“रेवा, माझी बॅग भर, मी उद्या सकाळी इंदापूरला जाणार आहे” अविनाश
“अरे हो, तुझं ठरलं तेव्हा निदान मला फोन तरी करायचा” रेवा.
“काय म्हणाले महेश काका ?” रेवा चहाचं आधण ठेवत म्हणाली.
“तुला कसं कळलं कि महेशकाकांचा फोन आला होता ते?” अविनाश
“आठ दिवस झाले तुझं फोनवर तेच बोलणं सुरु आहे.” रेवा रागाने चहाचा कप ठेवत म्हाणाली.
“इंदापूरचं घर विकायचं टुमणं त्यांनीच काढलं आहे ना. कोण तो हॉटेलवाला त्याची जरा चौकशी करुन घे?” रेवा
“तुला नक्की मावशीचा फोन आला असणार” अविनाश
“तुला कसं कळलं?” रेवा
“चौकशी करुन घे…हे तुझं नाही मावशीच डोकं असणार. तुला चांगलं ओळखून आहे मी.” अविनाश
“तसही आपल्याकडे बाबांचा भाऊ अर्थात रमाकाका आणि आईची बहिण अर्थात मंदा मावशी हे दोन परस्पर विरोधी पक्ष आहेत. आजातागायत या दोघांच कधीच पटलं नाही.” अविनाश
“एवढी मोठी वास्तु एकदम विकायची म्हणजे… मनाला पटत नाहीया” रेवा
“मग काय करु ? आईबाबा गेल्यानंतर त्या वास्तुकडे मी हवं तेवढ लक्ष देऊ शकत नाही.” रेवाचा रागीट चेहरा बघून अविनाश हळूच म्हणाला
“आणि आपल्याला कुठे सारखं जायला जमणार आहे. या काळात एवढ्या मोठ्या घराचं मेंटनन्स किती कठीण आहे माहित आहे न तुला ?” अविनाश तिला इंदापूरची जागा विकून टाकू हे पटवून देण्याचा पूरेपुर प्रयत्न करत होता.
“जो काही निर्णय घेशील तो विचार करुन घे” रेवा त्याच्यापुढे बशीत बिस्कीटं ठेवत म्हणाली. तिचा सूर काहीसा उदासीनच होता.
“रेवा, तुला हा व्यवहार पटत नाहीया का?” अविने कचरतच विचारले.
“खरं सांगू का अवि….” रेवा
आत्ता गेल्या क्षणी चिडलेली ही आणि दुसर्या क्षणाला एवढी शांत…..आता ही नक्कीच माझी विकेट घेणार. अविनाश मनोमन विचार करत होता.
“ते घर म्हणजे आई-बाबांच स्वप्न होतं रे. मोठ्या कष्टानं त्यांनी ते बांधलं होतं. ते मोडण्याची खरच गरज आहे का? मला ते तू आत्ताच विकावं ते ही हॉटेलवाल्याला का कोण जाणे पटत नाही रे.” रेवा
“काकांनी सगळ जुळवून आणलं आहे गं ….”अविनाश
“तेच ते, त्या काकांना ते विकण्यात इतका काय इंटरेस्ट आहे मला कळत नाही. कोण तो हॉटेलवाला त्याला ही एवढी घाई का? हे ही मला कळत नाहीया.” रेवा चिडून म्हणाली.
“तू जो काही व्यवहार करशील तो सावकाश आणि विचारपूर्वक कर बस एवढच मला सांगायच आहे.” रेवा
ही रेवा म्हणजे ना, एकीकडे हो म्हणते एकीकडे वागण्यातून – बोलण्यातून नकार दाखवते……. घाई करायला नको हे तिचं म्हणणं बरोबर आहे म्हणा.
“रेवा, महेशकाकांना एवढी घाई कां ? खरच याकडे माझे लक्ष गेलं नाही.” अविनाश
“ठीक आहे उद्या जाऊन तर बघ. मग ठरवू काय करायचं ते.” रेवा
हे ऐकून अविनाश रेवाकडे एकटक बघत होता. खरच, या बायका बोलतात एक करतात एक…..करायला लावतात एक.
इंदापूरच्या आठवणींनी अविनाशच्या मनात गर्दी केली. त्याला त्याची शाळा…मित्र….ती धमाल…..आईबाबांनी त्याचे केलेले लाड, पुरवलेले हट्ट सगळं आठवत होतं.
घर, घरातील प्रत्येक वस्तू आणण्याचा निर्मळ आनंद त्यानी उपभोगला होता. घरात जेव्हा फ्रीज घेतला, तेव्हा त्याचा पाय स्वयंपाकपाकघरातून निघत नव्हता. घसा दुखेपर्यन्त बर्फ खालला होता. या आठवणीनी स्वत:शीच हसत अविनाश लहान नीरवशी खेळू लागला. त्याच्या खोड्या बघून त्याला त्याचं बालपण आठवलं. त्याने एक नजर नीरवच्या खोलीवर टाकली. भिंतींचा रंग, खेळणी, ती खोली रेवा आणि त्यानी, दोघांनी मिळून हौसेने सजवली होती. त्याला अण्णा आठवले. किती हौशीनी त्यांनी त्याच्यासाठी स्टडीटेबल सुताराकडून करुन घेतला होता. इंदापूरचं घर त्यालाही विकायची इच्छा नव्हती. नोकरीनिमित्त सतत परदेशातील चकरा, मुंबईतील त्याचा हा फ्लॅट त्यानं नुकताच घेतला होता.
इंदापूरच्या घरी वर्ष दोन वर्ष भाडेकरु ठेवून बघितलं. आलेलं भाडं, त्यातून घराचा खर्च भागत नव्हता. त्यात आधीच्या भाडेकरुंनी विजबील, घराचा टॅक्स, पाणी बील काहीच भरलं नव्हतं. त्याला त्याचाही भुर्दंड बसला होता.
एक हॉटेल वाली पार्टी घर घेण्यात इंटरेस्टेड आहे, असा एक दिवस रमाकाकांचा फोन आला. त्या क्षणी त्याला ते विकून टाकावसं वाटलं. रेवाचं बोलणं ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बहिण ना भाऊ, आई-बाबा गेल्यावर एकट्यानं सगळं सांभाळायचं त्याला कठीण जात होतं.
उद्द्या इंदापूरला जाऊ आणि पटलं तरच व्यवहार करुनच टाकू. अविनाशनं मनोमन ठरवलं.
विकून आएल्या पैशांचं काय करायचं? कुठे इनवेस्ट करायचे हे तो सी.ए. फडकेंना विचारुन आलाच होता.
“मंदा मावशींना फोन कर रे. त्या तुला कालपासून फोन करत आहेत.” रेवा
“मला? का ग? गेल्या आठ्वड्यातच तर बोलणं झालं तिच्याशी” अविनाश
“इंदापूरच्या घराबद्दलच बोलायचं आहे त्यांना” रेवा
“हॅलो मावशी, काय ग, कशी आहेस? माझी आठवण येत होती म्हणे तुला.” अविनाश
“माझे बच्चू कसे आहेत? परिक्षा आटोपल्या का त्यांच्या?” अविनाश
“अरे हो. रॅपिड फायर सुरु झालं का तुझं? तू कसा आहेस बछड्या? मंदा मावशी
“मी मस्त ग.” अविनाश
“तुला इंदापूरच्या घराबद्दल बोलायचं होतं म्हणे? बोल नं” अविनाश
“अरे हो. त्याच्याबद्दलच बोलायच होतं.” मंदामावशी
“अरे, तू विकणार होतास न. रेवा सांगत होती.” मंदामावशी
“अग, नुसत्ं बोलणं सुरु आहे. अजून व्यवहार झाला नाही ग. त्याकडे लक्ष देता येत नाही म्हणुन विकायचं मनात आलं.” अविनाश
“मी समजू शकते. तुझा व्यवहार नसेल झाला तर एक प्रस्ताव आहे. बघ पटलं तरच हो म्हण रे. कुठलीही बळजबरी नाही.” मंदामावशी
“ए मावशे, किती आडून बोलतेस ग. काय ते स्पष्ट सांग न” अविनाश
“तुला विकासकाका माहिती न. यांचा मित्र रे.” मंदा मावशी
“हो, माहिती आहे की. तु कामाचं बोल ग.” अविनाश
“अरे, त्यांची बदली झाली आहे इंदापूरला. त्यांना भाड्याने घर हवं आहे. रेवाकडून कळलं तू ते घरभाड्यानी देणार नाही. हे कुटुंब चांगल आहे रे. भाडं वेळेत देतील आणि इतर त्रास ही नाही होणार याची मी खात्री देते.” मंदामावशी
“उद्दा मी इंदापूरला जातो आहे. रात्री कळवतो. चालेल का?”अविनाश
“अरे मी त्यांना तुझा मोबाईल नंबर देते. ते मुलांच्या ऍडमिशनसाठी इंदापूरलाच गेले आहेत. तुझी भेट ही होईल. बघ. तुला योग्य वाटतं ते ठरवं.” मंदा
“अशी काय बघतेस माझ्याकडे रेवा.” अविनाश
“तुझं बोलणं झालं न या विषयावर मावशशी.” अविनाश
“हो रे. तुला योग्य वाटत ते कर. माझी कशालाच ना नाही. पण शक्य तो विकू नको रे. एकदा विचार कर. विकासकाका हे संजूकाकांचे चांगले मित्र आहे. त्या सज्जन माणसाला घर भाड्याने द्दायला हरकत नाही.” रेवा
इतके वर्ष झाली आमच्या लग्नाला. हिची नाही नाही म्हणत हो म्हणण्याची स्टाईल काही औरच आहे. असं बोलून ही माझ्याकडून सगळी कामं तिला हवी तशी करुन घेते. “नको असू दे” करत घरातलं तिला हवं तसं इंटेरिअर करुन घेतलं. झेपेल का…मला जमेल का…करत मी नाही म्हणत असतांना नीरवच्या वेळेस चान्सही घेऊन घेतला. या वर्षी नको…पुढच्या वर्षी जाऊ करत केरळ ट्रीप करुन घेतली.
“मस्त विकेट घेतेस रेवा तू माझी.” अविनाश
“हा मस्का आहे कि थट्टा रे” रेवा डोळे मिचाकवत म्हणाली.
“तुला जे योग्य वाटतं ते समजून घे” अविनाशने तिला तिच्याच स्टाईल मधे सांगताच तिला लटका राग आला.
“जोक्स अपार्ट. मी इंदापूरला गेल्यावर तिथे काय ठरतं ते बघतो. आधीच्या अनुभवावरुन घर भाड्याने द्यावे की नाही समजत नाहीया ग रेवा.” अविनाश
“जर तो हॉटलवाला चांगली किंमत देत असेल तर त्याचा विचार करु.” अविनाश
“नमस्कार मी गजानन जाधव. तुम्ही अविनाश न. रमाकांतभाऊ येतीलच एवढ्यात.” जाधवांनी स्वत:ची ओळख करुन देत म्हंटलं
“नमस्कार.” अविनाश
“मस्त आहे घर. मोक्याच्या ठिकाणी आहे. मुख्य म्हणजे बस स्टेशन जवळ आहे.” जाधव
“गरजेनुसार मला घरात बदल करुन घेता येईल. काय आहे माझं हॉटेल इथ बसस्टॅंड जवळ आहे. जुनं घर आता पुरत नाही.” जाधव
“काय रेट वैगरे काही ठरवला का? सध्या या भागात २५००आहे.” जाधवांनी काकाची वाट न बघता थेट विषयालाच हात घातला.
काका आल्यावर घर बघून झाले. इतर गप्पा झाल्यात. जाधव आणि रमाकाका विकण्याची खूप घाई करत होते. त्यांनी तर “पन्नास हजार देऊन टाकतो” इथपर्यंत ची घाई ठिक होती. त्यांनी तर थेट किचन मोठ करतो, मागच्या अंगणात वर शेड टाकतो, हे सगळं प्लॅनिंग ऐकून अविनाश जरा चिडलाच. त्यांची ती घाई बघून अविनाशनी विचार करुन कळवतो म्हंटलं.
घर बघितल्या क्षणी त्याची एकेक आठवण जागी झाली. सदा बहरलेलं अंगण आज खुरटं आणि निस्तेज दिसत होतं. गाडीचा रॅम्पही उखडला होता. फाटकाच्या कमानीवर चमेलीचा वेलही सुकुन गेला होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तुळशी वृंदावनाकडे गेलं. आईनी ते मोठ्या हौशेनी बांधून घेतलं होतं. त्याच्या गवाक्षात ती तुटलेली पणती दिसताच त्याला एक क्षण तुळशीपुढे रोज दिवा लावणार्या आईचा भास झाला, रोज संध्याकाळी ती पणती तुळशीपुढे लावून ते दोघं “दिव्या दिव्या दिपत्कार… म्हणायचे. वृंदावनात खोचालेल्या त्या उदबत्तीचा सुगंध त्याला आजही आठवत होता. आता मात्र त्या वृंदावनात भेगाळलेली माती होती. पोर्चमधल्या बाकावर बसत त्यानी एकदा घराकडे नजर टाकली. निर्धार करत तो उठला आणि मावशीला फोन लावला.
