नवीन लेखन...

व्यंगचित्र साप्ताहिकाचा पहिला माज-हिंदुपंच

मराठीतल्या पहिल्या व्यंगचित्र साप्ताहिकाचे नाव आहे हिंदूपंच. त्याचा पहिला अंक २१ मार्च१८७२ रोजी प्रसिद्ध झाला. ठाणे शहरातून एक आगळ्या वेगळ्या प्रकारचे वृत्तपत्र काढण्याचा प्रयत्न तब्बल १४ वर्षांपूर्वी झाला. त्याला निश्चितपणे ऐतिहासिक महत्त्व आहे. गोपाळ गोविंद दाबक हे त्याचे मालक चालक संपादक होते. पुढे त्यांची जबाबदारी कृष्णाजी काशिनाथ ऊर्फ तात्या फडके यांच्यावर आल्यावर त्यांनी त्या पत्राचा प्रभाव चांगलाच वाढवला. त्या काळात पंच या नावाचे इंग्रजी भाषेतील व्यंगचित्र साप्ताहिक होते. त्याचे उदाहरण क्वचितच हिंदुपंच काढतांना दाबक यांच्यासमोर असावे. १४ वर्षाहून अधिक वर्षांपूर्वी ठाण्यातल्या एखाद्या व्यक्तीला, विनोदाला प्राधान्य असलेले साप्ताहिक आपण काढावे असे वाटावे ही विशेष बाब म्हणावी लागेल. त्या काळच्या विविधज्ञानविस्तारच्या एका अंकात साप्ताहिकाबद्दल प्रसिद्ध झालेली जाहिरात खूपच बोलकी होती. एखाद्या विषयाची संपर्कद्वारे थट्टा करून तिचे हुबेहूब स्वरूप वाचकाच्या मनावर बिंबवणे हा मुख्य उद्देश असल्याचा मजकूर त्या जाहिरातीत होता.

‘हिंदुपंच’ हे त्याच्या वैशिष्ट्यामुळे खूप गाजले. उपहास, उपरोध, कारुण्य, विसंगती, फिरक्या, अतिशयोक्ती ही त्याची प्रमुख शस्त्रे होती. व्यंगावर बोटे ठेवून मर्मभेद करण्याचा त्याचा बाणा असे. परदेशी राजकारणावरही व्यंगचित्रे प्रसिद्ध होत असत. सुशिक्षितास हिंदुपंच वाचावासा वाटे. त्यातील हास्यचित्रे पाहून त्यांची कळी खुले. विनोद मार्मिक असे, तर लिखाण तिखट असे. त्याकाळी हिंदुपंच याचे नाव सर्वतोमुखी झाले. ठाण्याच्या या वृत्तपत्राने मराठी वृत्तपत्रांच्या क्षेत्रात हास्यविनोदात आणि सचित्र मजकुराचे एक नवे दालन उघडले असे म्हणावे लागेल.

फडके नव्हे ‘पंचआजोबा’

मराठीतील प्रसिद्ध लेखक वि. द. घाटे यांनी ‘दिवस असे होते’ या आपल्या पुस्तकात, तसेच संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी आपल्या संपादकीयामध्ये हिंदूपंचचे गुणगान केल्याचे आढळून येते. प्रसिद्ध लेखिका सरोजिनी वैद्य यांनी हिंदूपंचचे काही अंक वाचल्यानंतर व्यक्त केलेली प्रतिक्रिया अधिक बोलकी होती. ‘आधुनिक काळात मराठी विनोदाचा प्रारंभ श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या सुदाम्याच्या पोह्यांपासून झाला हे सांगताना पंच आजोबांनी उगारलेला सोटा मला दिसू लागला!’ असे त्यांनी १९७८ च्या ललितच्या दिवाळी अंकात लिहिताना म्हटले आहे. कृष्णाजी काशिनाथ उर्फ तात्या फडके यांनी गंभीर विषयावर लिहिण्याचा शोधलेला हा वेगळा मार्ग त्या काळात तर फारच नवीन होता असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. ‘स्वतः वर त्यांनी तरुणपणीच आजोबांचा मुखवटा चढवून घेतला आणि आपल्या खऱ्या नावापेक्षा ‘पंचआजोबा’ या टोपण नावाने लाल पगडी, जरीकाठी उपरणे, पिवळसर धोतर, भरघोस मिशा आणि पुणेरी जोडा अशा तत्कालीन प्रातिनिधिक पोशाखाने आपल्या देशातील गल्लीबोळापासून अनेक देशांच्या राजधान्यापर्यंत सर्वत्र वावरणे स्वीकारले’ असे फडके यांच्याबद्दलचे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे.

हसू फुटणारे लिखाण

या टोपणनावी पंच आजोबांनी ‘हिंदुपंच’च्या अंकातून विनोदी लिखाण करून तत्कालीन गंभीर मराठी माणसाला हसायला शिकविले. त्यांच्या निवडक लिखाणाची काहीशी झलक खाली दिली आहे. ती वाचून आजही हसू आल्याशिवाय राहणार नाही. लेकीसुनांनी व खट्याळ पोरींनी घेतलेले उखाणे वाचा म्हणजे कळेल. त्यातली गंमत म्हणजे जमाडी जंमत.

१. वाटल्या डाळीचं केलं पिठलं ।

त्यात खोबरं घातलं किसून,

त्रिविक्रमशास्त्री गेले रुसून

तेव्हा राधेनं खाल्लं चाटून पुसून ॥

२. मखमली गादी तिथे किनखापाची ऊशी,

राधा गेली पलंगा पाशी

तर अनंत भट म्हणतात आज एकादशी.

३. गंगेची वाळू चाळणीने चाळू

घरी गेल्याकर श्रीधरराव म्हणतील सारीपाट खेळू.

४. चालणं कसं चटकदार

बोलणं कसं कटकदार

पागोट्याची अक्कड नि

गणपतराव फक्कड

हिंदूपंचच्या अंकात आजोबांनी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या व नेमणुका कशा गमतीशीर आहे ते पहा.

ता – तलखी. माहे – उन्हाळा. सन हुश हुश. मेसर्स अंजिरे व द्राक्षे आपल्या कामावर मंडई ऑफिसात रुजू झाली होती. परंतु मध्यंतरी रा. ब. पावसोपंत उर्फ पर्जन्य राव यांची गारांसह अतिशय वृष्टी झाल्यामुळे हर्दु ऑफिस सरांच्या प्रकृतीस जरा मांद्य आल्यावरून मंडई ऑफिसचे जुजबी काम सांभाळून त्यास रजा दिली आहे.

अजम मातीचे घडे व कज्जे यांची उन्हाळ्याकरिता सर्व लोकांस गार गार पाणी पुरविण्याकडे स्पेशल नेमणूक केली आहे.

मेसर्स खरबूजे, टरबूजे उर्फ कलिंगड आणि सौ. काकड्या यांस आपल्या ऋतूचे काम सांभाळून चैत्र मासाच्या हळदीकुंकवाचे अॅडिशनल काम दिलेले आहे. उन्हाळी छत्र्या यांजकडून यंदाचा उन्हाळा फार जाणवतो असा तक्रारी अर्ज आल्यावरून कित्येकांस अच्छादनार्थ स्वच्छ कपड्याचे अभ्रे करण्याच्या सँक्शनची मंजुरी देण्यात आली.

रा. रा. हिरवे आंबे उर्फ कैऱ्या यांची गोड पन्हे व फोडणीचे लोणचे या कामावर सालाबादप्रमाणे परंतु फारच जुजबी नेमणूक करण्यात आली आहे.

मासिकांची वर्गणी आज जशी तुंबते तशी त्या काळीही तुंबत होती. तुंबलेली वर्गणी मागण्याची हिंदुपंच आजोबांची पद्धत अशी आहे.

‘पाठवा माहेरवाशिणीला सासरी पाठवा. वर्गणी न देणारा कृष्णावलीत (ब्लॅक लिस्ट) दाखल होईल असे म्हणतो. पण करतो कुठे? वर्गणी पाठवा. पितृपक्ष आला आहे म्हणून. पाठवा आमंत्रणे तरास आणि मारा क्षीरोदकाकर हात! पण म्हाताऱ्याची आठवण विसरू नका.’

आजपर्यंत एका हातात पंखा आणि दुसऱ्या हातात पंचपत्रिका अशा थाटाने हुश हुश करीत लोक पहुडले होते. पण आता तो काळ बदलला. जिकडे तिकडे गारीगार होण्याची संधी आली. तर मग उशीर का?आता पंचाचे दाम ताबडतोब पाठवून उतराई व्हा. कसे ! आपल्या कापण्याचा हुर्डा खात पंचाचे दाम पाठविण्यास काल तर तुमच्या नावाचा हुर्डा होईल हे लक्षात बाळगा.

‘आंतरभारती’ कल्पनेचा जनक जहाल जहाल राजकारणाचा पुरस्कार या पत्रातून होत असे. वाळवाद, दारूबंदी बहिष्कार, स्वदेशी आदी अनेक विषयांवर व्यंगचित्रे प्रसिद्ध होत असत. शेष म्हणजे हिंदुपंचची हिंदी आवृत्ती उत्तर प्रदेशातील काशीहून निघत होती. लक्ष्मण नारायण गर्दे हे हिंदी आवृत्तीचे संपादक होते. पंडित गोविंदशास्त्री दुगवेकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. मराठी व्यंगचित्र साप्ताहिकाची हिंदी आवृत्ती त्याकाळी काशीहून निघणे हा मराठी पत्रकारितेचा इतिहासातील एक विक्रमच म्हणायला हवा. केवळ ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर मराठी पत्रकारितेच्या इतिहासात हिंदुपंचच्या कामगिरी व – कर्तबगारीला निश्चितपणे असाधारण महत्व आहे. त्या काळी तात्यासाहेब केळकर यांनी लोकमान्य टिळकांचे चरित्र लिहिले. ते मराठीत होते. महाराष्ट्राबाहेरील भारतीयांना ते वाचावयास मिळाले तर त्यांना त्यापासून. र्ती मिळेल. म्हणून त्याचे हिंदी भाषांतर करायला हवे असे त्यांच्या मनाने घेतले. आंतरभारतीची कल्पना ज्यावेळी कोणाच्या मनाला चाटून गेली नव्हती. वेळी धोंडोपंत फडके यांना ही कल्पना सुचली. नी तात्यासाहेब केळकरांकडे एक हजार रुपये पाठवून भाषांतराचे हक्क घेतले. भाषांतरासाठी काशीहून दोन पंडित बोलाविले. त्यांच्या राहण्या जेवणाची सोय आपल्या घरी करून त्यांना दोनशे रुपये मानधन दिले. स्तक छापलं आणि प्रसिद्धीसाठी नागपूर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात राजाराम सखाराम भागवत यांच्याबरोबर पाठवून दिलं. या उद्योगात त्यांचे अक्षरशः हजारो रुपये गेले. प्राप्ती काडीची नाही उलट सारा तोटाच. पण जे केले होते ते देशहिताच्या तळमळीने.  केव्हढा होता हा त्याग ! मवाळ पंथाचे गोपाळ कृष्ण गोखले यांच्यावर हिंदूपंचममध्ये टीकेची झोड उठवली जात असे. कमान्य टिळकांच्या खटल्यात गोखले कारणीभूत आहेत असे समजून त्यांच्यावर व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका करण्यात आली तेव्हा आपल्या मित्रांच्या सहाय्याने हिंदूपंचावर खटला दाखल झाला. सदर प्रकरणात हायकोर्टाने छापखाना जप्त केला आणि त्यात हिंदूपंच बंद पडले. वृत्तपत्र बंद पडल्याचे कळल्यामुळे तात्या फडके यांची अवस्था कठीण झाली पण ही गोष्ट गोखले यांना समजताच त्यांनी तात्या फडके यांना बहुमोल मदत केली. तत्वासाठी लढतानाही नियत व दानत कशी असावी याची प्रचिती देणारे हे दुर्मिळ उदाहरण आहे. आज कालच्या सर्व पत्रकारांना त्यापासून खूप काही शिकण्यासारखे आहे.

तब्बल ३८ वर्षे या वृत्तपत्राने आपला दबदबा लोकमानसावर कायम ठेवला. हिंदूपंचाचा प्रसार, दरारा व वाचक वर्गांमधील त्याचे प्रेम हे सर्व काही ठाणेकरांना अभिमान वाटावे असे आहे. ‘अरुणोदय’ हे ठाणे जिल्ह्याचे पहिले वृत्तपत्र. त्यांचे संपादक धोंडो काशिनाथ फडके यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झाली. त्यावेळी ही शिक्षा तात्या फडके यांना सुद्धा व्हावयास हवी होती. कारण ते त्यांच्या बंधूंपेक्षा अधिक बदमाश आहेत अशा प्रतिक्रियेची नोंद तत्कालीन पोलीस अॅबस्ट्रॅक्टमध्ये नमूद आहे.

१९०९ साली हिंदुपंच साप्ताहिक बंद पडले, तरी पण आजोबांची लेखनाची हौस काही थांबली नाही. ‘विक्षिप्त’, ‘विनोद’ इ. वृत्तपत्रातून ते लेखन करीतच राहिले. एवढेच नाही तर त्यांनी स्वतःचे ‘विदूषक’ हे नवे साप्ताहिकही काढले.

त्याचे तेरा अंक निघाले. चौदाव्या अंकाची जुळवाजुळव सुरू असतानाच तात्या फडके यांचे अचानक निधन होऊन ‘विदुषक’ बंद पडले. १९२० सालच्या मध्यास त्यांचा मृत्यू झाला. १४७ वर्षापूर्वी ठाण्यातून पहिले व्यंगचित्र साप्ताहिक निघाले. फडके बंधूंचे त्यामधील योगदान मोठे आहे. ठाणे जिल्ह्याच्या पत्रकारितेचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्यावेळी ठाणे शहराच्या या मानाची दखल घ्यावीच लागेल.

व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात श्री. वा. नेर्लेकर (ज्येष्ठ पत्रकार) यांनी  लिहिलेला लेख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..