व्यसने झाली थोडी
म्हणूनी अध्यात्म करितो
कुठला वेडा सांगा
कलयुगी रामनाम घेतो
अर्थ-
“” वाचलं का ? मी लिहिलेलं?””, मी विचारलं.
“” नाही रे, अध्यात्म हा विषय माझा नाही, बोर होतं मला ते तसलं काहीसं वाचून, सॉरी पण नाही आवडत मला हा विषय सो नाही वाचलं मी.”” मित्राने स्पष्ट मत दिलं.
“” रागावू नकोस रे मित्रा, मला खरंच आवडत नाही हे असं तत्वज्ञान वगैरे, मला असं हलकं फुलकं किंवा रहस्यमय, सस्पेन्स वगैरे आवडतं.”” त्याला माझी दया आल्यासारखं त्याने स्पष्टीकरण दिलं.
त्याने जे काही कारण दिलं ते ऐकून खरं तर राग यायला हवा होता. पण मला राग येण्या ऐवजी छान वाटलं. निदान त्याने त्याचं मत मोकळेपणाने मांडलं तरी. उगाच मित्राला काय वाटेल या भीतीने किंवा मित्र उगाच लेक्चर देईल या भावनेने त्याने हो हो मस्त लिहितोस एकदम भारी असं खोटं तरी नाही सांगितलं. मुळात इथे त्याला काय आवडतं आणि काय आवडत नाही हे पूर्ण पणे ठाऊक आहे यातच अध्यात्म आहे. आणि मला त्याने असं तोंडावर सांगून सुद्धा मला त्याचा राग न येण हेही अध्यात्माचं लक्षण नाही का?
आज मुद्दाम ह्यावर लिहिण्याचं कारण असं की कलयुगी असा कोण आहे, विचारें मना तेच शोधुनी पाहें आजच्या जगात फास्ट लाईफ, फास्ट फूड आणि फास्ट maturity हे सगळं हवंहवंसं वाटतं. खरंतर ते तसं होतं म्हणून आजची पिढी जास्त हुषार, स्पष्टव्यक्ति, धाडसी जगू लागली आहे.
“” भाऊ श्री समर्थां वरचा चित्रपट पाहिलास का?”” या प्रश्नाला “” नाही रे, पण सध्या एक वेब सिरीज पाहतोय, ऍमेझॉन वर चार मैत्रिणींची गोष्ट, फुलटू आहे एकदम, बघ तू पण, आवडेल तुला”” हे उत्तर ऐकायला मिळणं ही खरी समस्या आहे.
प्रत्येकानेच घरी बसून किंवा कामाच्या ठिकाणी रामनामाचा गजर करायलाच हवा अशा मताचा मी अजिबात नाही. मी सुद्धा असे काही करत नाही. पण संस्कृती सोडून वागणे, बघणे, ऐकणे, करणे, मज्जा म्हणून, पैशांसाठी म्हणून, गरज
म्हणून, आवड म्हणून, उगाचच म्हणून, एकदा पहावं करून म्हणून जर आपण नसायचं सोडून डोक्याला बांधणार असू तर मग संस्कृती, संस्कार, रूढी परंपरा या शब्दांना अर्थ काय राहिला?.
फेसबुक वर निर्भया केसचा निर्भीडपणे विरोध करणारे जर आपल्या भागातल्या, शाळा, कॉलेज, ऑफिस इथल्या निर्भयांना जर त्याच नजरेने पहात असतील तर इथे अध्यात्माची गरज आहे. केवळ रामनाम घेऊन चुकीची वासना किंवा लोभ,हव्यास कमी होत नाही त्यासाठी आधी आपले विचार आणि दृष्टिकोन बदलता आला पाहिजे.
निदान चांगलं काय हे न शोधता चुकीचे काय हे जर कळले तर चांगले काय हे आपोआप समजेल.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply