मला एक आठवतं, माझ्या आईनं सांगितलं
होतं की वर्षा-दीड वर्षाचा असताना
तू खूप छान दिसायचा. त्यावेळचं माझं एक छायाचित्र मी कोपरगावच्या एका स्टुडिओमध्ये पाहिलं. खरं म्हणजे आईनं सांगितलं म्हणून तो मी होतो, अन्यथा त्या प्रतिमेकडे मी पाहिलंही नसतं. त्या फोटोच्या प्रेमात पडलो मी; पण स्वतच्या प्रेमात नाही पडलो. आजही आठवणींचे गाठोडे सोडताना, लग्नाचे अल्बम पाहताना किंवा सहलीतले मित्र पाहताना आपली नजर जाते ती आपल्या प्रतिमेवर. तो मी असं आपण सांगतो. कारण आज तो मी राहिलेला नसतो. ज्याला आपण हा मी असं म्हणत असतो तो खरोखरच मी असतो का? आपण कोणाला भीत नाही, असं छातीठोकपणे सांगणारी माणसं किती भित्री असू शकतात, हे तुम्हाला थोडं डोळसपणे पाहिलं तरी सापडेल. `आपल्याला कधी राग येत नाही अन् आला तर आपण म्हणजे अगदी हे’ असं म्हणणारा माणूस बायकोच्या भुवईच्या धाकावर आवाज बदलताना आपण पाहतो. थोडक्यात काय तर आपण आपलीच आपल्याला हवी तशी प्रतिमा सुखावली तर आपणही सुखावतो. एखाद्या प्रतिमेत आपण स्वतला पहायला लागलो की आपलं स्वतच असं व्यक्तिमत्त्व तयार होतं. खरं तर हे व्यक्तिमत्त्व त्या-त्या क्षणाचं असतं. माणूस हा काही एक माणूस नसतो, तो म्हणजे विविध व्यक्तिमत्त्वांची साखळी असते. या साखळीतल्या एखाद्या कडीत आपण स्वतला अडकवून नव्या व्यक्तिमत्त्वाचा आनंद घेत नाही. ते व्यक्तिमत्त्व अनुभवत नाही. तो मी काल होतो, आज नाही याचं दुःख आज केलं जातं. उद्या मी असा असेल याचंही दुःख वाटू लागतं. जीवन हा एक अनुभवाचा प्रवास आहे. तो करायचा असेल तर वर्तमानात जगायला हवं. आजच्या स्वतला स्वीकारणं त्यासाठी आवश्यक आहे. भूतकाळाच्या प्रतिमा आणि भविष्यकाळाच्या कल्पनांना विश्राम देऊन आजचा अनुभव घ्यायला हवा. जो वर्तमानात जगतो त्याला स्पर्श करायला दुःखालाही दोनदा विचार करावा लागेल. वर्तमानात जगण्यासाठी स
वतला पाहणं, जाणून घेणंही तितकच महत्त्वाचं आहे. एकदा माझा मी जसा आहे तसा स्वीकारला की मग इतरांनाही तो जसा आहे तसं स्वीकारण्याचं भान येतं. एकदा माणूस, व्यक्ती, घटना किंवा परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारण्याची वृत्ती, प्रवृत्ती आली की मग दुःखाची बातच येत नाही.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply