२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात आणीबाणी नंतर जशी काँग्रेस विरोधाची लाट आली होती तशीच लाट आली आणि भारतीय जनतेला नवी आशा दाखवण्यात नरेंद्र मोदी यशस्वी झाले.भा ज पा पूर्ण ताकदीने सत्तेवर आली.अस्वस्थ देशाला नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आशेचा किरण दिसला.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस मागल्या पाच वर्षात सातत्याने पराभवाचा सामना करीत राहीली . त्यातले सत्य इतकेच आहे, की मोदी किंवा शहा हे निवडणूका जिंकत नसून त्यांचे विरोधक त्यात पराभूत होत आहेत. त्या पराभवाचा परिणाम म्हणून भाजपा वा मोदी जिंकताना दिसत आहेत. ताज्या निवडणूकांमध्ये ईशान्ये कडील तीन राज्यात कॉग्रेस पुरती नामोहरम होऊन गेली आहेच. पण त्रिपुरा हे डाव्यांच्या दिर्घकाल कब्जात असलेले राज्यही भाजपाच्या झोळीत जाउन पडले आहे. त्याचे कारणही नेमके तेच आहे. भाजपा देशाच्या कानाकोपर्यात आपले संघटनात्मक सामर्थ्य विस्तारण्यासाठी अहोरात्र झटत आहे आणि त्यांच्याशी मैदानात उतरून सामना करताना विरोधकांची दमछाक झालेली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्रिपुरा आहे.पराभवाच्या सतत छायेत असलेल्या काँग्रेस ला त्यामुळेच लहानश्या नांदेड महानगर पालिकेच्या निवडणुकीतील यशामुळे सुद्धा आशा पल्लवित झाल्याचे दिसले..सतत १० वर्षे सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला अपयशामुळे आलेली ग्लानी दूर होण्याची चिन्हे नाहीत यास एकमेव कारण म्हणजे काँग्रेस जवळ नेतृत्वाचे दुर्भिक्ष हेच आहे.काँग्रेस अजूनही नेहरू गांधी परिवारा ला पर्याय शोधण्याचे टाळत आहे.हीच खरी पक्षाची शोकांतिका आहे.
सातत्त्याने नरेंद्र मोदी त्यांच्याच पक्षात सामर्थ्यवान होत आहेत.त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे.नरेंद्र मोदींच्या मंत्री मंडळात असलेले मंत्री , पूर्वी इंदिरा गांधींच्या काळात मंत्री मंडळातील मंत्री इंदिरा गांधींना वचकून असत तसेच वचकून नव्हे नव्हे घाबरून आहेत.सध्या तरी पूर्वेकडील राज्याच्या विजया नंतर पक्षात मोदींची मोठी पक्कड आहे.कुठल्याही सत्तेला लोकशाहीत सर्व लोकांचा पाठींबा नसतो आणि जितके सत्ताधार्यांच्या बाजूचे असतात, त्यापेक्षा अधिक लोक विरोधात असतात. पण त्यांच्या मतातील विभागणी मोठ्या पक्षाला सत्ता व बहूमत मिळवून देत असते. भाजपाने विविध राज्यातील अशा नाराजांची मोट बांधण्याची रणनिती अवलंबली आहे. उलट भाजपाच्या विरोधातल्या बहुतेक पक्षांना तितक्या ठामपणे भाजपा विरोधातील मतांची मोट बांधण्याचे कौशल्य साधता आलेले नाही.मागल्या कित्येक वर्षात कॉग्रेस व अन्य पक्षांनी आपापल्या राजकीय संघटना गुंडाळून ठेवल्या आहेत आणि संघटनात्मक बांधणीकडे साफ़ दुर्लक्षच केले आहे. नेमकी तीच बाजू भाजपाने मजबूत केली आहे आणि त्याचे प्रतिबिंब मतदानात पडताना दिसते. एका बाजूला संघटनात्मक फ़ळी उभारायची आणि दुसरीकडे आपल्या विरोधकांवर नाराज असलेले गट व घटक जमा करायचे, असे अमित शहांचे काम चालू असते.गेल्या ४ वर्षात मोदी यांच्या प्रत्तेक शब्दाचे विश्लेषण करून त्यांना कोंडीत पकडण्याची संधी राहुल गांधी यांच्या स्वतःच्या नाकर्ते पणा मुळे त्यांनी घालवली आहे.संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू झाले, तेव्हा कोणीतरी सोनियांना राहुलच्या नेतृत्वाविषयी विचारले होते. त्यावेळी सोनिया गांधी यांनी राहुलचा “माझा बॉस” म्हणून उल्लेख केला होता पण UPA चे अध्यक्ष पद स्वतः कडेच ठेवले होते हे बरेच काही सांगून जाते.
पक्ष प्रमुखास खरा धोका त्याच्या स्वतःच्या पक्षात असतो हे ओळखून नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण आडवाणी , मुरली मनोहर जोशी यांच्या सारख्या पक्ष धुरिणांना जागेवरच बसवले ते त्याच मुळे. जुन्या अपमानाचा बदला घेण्यात नरेंद्र मोदी माहीर आहेत .अडवाणी सारख्या माणसाला गलीतगात्र करण्याची किमया मोदींनी केली आहे. सुषमा स्वराज्य या त्यांच्या तब्बेतीने मागे पडल्या सारख्या झाल्या आहेत त्यामुळे त्यांच्या कडे त्यांची पूर्वीची आक्रमकता नाही.परंतु त्यांना सुद्धा मोदी यांनी पद्धतशीर डावलले आहे.मोदींच्या पेक्षा अधिक पावसाळे लोकसभेच्या सभागृहात घालवलेल्या सुषमा स्वराज्य या खरेतर सर्व पक्षीय पसंतीच्या ठरल्या असत्या.
पण या देशाचे एक वैशिष्ठ आहे.हा देश फार मोठ्या प्रमाणात व्यक्ती पूजक आहे.आज मोदींची चलती आहे त्यामुळे पक्ष कार्यकर्ते आणि दुसऱ्या फळी पासूनचे सर्व नेते कार्यकर्ते त्यांच्या स्वतःच्या स्वार्था साठी मोदी ..मोदी हा जयजयकार करीत आहेत.मोदी करत असलेल्या अक्षम्य चुकांवर पांघरून घालण्याचे काम करीत आहेत.मोदी सदानकदा परदेशात दौऱ्या वर असतात हे अनेक भा ज पा तील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना खटकते.मोदींचे राहणीमान अनेक स्वपक्षीयांना पसंत नाही.मोदी करत असलेल्या सततच्या लंब्या चौड्या भाषणांनी त्यांच्या पक्षातले लोक पण हैराण झाले आहेत .पूर्वीच्या जनसंघापासून असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना आयात केलेल्या लोकांना जेव्हा पक्ष तिकिटे वाटते तेव्हा त्यांना खूप मनस्ताप होतो.अत्यंत भावनिक नाते असलेले भाजपा चे कार्यकर्ते हे पक्षाचे खरे आधारस्तंभ आहेत ,नव्याने मिळत असलेल्या पक्षाच्या विजयामुळे ते अत्यंत आनंदित झाले आहेत.परंतु हल्ली अनेक कार्यकर्ते काही अपवाद वगळता सोशल मिडीयावर पूर्वी सारखी आपली मते मांडून मोदींना पाठिंबा देताना दिसत नाहीत.याची अनेक कारणे आहेत .समाजात काम करताना त्यांनाच उत्तरे द्यावी लागतात.
नोटा बंदीचे सर्व सामान्य जनतेने सुद्धा कौतुक करून मोदींना पाठिंबा दर्शवला होता.लोकांना आता भ्रष्टाचारआणि काळ्या पैशाचा उबग आला आहे .त्यांना नोटाबंदी मुळे काळ्या पैशाचे व्यवहार करणा-यांना चाप बसेल असे वाटले होते .पण नोटा बंदीचा खटाटोप अयशस्वी झालाय.
मोदी अनेक योजना ज्या काँग्रेस च्या सत्तेत होत्या त्या आपल्या म्हणून नव्याने राबवत आहेत.त्याचे क्रेडीट घेण्याचा प्रयत्न करीत आहेत .गंगा शुद्धीकरणाचा बोजवारा उडालाय.स्मार्टसिटी योजना अशीच कागदा वर आहे.लोकल प्रवाश्यांच्या यातना संपत नाहीत.पेट्रोलच्या भाववाढीविरोधात भाजपा आंदोलनात अग्रेसर होती आता तेच त्यांच्या सत्तेत झालेल्या भाववाढीचे दुबळे समर्थन करीत आहेत.शिक्षण असो कि शेती सततचे धरसोड धोरण पाहून जनतेचा धीर सुटत चालला आहे.शेतक-यांच्या आत्महत्ते प्रकरणी आंदोलन करणारी भाजपा आता बचावाच्या पवित्र्यात आहे.
बहुमत असताना अनेक बाबतीत मोदी सरकारला लोकसभेत अपयश आले आहे.
भाजपा त नेतृत्व बदल होणे हाच त्यावर एकमेव तोडगा आहे.सत्ता मिळाल्याच्या उन्मदातून भाजपाला आता बाहेर यावेच लागेल.कर्नाटकातील निकालावर विरोधी पक्षांची पुढील रणनीती आवलंबून असणार आहे.पूर्वेकडील अनुभव बघता कदाचित भाजपा कर्नाटकात सत्तेवर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही परंतु २०१९ ची निवडणूक भाजपा ला वाटते तेव्हडी सोपी नसेल.अटलबिहारी वाजपेयी आणि मोदी यांच्या नेतृत्वात जमीन आस्मानाचा फरक आहे.वाजपेयी विरोधी पक्षांना सुद्धा आदर वाटावा असेच होते .मोदींनी स्वतःच्या व्यक्ती केंद्रित नेतृत्वाने स्वतः चा घात करून घेण्याचीच अधिक शक्यता आहे.परंतु सध्या जी काही मोदी लाट आहे त्याचे कारण विरोधी पक्ष दुबळा झाला आहे हेच आहे.काँग्रेस नी या बाबतीत आत्मपरीक्षण करण्याचीच गरज आहे.
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply