व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी, सवयी, मानसिकता हे देखील सर्व भिन्न असतं. या भिन्न विभिन्न मानसिकतेचा विचार करून सकारात्मकता आणि एकता निर्माण करावी लागत असते. यामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा कस लागत असतो. अंतर्मनाच्या आणि मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून रंग शास्त्राचा खूप मोलाचा वाटा असतो. रंगांचा संबंध थेट अंतर्मनाशी असतो. विविध रंग अंतर्मनाला जाऊन भिडणारे असतात.
प्रत्येक रंगामुळे आपल्या अंतर्मनात निरनिराळे भाव प्रकट होत असतात. निरनिराळ्या रंगांमुळे निर्माण झालेल्या आपल्या भावना आपण उत्स्फूर्तपणे व्यक्त करत असतो. त्यामुळेच रंगशास्त्र आपल्या जीवनांत अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. कोणत्या रंगाचा कोठे, कसा, किती, का आणि केव्हा वापर करायचा हे पाहाणे अत्यंत आवश्यक असतं. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीप्रमाणे रंगाची पसंती केली जात असते. याचा प्रत्यय आपल्याला दैनंदिन जीवनात प्रत्येकाच्या पेहरावाच्या निवडीवरून दिसून येतो. एखाद्याला एखाद्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे वापरावेसे वाटतील तर दुसर्याला पिवळ्या रंगाचे. अर्थातच हे प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून असतं.
अनेकदा आपल्या शारीरिक दुखण्यामागे खरं तर मानसिक अस्वस्थता कारणीभूत असते. रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग असे मोठे आजार अथवा डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ, चक्कर अशी छोटी दुखणी अनेकांना त्यांच्या मानसिकतेमुळे उद्भवलेली असतात. आपण आपलं मानसिक स्वास्थ्य मिळवणं आणि ते टिकवून ठेवणं हे सर्वस्वी आपल्याच मानसिकतेवर, अंतर्मनातील विचारांवर अवलंबून असतं.
आपल्या अंतर्मनाला आनंदी ठेवण्यातच आपलं मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवता येतं. तो आनंद आपण स्वतःच निर्माण करायचा असतो. आपल्याला दैनंदिन जीवनात निरनिराळे अनुभव येत असतात, ज्यामुळे आपली मानसिकता बदलत असते. या बदलत जाणाऱ्या मानसिकतेच्या अनुशंगानं सकारात्मक विचार करण्याची जरुरी असते.
– विद्यावाचस्पती विद्यानंद
ईमेल : vidyavachaspati.vidyanand@gmail.com
Leave a Reply