मिरज मेडिकल आणि बी जे मेडिकल च्या आर्टस् सर्कल बद्दल बरेच ऐकिवात होते. मग आपणही वालचंदला आर्टस् सर्कल कां काढू नये या विचाराने आम्ही काही काळ वेढलेलो होतो. अनेक गुणी विद्यार्थी त्याहीकाळी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये असत. अशांना एखादे कायमचे आणि सततचे व्यासपीठ असावे असे आम्हाला वाटले. अन्यथा वर्षातून एकदाच स्नेहसंमेलन हा सांस्कृतिक कार्यक्रम असायचा आणि यच्चयावत पब्लिकसाठी तो घरी पळून जाण्याचा सुवर्णयोग असे.
प्राचार्यांना भेटलो, त्यांना ही कल्पना आवडली पण त्यासाठी काहीही आर्थिक मदत करण्यास नकार दिला. आधल्या वर्षी सांगलीच्या ए डी ए (अमॅच्युअर्स ड्रॅमॅटिक असोशिएशन- पुण्याच्या भालबांच्या पी डी ए ला समांतर) मध्ये एकांकिका स्पर्धेसाठी आम्ही चं प्र देशपांडे यांची “इतिहास ” ही एकांकिका केली होती आणि चक्क तिचा स्पर्धेत पहिला नंबर आला होता. त्या पारितोषिकाची रक्कम आम्हाला आर्टस् सर्कलच्या स्थापनेसाठी मिळावी अशी गळ आम्ही प्राचार्यांना घातली,ते तयार झाले.
बराच गृहपाठ केला. उदघाटनासाठी “अष्टविनायक ” ची नायिका – वंदना पंडित ला बोलावू या असा विचार झाला. ती “अश्वमेध ” नाटकाच्या (श्रीकांत मोघेवाल्या ) प्रयोगासाठी सांगलीच्या जनता नाट्यगृहात (त्याचे “दीनानाथ मंगेशकर ” नाट्यगृह असे नामकरण तोपर्यंत झाले नव्हते. ) आली त्यावेळी आम्ही तिला भेटलो. ती उदघाटन समारंभाला यायला तयार झाली (प्रत्यक्षात तिला आम्हीच निमंत्रण पाठविले नाही). तिलवल्ली सर आमचे मार्गदर्शक बनले.
स्वागत गीतासारखे ” कुहू कुहू “बसविले- वाद्य समुदायावर ! स्वाती बापट-कुळकर्णी सतारीवर एक पीस वाजविण्याच्या प्रयत्नात दमलेली. माझ्याकडे निवेदकाचे काम होते. सुधीर नेरुरकरने ” पूछो ना कैसे मैने रैन बिताई ” हे अहीरभैरव या गोड रागावर आधारित गाणे सादर केले होते. नितीन कुळकर्णीने ” लाजून हासणे अन —–” गाऊन माहोल बनविला होता. सकाळच्या वेळचा टिळक हॉल गच्च भरला होता. अचानक लाईट गेले. तेवढ्या वेळात नितीन अमीनच्या सुरेल बासरीने एकालाही जागेवरून हलू दिले नाही.
एक अप्रतिम सुरुवात -नव्या वाटचालीची ! आमच्या सगळ्या शिक्षकांनी आमचे खूप कौतुक केले. भालवणकर सरांनी तर पत्र लिहून ते जाहीरपणे नोटीस बोर्डवर लावले होते.
आम्ही होतो,तोपर्यंत आर्टस् सर्कल जोमात होते, नंतरही काही काळ बातम्या कानावर यायच्या. नंतरचे माहीत नाही. सध्याच्या पिढीला असे काही तरी वालचंदला होते, हेही ठाऊक असायचे कारण नाही. मिरज आणि पुणे येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरु असेल असं वाटत नाही.
सगळ्या चांगल्या गोष्टी, माझे साहेब म्हणायचे तसे- Die their Natural Death ! हेच शेवटी खरे.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply