या काही देशांमध्ये प्रवास. त्याचबरोबर व्याख्याने, कार्यशाळा इत्यादी चालू होत्या, आहेतच. लेखकाला निवृत्ती नाही.
गेली तीन वर्षे आपण अत्यंत कठीण कालखंडाचा यशस्वी सामना केला. आता त्यातून हळूहळू बाहेर पडत आहोत. सन 2019 पासून माझी कामं एवढी वाढली आहेत की, लोक म्हणतात, ‘बाबा, तुम्हाला वयच नाही. उलट वयाचा उलटा प्रवास चालू आहे.’ 2021 मध्ये मी 75 वर्षे पूर्ण केली. गेल्या जून 22 मध्ये ‘लेखक-प्रकाशक संमेलना’चा सातारा येथे अध्यक्ष होतो. आवश्यक वाचन, संगीत भरपूर ऐकणं, तसंच नाटक-सिनेमा बघणं देखील चालूच आहे.
दोन वर्षांपूर्वी दोन वृत्तपत्रांनी त्यांच्या रविवार आवृत्तीसाठी अनुवादित कथा देणार का, अशी विचारणा केली. मी गंभीरपणे त्या कामाकडे वळलो. ‘कॉपीराईट’ गेलेल्या जगभरातील शेकडो प्रसिद्ध लघुकथाकारांच्या कथा वाचल्या. दर एक-दोन दिवसांनी ‘अॅमेझॉन’वरून पुस्तक घरी येऊन पडत होती. त्या कथा-विश्वात मी रममाण झालो. त्यातल्या उत्तम कथा निवडून, आजपर्यंत 120 कथांचे अनुवाद केले आहेत. त्यातल्या 50 कथा ‘स्टोरीटेल’साठी ‘ऑडिओ’देखील झाल्या. या कथांची आता छापील आणि ई-बुक्स होतील. त्याखेरीज अन्य दोन-तीन पुस्तकांचं काम चालू आहे. रविवारी कथा प्रसिद्ध झाल्या की, सकाळी 7 वाजल्यापासून वाचकांचे कथा आवडल्याचे फोन येतात. आपल्या श्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.
हल्ली गुन्हेगारी, बदला, रहस्य इत्यादी विषयी वाचकांना हवे असतात, त्यामुळे संपादकांनी तशीच मागणी असते आणि तशा कथा शोधणे क्रमप्राप्त असते. मध्येच मासिक, दिवाळी अंक आणि पुस्तकांच्या संपादनाचं काम येतं. याच काळात, कथांबरोबरच 100 च्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. अध्यात्मापासून अगदी नॅनो टेक्नॉलॉजी, क्वांटम फिजिक्ससारखेही विषय हाताळलेले आहेत.
चित्रपट हे माझं लहानपणापासूनचं वेड आहे. दोन चित्रपटांत आणि काही नाटकांत कामही केलं आहे. आपली कथा-पटकथा पडद्यावर यावी, असं 50 वर्षांचं स्वप्न आहे. योगायोगानं एका मराठी निर्मात्यानं अलीकडेच तशी मागणी केली आहे. त्यावर काम चालू आहे. आणखी दोन चित्रपटयोग्य कथाही विचाराधीन आहेत. त्यावरच प्राथमिक लेखनही केलं आहे.
‘ह्युमन लायब्ररी’ ही संकल्पना हल्ली जगभर रूढ झाली आहे. 2000 साली ‘कोपेनहेगन’ येथे त्याची सुरुवात झाली. आता भारतात दिल्ली, इंदूर, मुंबई, पुणे येथेही त्याचा प्रसार झाला आहे. त्याची कल्पना अशीः ग्रंथ वाचण्याऐवजी प्रत्यक्ष माणसानेच ‘मी कसा घडलो’ किंवा ‘काम केलं’ हे लोकांना सांगायचं, त्यावर प्रश्नोत्तरं होतात. म्हणजे ‘माणूस हाच ग्रंथ!’
मी असा विचार केला की, ‘आपणच निरनिराळ्या क्षेत्रातकाम करणाऱ्यांचे 20-25 मिनिटांचे व्हिडिओ का बनवू नयेत?’ कोणतीही चांगली कल्पना तात्काळ अंमलात आणायची, हा आपला बाणा! तसा अनुभवही गाठीला आहे. झालं! घटस्थापनेला पहिल्या व्हिडिओचा शुभमुहूर्त केला आणि गेल्या 15 दिवसात, 10 व्हिडिओ तयारही झाले. त्यातले तीन ‘यू-ट्यूब’वर टाकून झाले आहेत. ‘स्काय स्टुडिओज आणि रवींद्र गुर्जर निर्मित’ हे व्हिडिओ सर्वजण बघू शकतात. महिना अखेरपर्यंत असे 10 पूर्ण तयार होतील. संकल्प आहे 100 व्हिडिओंचा. त्यापाठोपाठ, शॉर्टफिल्म, माहितीपट आणि चित्रपटांचे कामही सुरू होईल. अशा रीतीनं एक स्वप्न सत्यात उतरत आहे.
सतत प्रवास करावा लागतो. सुदैवानं प्रकृती अद्याप उत्तम साथ देत आहे. गुडघेदुखी, दमछाक इत्यादी लक्षणं वयानुसार उद्भवलेली आहेत. परंतु ‘गंभीर’ या सदरात मोडणारे आजार वाट्याला आले नाहीत.
आता मला सांगा, कोणत्या कामात वय आड आलं? कामात सतत व्यस्त, हे त्यामागचं रहस्य आहे. पुढील पाच वर्षांची योजना डोक्यात तयार आहे. ग्रंथालय चळवळीतही सहभाग आहे. फेसबुक आणि व्हाट्सअॅपचा भरपूर वापर आहे.
ज्येष्ठ नागरिकांकडे विविध प्रकारचे अनुभव आणि कौशल्याचे ‘भांडार’ असते. पुढील विचार असा आहे की, राज्यभरातील (तालुका पातळीवर) ज्येष्ठांची एक संघटना उभारावी. त्यातून असंख्य कामे निर्माण होऊ शकतील. यात सहभाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी माझ्याशी अवश्य संपर्क साधावा.
‘जीवेत शरदः शतम्’ हे भारतीयांचे ध्येय असते. आपण, सतत काम करत राहायचं. ‘सत्य संकल्पाचा दाता ईश्वर!’ त्याचे पूर्ण आशीर्वाद असावेत, हीच प्रार्थना.
(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व दिवाळी २०२२ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेला श्री रवींद्र गुर्जर यांनी लिहिलेला लेख)
-रवींद्र गुर्जर
Leave a Reply