माणसाच्या अनेक प्रवृत्ती असतात.काही वृत्ती जन्माने लाभलेल्या असतात तर काही पालनपोषण ज्या वातावरणात,ज्या पद्धतीने झाले त्याने निर्माण होतात.
आपल्या भावभावनांचे आकलन आपणास नसते, इतरांच्या नजरेतून ते बघावे लागते.आपली वृत्ती म्हणजे स्वभाव इतरांना माहित असतो, परंतु आपला असून तो आपणास ठाऊक नसतो.
बढाईखोर, चिडचिडा, स्वार्थी, कपटी, नीच, पाताळयंत्री, जळाऊ, घमंडी, नेभळट, लोचट, लफंगा, मितभाषी, बडबडा, अहंकारी, लोभी, भित्रा, वितंडवादी, कामसू, आळसी, घाणेरडा, खुनसी, गर्विष्ठ अशा कितीतरी वृत्ती दोष असतात.
बढाईखोर माणसे कायम बढाया मारत असतात.आपल्याकडे आहे त्यापेक्षा वाढवून सांगण्याची त्यांची वृत्ती असते.गप्पा मारण्यात हे लोक पटाईत असतात.न पटणारे बोलत असतात.
चिडचिडा व्यक्ती तर त्याच्या मनाविरुद्ध काहीच सहन करुन शकत नाही.या जगात सगळे मूर्ख लोक आहेत, असेच जणू त्यास वाटत असते. त्याच्याशी जुळवून घेणे मोठे कठीण असते, परंतु स्वार्थ असेल तर माणसे त्यांच्याशी जुळवून घेतात,नसता त्याच्या पासून दूर होतात.
स्वार्थी माणसे प्रत्येक ठिकाणी आपला स्वार्थ पहातात. जिथे फायदा तिथेच लक्ष देतात. स्वार्थापुढे इतर बाबींचा ते विचार करत नाहीत. त्याची दृष्टी कावळ्यांची असते.सावज शोधणारी नजर असते. स्वार्थी माणूस नीतिमत्ता बाळगत नाही.
— ना.रा.खराद.
Leave a Reply