वृक्ष देई आधार युगें न युगें
प्राणवायू उधार निरंतरे
तरी वृक्षाची होई लाकडे
जाळण्यासाठी!!
अर्थ–
निसर्ग आहे म्हणून आपण आहोत, वृक्षांची सगळ्यात जास्त गरज ही माणसाला आहे. सावली घेण्यासाठी माणूस वृक्षाचा आधार घेतो, पावसा पासून संरक्षण मिळावे म्हणून आपण वृक्षाच्या खाली उभे रहातो. आपले आरोग्य नीट रहावे म्हणून आपण वृक्षाने दिलेली फळे खातो. हे वृक्ष आपल्याला औषधी पाला देतात. याच वृक्षांमुळे पुरमय परिस्थितीत जीव वाचण्यास मदत होते. पण, माणसाच्या अन्नास पूर्णत्व मिळावे आणि माणसाच्या जीवनास मोक्ष मिळावा यासाठी वृक्षांची लाकडेच कामास येतात. म्हणजे तेथेही वृक्षास पहिले मरावे लागते मग माणूस त्याचाही उपयोग करून घेतो.
काय म्हणावे या माणसाला, ज्याकडून आधार घेतो, ज्याच्या कडून प्राणवायू उधार घेतो, त्याच वृक्षांना आपल्या सोयीस्कर प्रवासासाठी एका क्षणात कापून काढतो आणि त्यातूनही पैसा कमावतो. येथे वृक्षाच्या ठिकाणी माणूस शब्द टाकला तरी परिस्थिती तीच असते. जो व्यक्ती आधार देतो, कोणत्याही प्रकारचा उधार देतो अखेरीस या दोन्ही शब्दांत धार आहे हे त्याला कळत नाही आणि तीच धार शेवटी शिल्लक राहते आणि त्या व्यक्तीचा गळा कापण्यास कारणीभूत ठरते.
म्हणून आधार, उधार यात पडताना त्यातली धार नक्की कोणत्या बाजूस आहे हे ताडून घेणे योग्य नाहीतर आधार, उधार मुळे धार येऊन दार उघडावे किंवा बंद करायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply