कधी कधी वाटतं…
सालं हे लिखाण वगैरे सोडून द्यावं कायमचं.
स्नुझ व्हावं जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात.
कल्पनेची नशा दारूपेक्षाही वाईट असते म्हणून….
पुन्हा कधीच,व्हाट्सएप,फेसबुक,इन्स्टावर सुद्धा दिसू नये आपण.
एकदम अदृश्य व्हावं.कायमस्वरूपी.
पक्षांसारखा आपला मृत्यू कळूही नये कुणाला.
कोणी लिहू ही नये कॉमेंटमध्ये दत्तू भावपूर्ण श्रद्धांजली वगैरे….
जिवंत असतांना कवी कळला नाही तर …
मेल्यानंतर त्याची कविता काय कळणार लोकांना..?
लिहिणं म्हणजे फकीर होणं जर असेल तर मला नकोच…
नकोच सरस्वतीने दिलेलं हे लिखाणाच वरदान वगैरे.
नको बसायला शिक्का कवी म्हणून माझ्या भाळावर.
साला कविता लिहिणं,सादर करणं, कंपू सांभाळणं..
आणि हो….
हे पुरस्कार देणं, घेणं च्यामारी ही तर मोठ्यांची कामं.
चुकलंच आमचं.
आपण फक्त दारिद्रय रेषेसारखं या कवीरेषेच्या खाली तळमळणारे जीव वगैरे.
इतकीच आपली ओळख असेल तर….
तर लागावी आग माझ्या शेकडो कवितेच्या पानांना…
जळून जावो माझ्यातलं कविपन, आणि हो …
कवीमन सुद्धा.
चुकलास ज्ञानोबा ….
अरे जे खळांची व्यंकटी सांडो लिहिण्यापेक्षा…
जे कळांची व्यंकटी सांडो असं का बरं सुचलं नाही तुला.?
अरे तुकोबा, बरं सुचलं रे तुला ते गाथा पाण्यात बुडवणं वगैरे.
नाहीतर आलं नसतं तुला रितेपन आपल्याच भोवतालच्या जगातलं.
तुझ्यासारखं वैकुंठ गमन करता यायला हवं मला.
कवी वापरला जातो हवा तसा…
कवी ठोकरला ही जातो हवा तसा.
म्हणून मी माझी गाथा मिटवावी म्हणतोय.
तूर्तास……
भेटू आपण पुढल्या जन्मी.
आता हे जे लिहिलंय त्याला कविता म्हणूनच नये कोणी.
की कोणी प्रशंसा ही करू नये माझी वाह वा ,मस्त आहे म्हणून.
वेदनेला भार झाला…
व्यक्त झालो.सांडून टाकलं स्वतःला.
याला कविता नका म्हणू.
इतकंच सांगायचं होतं.
दत्तात्रय गुरव.
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपचे लेखक
संपर्क- ८६०५५२३६१८.
Leave a Reply