नवीन लेखन...

व्यवहार

आईला काय भुगा केलाय ह्या दारुड्यानी डोक्याचा !! राघवच्या मनात आले , त्या म्हाद्याला यथेच्छ बुकलून काढावे असे त्याला वाटू लागले . मनातल्या मनात राघवने खूप दात ओठ खाल्ले पण प्रत्यक्षात तो मूग गिळून गप बसला होता . खरं तर व्यवहाराचे सगळे पैसे देऊन झाले होते , पण म्हाद्या काही ऐकायला तयार नव्हता . आता याला कसे समजवावे , रघु ची मतिकुंठित झाली होती . शेवटी राजूच जरा शेवटचा प्रयत्न म्हणून म्हाद्या शी बोलत होता . तोवर राघव बाजूला बसून दम खात होता .

एकूण प्रकरण अशी पलटी खाईल असे त्यालाच काय प्रत्यक्ष म्हादूच्या लेकाला देखील वाटले नव्हते . गेल्या 2-3 महिन्यातल्या या गोष्टी शेवटी अशा रीतीने वळण घेतील ? काय म्हणावे याला ? दीड दमडीचा हा दारुडा ! स्वतःची काही पत नाही केवळ सात बाऱ्यावर नाव आहे म्हणून याचे पाय धरायचे ? धंदा सोडून काय भलतंच लचांड हे ?
3 महिन्यांपूर्वी नव्या फॅक्टरी ला जागा पाहिजे म्हणून , राघवने जागा बघितली . त्याच्याच फॅक्टरीतल्या लेबरच्या गावच्या एका राजुचा हा एक प्लॉट होता , त्यालाही विकायचा होता. किमतींविषयी बोलणं होऊन फारशी झिग झिग न होता किंमत ठरली . तेव्हडे पैसे गोळा करायला राघव ला 2 महिने लागले , आजचा व्यवहार ठरला .

जमीन राजुच्या वडलाच्या – म्हाद्याच्या नावावर होती. पण त्यात काही अडचण नव्हती . तसाही म्हाद्या काही काम धंदा करायच्या लायकीचा नव्हता . दारू पिऊन पडले राहायचे एवढं एकच तो करायचा . त्यामुळे व्यवहाराच्या दिवशी त्याला आणले कि काम झाले , राजुला त्यात काहीच प्रॉब्लेम दिसत नव्हता. त्याने तसे आपल्या वड …. बापाला सांगितले होते . “17 तारखेला तालुक्याच्या गावी जायचया , सही करायचिया , त्या दिवशी प्याचं न्हाई , शान्या माणसावानी जाऊन सही कराची . आपल्याले पैसं मिळालया , तिथं तमाशा कराचा न्हाई.” म्हाद्याने शान्या माणसावानी मान डोलावली होती .
राघवने राजुला 45 लाख रुपये एकरकमी दिले होते . तेही बापासमोर !! त्यावेळीही राजू पैसे ठेवायला आत गेला तशी म्हाद्या बेशरम सारखं बोलला होता , “ते तुम्ही त्याला दिले ….मलाबी वाईच च्या पान्याला थोडं …… हीहीहीही ……….”. वास्तविक राजू ला म्हणजे म्हाद्यालाच पैसे मिळाले होते . एव्हढा व्यवहार बापाला झेपला नस्ता म्हणून बापाच्या वतीनं राजुने तो केला होता, इतकंच .

पण व्यवहार होईतो याला खुश ठेवावे असे वाटल्याने किंवा कीव आल्यामुळे राघवने त्याच्या हातावर 2000/- रुपये टेकवले . दारुड्याला काय , फुकटचे मिळाले , तो तेव्हढ्यावरही खुश झाला .

आज व्यवहार म्हणून , कालच राघवने सगळी कागदपत्र तयार ठेवली होती , वकीलाशी बोलणे झाले होते , त्याला आठवण केली , तोही तयार होता . शेवटचे काही थोडे पैसे बाकी ठेवले होते , इकडे सही झाली कि लगेच तेव्हढ्या पैशाचा चेक देणार . कितीही नाही म्हंटले तरी सकाळपासून तो जरा बेचैन नाही , पण सतर्क होता . डोक्यात हा फक्त व्यवहार होता , दुसरे सगळे issues फोकस च्या बाहेर होते .

ठरल्याप्रमाणे राघव regitrar च्या ऑफिस मध्ये पोचला , 10 मिनिटात वकीलही आला. राजुला पोहचायला थोडा वेळ होता . राघव मुंबईहून 2 तास गाडी चालवत आला होता . तो जरा फ्रेश झाला , पाणी , चहा पिऊन त्याला तरतरी आली . त्यानं पुनः एकदा सगळे दस्त तपासले . व्यवस्थित होते . PAN . आधार कार्ड जागेवर होते. राजू आला तशी राघवची नजर त्याच्या मागे पुढे घुटमळत होती , म्हाद्या आलाय ना ? डोळ्यांनी एकदा खात्री करायची होती . तो कुठे दिसला नाही . त्याने राजुला विचारले तसे राजुने कोपऱ्यात खूण केली . म्हाद्या आधीच येऊन बाकावरची कडेची सीट पकडून बसला होता . तो दिसायला इतका चिरकुट होता कि कधी येऊन बसला ते राघवला कळले पण नव्हते . त्याने मनातच हुश्श केले. महाशय शुद्धीत दिसतात, का नाही ? शांतपणे जमिनीकडे टक लावून बसलेल्या म्हाद्याला पाहून त्याने अंदाज लावायचा प्रयत्न केला .

आपला नंबर कधी येतो त्याची तो चौकशी करून आला , अजून मध्ये 3-4 नंबर होते त्यामुळे वाट बघत बसला राहिला . मधेच म्हाद्याची नजर वर गेल्यावर , काय बाबा बराय ना ? त्याने विचारले . म्हाद्याने मान हलवली तसे गडी tight आहे हे राघव च्या लक्षात आले .

शेवटी एकदाचा राघव च्या registry चा नंबर आला . राघव , त्याचा वकील , राजू व म्हाद्या Ragistrar च्या ऑफिस मध्ये जाऊ लागले , तसे म्हाद्याची स्थिती राघव च्या लक्षात आली . राजुने कितीही समजावले तरीही म्हाद्या नुसता पिऊन आला नव्हता तर त्याचं विमान पार ढगाच्या वरून उडत होतं . तो जेमतेम पावलं टाकत होता , अधांतरी तरंगल्यासारखे चालत होता .ते बघून राघवच्या डोक्यात सणक गेली , पण जाऊदे एव्हढी सही अंगठा झाले कि झाले , आपल्याला कायकरायचेय असे म्हणत तो गप राहिला . रेजिस्ट्रार गावाच्या पद्धतीप्रमाणे सगळे डिटेल्स मोठ्याने वाचू लागला . ते ऐकून लिहून देणार व लिहून घेणार यांनी मौखिक मान्यता दिली कि सह्या करण्याचे काम होते . नंतर सरकारी नोंदी झाल्या कि काम झाले . खरेदीखताची प्रत मग काही दिवसांनी मिळते . रेजिस्ट्रार वाचू लागला , “लिहून देणार – महादेव भीमा भोईर राहणार ……………”राजू हा हा म्हणत होता. रेजिस्ट्रार म्हणाला , महादेव भोईर कोण आहेत ? तसा राजुने म्हाद्याचा हात वर केला , “हां हे आहेत ” . ” मग त्यांनी बोलायचं , त्यांना बोलू द्या ” राजू गप झाला , “बोल कि बा ” हळूच त्याला म्हणाला . तसा म्हाद्या बरळला -“हां हां बराबर “. ” लिहून घेणार राघव सीताराम दळवी राहणार …………..” लिहून घेणारने आपले तपशील ऐकून कन्फर्म केले . registrar गावाच्या पद्धतीप्रमाणे चालू होता – “श्री महादेव भोईर यांनी श्री राघव दळवी यांना आपली जमीन 50 लाखाच्या वायद्याने विकण्याचे मान्य केले आहे . श्री राघव दळवी यांनी व्यवहाराची पूर्ण रक्कम दिली आहे का ? ” राघव बोलला , ” साहेब 45 लाखाची रक्कम मागेच दिली होती , बाकी आज दिली ” रेजिस्ट्रार पुढे बोलला , ” महादेव भोईर , 50 लाख रुपये मिळाले हे आपल्याला कबुल आहे ? ” म्हाद्या जेमतेम भिंतीचा टेकू घेऊन उभा होता , त्यानं हो मिळाले म्हणणे अपेक्षित होते , पण तो काही बोलायला तयार नव्हता , इकडे तिकडे बघत होता . “बा बोल कि , मिळाले न्हवं पैसे ? ” म्हाद्यानं उगाच कान खाजवला . राजू अधिकाऱ्याला म्हणाला , “आवो मी मुलगा हाय त्याचा , मिळाले आम्हाला पैसे “. ” अहो ते ठीक आहे , पण तसं महादेव भोईरांनी म्हणाय पाहिज ना , तुम्ही म्हणून कसं चालेल ? जमिन कुणाच्या नावावर आहे ? ” असे ऐकल्यावर राजू जरा वरमला . बाप काय माज करतोय त्याच्या लक्षात येईना . एक तर नको सांगितलं तरी म्हाद्या पिऊन तर्रर्र होऊन आल्यामुळे त्याच्या डोक्यात फुफाटा पेटला होता . शेवटी तो म्हाद्याला हलवून म्हणाला , “बा हा म्हन” . म्हाद्या काही हा म्हणना . राघव : “अहो त्या दिवशी आणून दिले ना तुम्हाला पैसे ? तुमच्या मुलाने ठेवले बघा , विसरले का ? ”
म्हाद्या नुसताच समोर बघत होता , थंड नजरेनी !! हा मुद्दाम करतोय का ह्याला खूपच चढलीये , त्यामुळे काहीच कळत नाहीये ? राघव बुचकळ्यात पडला , असा काही प्रसंग घडेल त्याच्या स्वप्नातही नव्हते . पण दारूच्या नशेत असला तरी आपला बाप स्वतःचा इरसाल पणा सोडत नाहीये हे राजुच्या लक्षात आले होते . राघव सारखा आपल्या मैतराचा boss , भला माणूस . सरळ येव्हार करतोय अन बा काय उगाच इज्जत घालवतोय . !! त्याने पुन्हा बापाला हलवले , ” बा आपल्याला पैसं मिळालं , आता सांग सायबाला आन सही कर ” तरी म्हाद्या ढिम्म !! त्याने एका हाताचे 5 बोटं पसरून अधिकाऱ्याला दाखवले आणि बोलला , “राह्यलं “. आधी राघवच्या लक्षातच आले नाही, पण अधिकारी बोलला , ” काय ? राह्यलं ? किती राह्यलं ? ” म्हाद्या पुन्हा गप ! नुसते 5 बोटं दाखवत राहिला जेमतेम डोलत . “किती ? पाच लाख ? ” म्हाद्या गप . इकडे राघव चे BP वाढू लागले . सरळ सरळ खोटं बोलतोय हा दारुडा ! आईला काय भुगा केलाय ह्या दारुड्यानी डोक्याचा !! राघवच्या मनात आले , त्याला यथेच्छ बुकलून काढावे असे त्याला वाटू लागले . मनातल्या मनात खूप दात ओठ खाल्ले पण प्रत्यक्षात तो मूग गिळून गप बसला होता . खरं तर व्यवहाराचे सगळे पैसे देऊन झाले होते , पण म्हाद्या काही ऐकायला तयार नव्हता . आता याला कसे समजवावे , रघु ची मातिकुंठित zali होती . शेवटी राजूच जरा शेवटचा प्रयत्न म्हणून म्हाद्या शी बोलत होता . तोवर राघव बाजूला बसून दम खात होता .

दारूच्या नशेत म्हाद्या सारखा सारखा फक्त पाच बोटं दाखवून राह्यले म्हणत होता . अजून सगळ्या सह्या व्हायच्या होत्या , बाहेर गर्दी जमा होऊ लागली होती . ऐनवेळी केवळ पाच बोटे दाखवून हा इरसाल म्हातारा , दारुड्या कुठचा , नसती नाटकं करत होता . अजूनही त्याच्या पाच बोटांचा अर्थ लागला नव्हता . आईला पाच काय ? काय म्हणायचंय काय याला ? पाच लाख ? पाच हजार , कि पाच शे ? काय? अधिकाऱ्याला थोडं लक्षात आले होते पण दोन्ही पार्टीनी होकार भरल्याशिवाय व्यवहार होत नसे .त्यामुळे तो अजूनही त्या प्रयत्नात होता .

थोड्य वेळाने न राहवून राघव पुन्हा टेबलापाशी गेला, मध्यंतरीच्या काळात मॅटर काहीच पुढे गेले नव्हते . “5 हजार?” म्हाद्या गप . आता राजुही चिडला ! ” बा काय नाटक करायला ? बोल कि सरळ ? ” त्यानं जोरात बापाच्या पाठीत थाप मारली , अन काय ! म्हाद्या खालीच पडला धाडकन ! अरे बाप रे ! गचकला का काय ? राघवच्या छातीत धस्स झाले ! त्याने घाबरून राजुकडे पहिले . राजू रागाने , घामाघूम चेहऱ्याने खाली पडलेल्या बापाकडे पाहात होता.

एव्हाना या पार्टीला फारच वेळ लागतोय असे बघून थांबलेली इतर मंडळी इकडे तिकडे पांगली होती . ऑफिसचा बराच स्टाफ जेवायच्या सुट्टीत जेवायला बाहेर गेला होता. रेजिस्ट्रार, वकील , राघव आणि राजू म्हादूच्या वर्तनाला पार कंटाळून गेले होते . सगळ्यांच्याच पोटात कावळे कोकलत होते . राघवला कशाचेच भान नव्हते . हा म्हातारा इथे गचकला तर भलताच प्रॉब्लेम होऊन बसेल . सगळा व्यवहार पुढे जाणार , आणखी किती दिवस लागतील , फॅक्टरी सुरु करायाच्या बाकीच्या हालचाली कधी करणार ! आणि पैसे घेऊन राजू पळून गेला तर ?त्याला तो विचारही नकोस झाला .

त्याला राजूचाच राग आला ! कशाला मारायचं थेरड्याला पाठीत ? तो राजुला म्हणाला, ” अहो कशाला तुम्ही पण ? भलतंच व्हायचं काही !!” ‘ते भलतंच ‘ , घडलंय आधीच अशी खूप भीती त्याला वाटत होती . ” मरायचा न्हाय तो इतक्या लवकर ” राजू बोलला .

आता काय ? अश्या अर्थाने राघव अधिकाऱ्याकडे बघू लागला . अधिकारी शांतपणे विचार करत होता . राजू त्याच्याच गावचा होता . म्हातारा इरसाल आहे , पैसे राहिले असते तर तो इथपर्यंत आलाच नसता , हे त्याला माहित होते . व्यवहाराचे पैसे पूर्ण दिल्या गेले आहेत याची त्याला खात्री झाली .

त्याने इकडे तिकडे बघितले , टेबलची उंची आणि म्हाद्याच्या हाताची लांबी यांचा त्याने अंदाज घेतला . हळू आवाजात तो राजूशी काहीतरी बोलला . मग त्याने राघवच्या सह्या करून घेतल्या . राघवच्या मनात खूप धाकधूक होती . म्हाद्याच्या सह्या अजून झाल्या नव्हत्या . आपण सही करून टाकली आहे . पैसेही गेले , जमीनही गेली असं तर होणार नाही ? हा रेजिस्ट्रार राजूच्याच गावाचा आहे . या तिघांचे आधी काही ठरलेय का ? हे सगळे नाटक आहे का ? तो बराच टेन्शन मध्ये आला . वकिला लाशी धड उघडपणे बोलताही येईना . आपणच सही करायला नाही म्हणायला हवे होते का ? त्याला काहीच कळेनासे झाले . राजू व अधिकारी दोघेही बऱ्यापैकी शांत वाटत होते . राघवाचे डोके बंद पडले होते . “आता कसे करायचे?” त्याला त्या regitrar ला विचारायचे होत पण तोंडातून पुटपुटल्या सारखा आवाज निघाला . रेजिस्ट्रार ने नुसतेच त्याच्याकडे बघितले.

मग तो registrar आत निघून जातोय का काय असे वाटू लागले पण फेरी मारून तो टेबलच्या या बाजूने आला . त्याने रजिस्टर उचलले , इंक पॅड उचलले , खाली बसून म्हाद्याचा अंगठा शाईत बुडवला आणि पटापट 3-4 ठिकाणी उमटवला . हवे तिथे सगळीकडे शिक्के आले. त्याने म्हाद्याला लगेच तिथून घेऊन जायला सांगितले . व्यवहार पूर्ण झाला .

सौ रीटा खांडेकर
06.12.2023

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..