नवीन लेखन...

वाळकेश्वरची श्री गुंडी..

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा–

वाळकेश्वर. वाळकेश्वर ज्या टेकडीवर आहे, ती मलबार हिल भौगोलिक दृष्ट्या मुंबईतली सर्वात उंच टेकडी. या टेकडीच्या उंची सारखीच उंची ऐहिक आयुष्यात गाठलेली इथली माणसं. वाळकेश्वराची वस्तीच गर्भश्रीमंतांची. तसंच हा मुंबंईचा राजनिवासांचा विभाग. वाळकेश्वर म्हटलं, की आठवतं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या घडामोडीचं केंद्रस्थान असलेलं मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान ‘वर्षा’, देश-विदेशातील पाहुण्यांसाठी असलेलं ‘सह्याद्री गेस्ट हाऊस’, अनेक मंत्री, बडे अधिकारी यांची निवासस्थानं आणि या सर्वांचं मुकुटमणी शोभेल असं महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांचे निवासस्थान ‘राजभवन’..!

मलबार हिलच्या दक्षिणेकडे उतरत समुद्रात घुसलेल्या दगडांवर उभे असलेले आणि ३०० वर्षांचा मुंबईच्या आणि देशाच्याही राजकीय इतिहासाचं साक्षीदार असलेलं राजभवन हा जवळपास ४७ एकराचा परिसर आहे. सन १८२० साली ब्रिटिश काळातील भारताचे (मुंबई प्रांताचे) तत्कालीन गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन यांनी या टेकडीचं स्थान, तिच्यावरील हवामान आणि निवांतपणा लक्षात घेऊन ‘मरीन व्हिला’ नांवाची एक छोटीसी बंगली बांधली आणि नंतर हळुहळू मलबार हिल राजकारणाचा केंद्रबिंदू होत गेली.

आज जे वाळकेश्वर पाॅलिट आणि एलिट लोकांचा भाग म्हणून ओळखलं जातं, ते पूर्वी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जायचं. वाळकेश्वरचं खरं नांव ‘वालुकेश्वर’. वालुकेश्वर याचा अर्थ समुद्राच्या वाळुपासून तयार केलेले लिंग. काही जुन्या पुस्तकांत लिहिल्याप्रमाणे, त्या काळी घनदाट अरण्य असलेल्या या वाळकेश्वरच्या टेकडीवर येथील पूर्वी ऋषी-मुनी तपश्चर्या करीत. प्रभू श्रीराम जेंव्हा सीताहरणानंतर पंचवटी येथून लंकेच्या दिशेने सीतेच्या शोधार्थ शोधात निघाले, तेंव्हा ते या ऋषी मुनीच्या दर्शनासाठी या ठिकाणी काही काळ थांबले होते. या ऋषी मुनीनी त्यांना शिवलिंगाची पूजा करण्याचा सल्ला दिला होता व त्यानुसार प्रभू श्रीरामचंद्रांनी पूजेसाठी इथल्या समुद्राच्या वाळूपासून या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करून त्याची पुजा केली आणि तेंव्हापासून हे ठिकाण ‘वालुकेश्वर’ या नांवाने ओळखलं जाऊ लागलं, अशी कथा सांगितली जाते. असं हे साक्षात प्रभु रामचंद्रांनी स्थापन केलेलं स्थान अशी श्रद्धा असलेलं श्री वालुकेश्वराचं लिंग, भगवान श्री रामचंद्रांनी जमिनीत बाण मारून उत्पन्न केलेलं अशी श्रद्धा असलेलं शेजारचं बाणगंगा तीर्थ आणि बाणगंगेच्या परिसरात नंतर वसलेली आणखी पांच-पन्नास देवस्थानं, इथून काहीसंच दूर असणारं बाबुलनाथाचं मंदिर, असा हा सर्व एकेकाळच्या तीर्थस्थानांचा परिसर. आज जरी हा परिसर ‘हा काय इथंच आहे’ म्हणण्याएवढा जवळ व जाण्यास सोपा आणि दिसण्यास रमणीय वाटत असला तरी, हजार-आठशे वर्षांपूर्वी, मुंबईच्या सात बेटांमधून इथं जाणं सोपं नव्हतं. वाळकेश्वर हे त्या काळात जंगलांची, मुंबई बेटातील मुख्य जमिनीपासून काहीशी तुटलेली, ओसाड अशी टेकडी होती. या टेकडीवरच्या देवांचे उत्सव व सणा-समारंभालाच या टेकडीवर काय ती वर्दळ असायची. एरवीच्या बाकी दिवशी हे एक शांत, घनदाट अरण्याचं निर्जन स्थान होतं.

वास्तविक वाळकेश्वराचं मूळ मंदिर आता जिथं राजभवन वसलंय त्या ठिकाणी होतं, असा उल्लेख बऱ्याच जुन्या पुस्तकांतून आहे. याच ठिकाणी, तिन्ही बाजूंच्या समुद्राच्या अगदी निकट, मधोमध एक सुईच्या मेढ्यासारखा चिंचोळी खांच असलेला मोठा दगड होता. अवघड जागच्या दगडाच्या या चिंचोळ्या भेगेतून आरपार जाणं तेवढं सोपं नव्हतं. दगडाच्या या खाचेंतून पलिकडे गेल्यावर पापमुक्ती होते आणि नविन जन्म होतो, असा समज त्या काळी होता. या दगडाच्या खाचेतून पलिकडे जाऊन, हातून कळत-नकळत घडलेल्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी येथे देशभरातून भाविक यायचे, असं जुन्या पुस्तकातून म्हटलं आहे. या दगडाला ‘योनी’ असंही म्हणायचे. योनी हे जन्माचं प्रतिक आहे म्हणून किंवा त्या दगडातील खांचेचा आकार योनीसारखा होता (vagina) म्हणून, असं म्हटलं जायचं..

छत्रपती शिवाजी महाराज, सरखेल कान्होजी आंग्रे आणि राघोबादादा पेशवे या इतिहास गाजवलेल्या महापुरूषांनी श्री गुंडीला भेट दिल्याच्या कथा सांगितल्या जातात. अफजल खानाच्या वधानंतर प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज इथे येऊन गेल्याची कथा सांगीतली जाते, तर राघोबादादांनी काही कामासाठी युरोपात त्यांचे दोन वकील पाठवले होते व त्याकाळी परदेशगमन हे पाप समजलं जात असल्याने, परदेशात वकीलांना पाठवल्याचं प्रायश्चित म्हणून राघोबादादांनी खडकाच्या या भेगेतून आरपार जाऊन त्या पापातून मुक्ती मिळवल्याची कथाही त्यासोबत सांगीतली जाते. काही ठिकाणी नारायणराव पेशवेंच्या खुनापासून मुक्ती मिळावी म्हणून राघोबादादानी या ठिकाणाला भेट दिली असंही लिहिलेलं आहे. सन १७७६ साली रघुनाथराव पेशवे जेव्हा पुण्याहून मुंबईत इंग्रजांकडे राजकीय आश्रयार्थ आले, तेंव्हा ते याच परिसरात मुक्कामाला होते, असा उल्लेख बाॅम्बे गॅझेटीअरमधे आहे.

राघोबादादांच्या मलबार हिलवरच्या भेटीची माहिती उपलब्ध आहे, मात्र त्यांनी या दगडाच्या भेगेतून पलीकडे जाऊन स्वत:ची शुद्धी करून घेतली, या कथेवर विश्वास ठेवणं काहीसं अवघड वाटतं. तसंच शिवाजी महाराज आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांनी श्री गुंडी दगडाचा अनुभव घेतला, या कथेवरही विश्वास बसत नाही. कारण याच ठिकाणी असणारं वाळकेश्वराचं देवालंय, चौदाव्या शतकाच्या दुसऱ्या-तिसऱ्या दशकाच्या आसपास मुंबईवर सुरु झालेल्या मुसलमानांच्या किंवा मग सोळाव्या शतकातील पहिल्या-दुसऱ्या दशकाच्या काळात आलेलं पोर्तुगीजांच्या धर्मांध आक्रमणात उध्वस्त झाल्याच्या कथा जुन्या पुस्तकातून आहेत. जर वाळकेश्वराचं देऊळ उध्वस्त झालं, तर मग त्या खालोखाल असलेल याच ठिकाणचं हिन्दूंचं श्रद्धास्थान श्रीगुंडीचा दगडही उध्वस्त करण्यात आलाच असावा, हे ओघानंच येतं. असं झालं असेल तर, सन १६३० ते १६८० दरम्यानचे छत्रपती शिवाजी महाराज, महाराजांच्या मागोमाग उदयाला आलेले कान्होजी आंग्रे आणि अठराव्या शतकातले राघोबादादा, यांनी, ते या ठिकाणी आले असले तरी त्यांनी श्री गुंडीचं अनुभव घेतला या कथा केवळ आख्यायिका म्हणूनच ठरवाव्या लागतात.

कथांच्याच बाबतीत बोलायचं तर, वाळकेश्वराचं देवालय उध्वस्त करताना कदाचित श्री गुंडीचा दगड सुरक्षित राहिला असावा आणि नंतर इंग्रजांच्या काळात कारणपरत्वे इथे आलेल्या शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे आणि राघोबादादा यांनी या दगडाचा अनुभव घेतला असावा असं म्हटलं, तर त्या काळच्या आख्यायिकाना आधार मिळतो. अर्थात, लिखित काही नसल्याने या गोष्टी तर्कानेच जाणून घ्याव्या लागतात..

श्री गुंडीचा खडक आता तिथे नाही, परंतु सध्या त्या ठिकाणी देवीचे एक मंदिर आहे. ह्या देवळाचं नुकतंच सन २०१५ मधे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. या देवीला आता सकलाई, सागर माता किंवा श्रीगुंडी म्हणून तिचे भक्तगण ओळखत असले तरी, जुन्या पुस्तकात या देवीचा उल्लेख नाही अथवा या देवीला नांव नाही. नांव नसलेली मुंबंईतली ही एकमेव देवता असावी. मात्र राजभवनासारख्या अति महत्वाच्या ठिकाणी ही देवी आहे याचा अर्थ, ती नक्कीच प्राचीन असावी. कदाचित श्रीगुंडी दगडाची आठवण म्हणून तिचं लहानसं मंदीर पूर्वी कधीतरी बांधलं गेलं असावं. किंवा वाळकेश्वराच्या मंदीरासोबत ह्या देवीचं देऊळही पूर्वी इथे असावं आणि मुसलमानी व पोर्तुगीज अंमलात वाळकेश्वरासोबत या देवीचं मंदिरही नष्ट करण्यात आलं असावं आणि त्यांचा अंमल संपल्यावर या देवीची स्थापना पुन्हा या ठिकाणी केली गेली असावी, असा फक्त अंदाज बांधता येतो. या देवी संदर्भात लिखीत असं, श्री. सदाशिव गोरक्षकर यांच्या ‘राजभवन्स ऑफ महाराष्ट्र’ या इंग्रजी पुस्तकाव्यतिरिक्त, काहीच नसल्याने, केवळ तर्कांनेच विचार करावा लागतो.

