व्यवहारे जैसे पहाणे
तैसे नजरेला न तोलणे
व्यर्थ ते केवळ बोलणे
हक्कासाठी!!
अर्थ–
प्रत्येक गोष्टीला व्यवहारात आणले तर ती गोष्ट गोष्ट न राहून त्याला व्यवहाराचा मुलामा चढतो आणि मग केवळ व्यवहारा साठी माणूस जगतो. पण व्यवहार या व्यतिरिक्त जगात भावना, प्रेम या सारख्या व्यवहारा पेक्षा किती तरी उच्च स्थानी विराजमान असलेल्या गोष्टी आहेत हे नाकारून चालणार नाही.
जेथे व्यवहार तेथे व्यवहार, नसावा अल्पोपहार, मग शहाणा जाणती फार, स्वार्थासाठी
एकदा का ठराविक चष्मा लावून बाहेर पडले की सारे तसेच दिसू लागते पण त्यात नाती, मैत्री, कर्म, धर्म, जगण्यातले मर्म सारे काही झाकोळले जातात. व्यवहार शिकवतो कसे जगावे पण कोणासोबत कसे हे मात्र व्यवहार शिकवीत नाही. त्यासाठी व्यवहाराचा चष्मा काढून चालणे गरजेचे असते.
म्हणून व्यवहार हा आयुष्याचा मार्ग नसून त्याने मागितलेले हक्क केवळ व्यावहारिक दृष्ट्या टिकतात, त्याचा आयुष्य जगण्याशी संबंध फार थोडा उरतो. हक्क कधी, कशाचा, कोणावर आणि किती मागावा हे कळणे सोप्पे नाही. कित्येक मूर्ख त्यात आपले आयुष्य जळू देतात आणि मग आयुष्यभर तेच डाग पुसण्याचा निरर्थक प्रयत्न करीत रहातात.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply