व्यक्तित्व म्हणजे वेगळे, निराळे अस्तित्व असलेली व्यक्ती. प्रत्येकास जन्मतः स्वतःचे असे व्यक्तित्व असतेच. या व्यक्तित्वावर सामाजिक परिस्थितीचा प्रभाव पडल्यावर व्यक्तित्वाचे व्यक्तिमत्वात रुपांतर होत असते. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्ती जशी आहे तशी, म्हणजे व्यक्तीची शारीरिक ठेवण, बुद्धी, चारित्र्य, कर्तृत्व, गुण आदींचा समावेश त्यात होतो. व्यक्तीचा शारीरिक, भावनिक आणि सामाजिक विकास होत असतो. ह्या विकासातून तिचा पिंड घडत असतो. व्यक्तीचा हा घडलेला पिंड म्हणजे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व असते.
इंग्रजीत पर्सनेलिटी ही संज्ञा व्यक्तिमत्वास वापरतात. पर्सोना या शब्दापासून पर्सनेलिटी हा शब्द तयार झाला. पर्सोना म्हणजे मुखवटा; रोमन काळात नट तोंडावर मुखवटा घालून बोलत असत; अर्थातच जसे पात्र तसा मुखवटा. जसा मुखवटा तसा आवाज आणि भाषण. त्यामुळेच व्यक्तिमत्व म्हणजे बाह्य दर्शन असा अर्थ घेतला जात असतो. व्यक्तिमत्वाचा हा अर्थ एकांगी असल्याचे म्हंटले तर निश्चितच वावगे ठरणार नाही. ह्यामध्ये व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा, बुद्धीचा, भावनांचा, गुणांचा आणि वृत्तीचा अंतर्भाव होत नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे ही व्याख्या परिपूर्ण होऊ शकत नाही. व्यक्तिमत्वात व्यक्तीची शरीरयष्टी, चेहरेपट्टी, ठेवण, बांधा, त्याची बुध्दिकौशाल्ये, क्षमता, अभिरुची, आवडनिवड, संपादित गुण इत्यादी बाबींचा प्राधान्यक्रमानुसार साकल्याने विचार केला पाहिजे. ह्या सर्वांची व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तिजीवन जगण्यापर्यंत झालेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व, असे म्हणल्यास ते व्यक्तिमत्वाच्या व्याख्येच्या दृष्टीकोनातून योग्य ठरू शकते.
प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात; त्यातील काही गुण इतरांसारखे देखील असतात, तर काही गुण इतरांपेक्षा वेगळे, निराळे असतात. खरे तर ह्या वेगळ्या गुणांमुळेच ती व्यक्ती ओळखता येते. म्हणूनच, व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीमधील वैविध्यपूर्ण गुणविशेषांचा वैशिष्ट्यपूर्ण संच होय.
व्यक्तिमत्व विकास हि एक व्यापक संकल्पना आहे. त्यामध्ये, शारीरिक विकास, भावनिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, आत्मिक विकास अशा अनेक बाबींचा समावेश असल्याचे दिसून येत असते. सध्याच्या काळांत व्यावसायिक क्षेत्रात आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी फक्त उच्च शिक्षण असून चालत नाही; त्यासोबत आपल्यातील आत्मविश्वास सुद्धा महत्वाचा ठरत असतो. आपल्या व्यक्तिमत्वाचा किती प्रभाव पडतो, ह्यावर आपल्या कामाचा आलेख ठरविला जात असतो. आपण कोणत्याही व्यावसायिक क्षेत्रात काम करत असताना आपल्या वक्तृत्वाचा खूप मोठा प्रभाव पडत असतो. आपण आपले विचार, विषय किती तार्किक पद्धतीने, अगदी सोप्या भाषेत, सोयीस्कररित्या, न अडखळता, धीटपणाने आणि समोरच्या व्यक्तीला पटतील असे मांडू शकल्यास आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव निश्चितच समोरच्या व्यक्तीवर पडतो. समोरची व्यक्ती बोलत असताना तेवढ्याच शांततेने, त्या व्यक्तीला ऐकून घेण्याची क्षमता सुद्धा आपल्यात असल्यास, आपल्या व्यक्तित्वाला एक आकार, एक वेगळे महत्व मिळू शकते.
विद्यावाचस्पती विद्यानंद
Leave a Reply