“मावशे, विकासकाका आणि काकू अजून पोहचले नाहीत ग. विचार त्यांना किती वेळ आहे. मी येतो चौकात एक चक्कर टाकून” अविनाश
“अरे अवि, केव्हा आलास?” तेवढ्यात शेजारच्या दिघेकाकूंनी आवाज दिला
“ये रे. तुझ्या आवडीची बासुंदी खायला.” दिघे काका
“काय ठरवलं रे या घराचं? जरा डागडुजी करुन घे.” दिघे काकू
“काय म्हणे तुझा रमाकाका. मागे येऊन गेला या जाधवांना घेऊन. तेव्हा नेमकी तू दिलेली किल्ली मला वेळेवर सापडली नाही.” दिघे काका
“मी म्हंटल होतं त्याला अरे विकाणार असता तर बोलला असता अवि आम्हाला.” दिघे काकू
“विकणार नाही हो काकु भाड्यानी देतो आहे. संजू काका आहेत नं, त्यांचेचे मित्र आहेत. विकास म्हात्रे. चांगले लोकं आहेत. तुम्हाला त्रास नाही होणार.” अविनाश
“बरं झालं हो विकणार नाही ते. अरे रमाकाका एजन्ट साठी काम करतो. त्याला काय कमिशन मिळेल.” दिघे काका
हे ऐकून अविनाश उडालाच. रमाकाका दूरचा काका असला तरी त्याचं नेहमीच येणंजाणं होतं घरी. रमाकाकानी निदान हे सांगायला हवं होतं. म्हणुन तो घर विकण्याची घाई करत होता.
“काकू, उद्दा माळी काकांना स्वच्छता करायला पाठवता का?” अविनाश
“आज रात्रीच निघणार होतो. आता आलोच आहे तर घराची आवश्यक ते कामं उरकून घेतो.” अविनाश
“कुठे थांबणार?” दिघेकाका
“मकरंदकडे. त्याला सांगितलं आहे.” अविनाश
“उद्दा जेवायला ये इकडेच. गप्पा करु. रेवा आणि नीरव कसे आहेत रे?” दिघेकाकू
“येतो न. दोघेही मस्त आणि मजेत” अविनाश
घराची जुजबी कामं आटोपली होती. मळीकाका स्वच्छता करुन गेल्यानंतर आता त्याघराला थोडंफार घरपण आलं होतं. विकासकाका आठवड्याभरात रहायला येणार होते. वृंदावनात लावायला त्यानी नवीन तुळशीचं रोप आणलं होतं.
आई-बाबांच्या आठवणींनी समृद्ध घर निव्वळ आपल्याला जमत नाही म्हणून आपण विकायला निघालो हा विचार येताच तो खजिल झाला. या व्यवहारी जगात उच्च रहाणीमान सांभाळायच्या नादात आपण किती मग्न होतो. चपला जोड्यांपासून ते खाण्याच्या पदार्थांपर्यंत प्रत्येक गोष्टीत स्टेट्स, कॉर्पोरेट पार्ट्या, वीकेन्डस, क्ल्बस … या इंदापूरच्या रस्त्यांवरुन कधीकाळी आपण सायकलवर फिरत होतो, या समोरच्या ग्रांऊडवर अनवाणी क्रिकेट खेळलो, थोडे थोडे पैसे जमा करुन सिनेमे बघितले, आई-बाबांनी एवढं शिकवलं ज्यामुळे आज मजलदरमजल मी प्रगती करतोय. शिखरावर चढायच्या नादात मी जिथे पहिली पायरी चढलो तीच विसरलो.
आठवणींनी भारावलेल्या अविनाशने आपल्या घरावर नजर फिरवली. ते घर जमेल तसं जोपासायचा निर्धार केला.
— विनीता श्रीकांत देशपाडे
Leave a Reply