ह्या देवीची पुजा मुख्यत: कोळी समाज करतो. कोळी हे मुंबंईचे आद्य रहिवासी असल्याने ही कोळ्यांची देवता असावी असं म्हटलं तर चुकू नये. या देवीची वार्षिक जत्रा आषाढी पौर्णिमा, अर्थात गुरुपौर्णिमेच्या नंतर लगेचच येणाऱ्या मंगळवारी साजरी होते. पूर्वी मुंबईतले कोळी लोक आपल्या बोटी सजवून त्या बोटीतून जत्रेच्या दिवशी देवीच्या दर्शनाला येत व त्या दिवशी पहिली पूजा करण्याचा मान कोळी लोकांना होता असे राजभवनातील जुने लोक सांगतात. पुढे सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रातून कोळी लोकांचे येणे बंद झाल. या ठिकाणी देवीला, मुख्यत: देवीच्या शेजारी असलेल्या म्हसोबाला बळी अर्पण करायची प्रथा अनेक वर्षे सुरु होती, परंतू ती आता बंद करण्यात आली आहे. जत्रेच्या या दिवशी राजभवनाच्या परिसरात सर्वांना मुक्त प्रवेश असतो. या देवीचे हजारो भक्तगण लांब लांबहून या जत्रेसाठी येतात. चौपाटीवरून राजभवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या तीन बत्ती चौकापासून ते श्रीगुंडी देवीच्या देवळापर्यंत जत्रेला आलेल्या लोकांची प्रचंड गर्दी असते. सकाळीच सुरु झालेली ही एका दिवसाची जत्रा रात्री संपते व नंतरचे उरलेले ३६४ दिवस या देवीची पुजा-अर्चा राजभवनाचे सुरक्षा रक्षक व विविध विभागातील कर्मचारी वर्ग मोठ्या आत्मियतेने करत असतो..!!

राजभवनाच्या मुख्य द्वारातून आत प्रवेश केल्यानंतर डावीकडे खाली समुद्राच्या दिशेने उतरत जाणाऱ्या लहानशा रस्त्याच्या अगदी टोकावर श्री गुंडीचं हे लहानसं देवालंय आहे. समोर तिन्ही बाजूने समुद्र, त्याच्या दगडावर आपटणाऱ्या फेसाळ लाटा, भणाणता वारा, मागे राजभवनाची भव्य वास्तू, टेकडीवरची घनदाट झाडी, सहज दिसणारे मोरांसहितचे विविध पक्षी असं हे अत्यंत रमणीय स्थान आहे.

राजभवनाच्या परिसरात हे देवस्थान असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव एरवी इथे जायला मिळत नाही. सध्याचे राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी राजभवन जनतेसाठी खुले केले आहे. अर्थात त्यासाठी राजभवनच्या संकेतस्थळावरून आगाऊ बुकिंग करावे लागते आणि असं ऑनलाईन बुकिंग केलेलं असल्यास, इतर दिवशी देखील देवीचे दर्शन घेता येऊ शकते. गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या मंगळवारी होणाऱ्या या देवीच्या वार्षिक जत्रेच्या दिवशी मात्र ह्या पवित्र आणि रमणीय स्थळाचं दर्शन कुणालाही घेता येतं..!!

-©नितीन साळुंखे
9321811091

संदर्भ-
1. मुंबईचे वर्णन– श्री. गोविंद नारायण माडगांवकर
2. मुंबईचा वृत्तांत- श्री. मोरो विनायक शिंगणे
3. मुंबई नगरी– श्री. न. र. फाटक
4. महाराष्ट्रातील राजभवने- वैभवशाली इतिहासाची साक्षीदार – राजभवनाने प्रकाशित केलेले काॅफी टेबल बुक
5. Rajbhavans in Maharashtra – श्री. सदाशिव गोरक्षकर
6. श्री. उमेश काशीकर – जनसंपर्क अधिकारी, राजभवन
7. बाॅन्बे गॅझेटीयर-१९०४

आभार-
मुंबईच्या भटकंतीसाठी कधीही आवाज दिल्यावर तयार असणारे माझे सोबती छायाचित्रकार हेमंत पवार, श्री. मुसा शेख, श्री. चंदन विचारे. Hemant Pawar Musa Shaikh चंदन विचारे

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..