कारखान्या विष, सोडले हवेत
गादी पैसे खात, सुजलेली
वाहनी गराडा, या भूतलावरी
लोट धुरांवरी, स्वार असे
प्लॅस्टिकने पहा, वेढले वेष्टन
पृथ्वी जे आसन, डळमळे
रसायनी शेती, विषच पेरले
बियाणे रूजले, संकरीत
बोडखे डोंगर, देखवेना डोळा
कोणा कळवळा, येईल का?
पाणी जो मागतो, नित्य देवाकडे
लक्ष नसे थोडे, वृक्षाकडे
तडातडा तोडी, बांधावरी झाड
जरा नाही चाड, वृक्षाप्रती
तोडलेली झाडे, विकती चोरून
हप्ता खाती कोण, नसे जाण
रस्ता केला मोठा, झाडावरी घाला
नसे बोलबाला, तोंडदाबी
धरणात लावी, खोटी झाडवल्ली
पंचनामी उगली, पैपाणीच
जुनाच तो खड्डा, खोदा नव्यानं
पुन्हा हे रोपण, दरवर्षी
फोटो काढा मोठा, टाका नेटवरी
येतो जो पुढारी, पेपरात
वृक्ष लागवड, लुटती अनुदान
कोटींचे उड्डाण, गल्लाभरू
कैक पिढ्या येथे, झाल्या गारद
दुष्काळी साद, सालोसाल
जो मराठवाडा, तो टंँकरवाडा
ऊसतोडी खोडा, सर्वकाळ
हातात कोयता, सोडू एकदाचा
ओघळ पाण्याचा, देई झाड
फ्रीजचा जो येथे, पहा धुमाकूळ
पेयांचा बक्कळ, तो बाजार
माणसाने येथे, वृक्ष जपावेत
झाडं पुजावेत, मनोमनी
शाश्वत वास्तव, नसे काही इथे
व्यवस्था कुतथे, दैनंदिन
वृक्षाने पाऊस, पावसाने वृक्ष
ठेवू जरा दक्ष, मानवता
फेकूनिया बिया, भूतलावरी या
मळा फुलवूया, फळपिके
प्रत्येकाने इथे, एक झाड वाढावे
जीवन जगावे, समाधानी
वृक्षसंमेलन ते, भरे देवराई
फुलेल वनराई, डोंगरात
असे आशावादी, जोडोनिया वन
भविष्याचे धन, समजूनी
नवरीने नव्या, ओलांडीले माप
एक झाड जप, आठवणी
मृतका स्मृती, झाड जे लावती
पितृ ते जेवती, समाधानी
झाड झाड जपा, सावलीत बसा
मग पहा घसा, कंठगळा
हिरवाईने जे, नेत्र सुखावती
स्मरण करती, कैक पिढ्या
बांधुनिया चंग, हिरवाई रंग
नेत्रसुखी दंग, होऊ सर्व
वारकरी भाऊ, दोन झाडं लावू
मग आरती गाऊ, विठोबाची
झाडांचे रक्षण, करा संरक्षण
मानवी लक्षण असो द्यावे
असे माझा भाव, तोच माझा देव
तेथं माझा गाव, वृक्ष नाव
हिरवी चादर, बहरे फूलपान
गर्द होई रान, हिरवाई
वृक्षसंमेलनी, करती जे श्रम
करतो नमन, त्या हातांना
— विठ्ठल जाधव.
संपर्क: ९४२१४४२९९५
शिरूरकासार, जि.बीड
(वृक्षवाढीसाठी लढणाऱ्या हातांना समर्पित…)
Leave a Reply