नवीन लेखन...

भिंत

( आगरी भाषेत (भिवंडी भागातील) ग ऐवजी ज, ग किंवा घ ऐवजी झ, ण ऐवजी न, ड ऐवजी र, ळ ऐवजी ल तसेच काय ला क, आहे ला ह आणि मी व मला ऐवजी मना असे शब्द वापरले जातात, आगरी बोलीभाषेतील शब्द वापरून कथा लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.)

हॅलो, वंसा, मी मंगल बोलताव, तुमी कई पन करा ना एखाद दोन दिसान तुमचे बारके भावासला भेटाला या. काल पाश्श्या त्यावी निस्ती हाय खाल्ले, “माजी बाय मना भेटाला कला येइ नाय मीनी क केले आवरा?” असाच बोलतान.
कुंदा ताईने तिच्या भावजयीला, मंगल ला सांगितले की, उद्या सकाळीच ती दोन दिवसांसाठी राहायला येतेय. तसं रमेशला म्हणजेच तिच्या सगळ्यात लहान भावाला सांगायला सांगितले.
मंगलचा फोन झाल्यावर लगेचच तिने धाकट्या बहीणीला मंदाला फोन केला.
हॅलो, मंदा, मी उंद्या रमेशच्या घरा चालल्याव दोन दिस रायाला. तू पीन येशील क?
मंदा ने पण तिला ती येईल असं सांगितले.
कुंदा ही सगळ्यात मोठी बहीण तिच्या मागे मंदा आणि या दोघींच्या पाठीवर अनिल व सगळ्यात धाकटा रमेश अशी चार भावंडं. कुंदा आणि मंदा चे लग्न होऊन दोघीजणी त्यांच्या सासरी होत्या तर अनिल आणि रमेश एकाच घरात राहत पण गेल्या एक महिन्यापासून वेगवेगळे राहात होते.
सकाळी दहा वाजता कुंदा तिच्या माहेरी पोचली.
रमेश तिची उठल्यापासून वाट बघत होता, कुंदा येणार आहे हे समजल्यापासून तो खुप आनंदात होता. त्याचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता रोज सकाळी नऊ वाजता तो त्याच्या ऑफिसवर जाऊन कुठली गाडी कुठल्या गोडाऊन मध्ये जाऊन कोणा कोणाचा माल घेऊन जाणार याची लिस्ट ड्रायव्हरना देत असे. आज कुंदा येणार म्हणून काल रात्रीच त्याने सगळ्या ड्रायव्हरना फोनवर सूचना देऊन ठेवल्या होत्या.
कुंदाला रिक्षातून उतरताना बघून त्याने मंगल ला आवाज देऊन सांगितले, मंगल बाय आली, भायेर ये.
कुंदा च्या मागोमाग मंदा ला रिक्षातून उतरताना बघून रमेश लहान मुलासारखा त्या दोघींच्या दिशेने धावत सुटला. रिक्षावाल्याच्या हातात पन्नास ची नोट कोंबून त्यांच्या हातातला पिशव्या घेतल्या. तिघंही घराच्या दिशेने येऊ लागले तोच घरातून अनिल आणि त्याची बायको पुजा बाहेर पडत होती.
कुंदा आणि मंदा दोघींना असं अचानक आलेले बघून अनिल थोडा भांबावला पण मग हसला आणि विचारपूस करू लागला. पुजा दोघींच्या पाया पडली आणि त्यांना म्हणाली वंसा आम्ही बाजारान जाऊन येताव तुम्ही बसा.
पूजाने मंगल कडे बघून सांगितले, मंगल आम्ही येताना मटन हनताव तु बाकीची तयारी करून ठेव.
रमेशला एक मुलगा होता तर अनिलला एक मुलगा आणि दोन मुली होत्या. चौघही पोरं आतू आल्या आतू आल्या करत बाहेर धावत आली. कुंदा आणि मंदाने त्यांना मायेने जवळ ओढून घेतले.
अनिल आणि पूजा मोटार सायकल घेउन बाजारात निघून गेले. सगळेजण घरात येऊन बसले. मंगल ने दोघींना पाणी देऊन चहाचे आधण गॅसवर ठेवले.
रमेश ने कुंदाला विचारले, बाय आरती बरी हं न तिच्या सासरी? न विजय सुट्टी झेवून घरा कवा येल?
कुंदाने रमेशला तिच्या मुलांबद्दल सांगितलं.
रमेश ने मंदाला पण विचारले, ताई तुजी पोरा पीन बरी हन ना, त्यांना हनला असता तर बरा व्हला असता.
मंगल आणि पूजा दोघी भावजयींनी मिळुन स्वयंपाक केला , मटणा सोबत पुऱ्या आणि बिर्यानी देखील केली होती.
कुंदा, मंदा रमेश आणि अनिल ही चारही भावंडं एका बाजूला तर अनिल आणि रमेशची मिळून चार पोरं एका बाजुला एकमेकांना खेटून जेवत होती.
रमेशचा एकुलता एक पोरगा आणि अनिल ची तिन्ही पोरं चौघांमध्ये दीड ते दोन वर्षांची अंतरे होती. रमेशचा पोरगा सगळ्यात लहान होता. रमेश आणि मंगलला लग्न झाल्यावर पाच वर्षांनी झाला होता तो झाल्यावर त्याच्या मागे त्यांना दुसरं मुल झालेच नाही.
ती चारही लहान मुलं एकमेकांशी हसत खेळत जेवत होती, मधूनच एकमेकांना टाळ्या देत होती.
जेवणं आटोपली आणि अनिल व पुजा त्यांच्या घरात गेली.
महिनाभरापूर्वी एका घराच्या मधोमध भिंत घालून दोन वेगवेगळी घरे झाली होती.
रमेश आणि अनिल दोघेही एकत्र राहायचे धाकटी सून मंगल आणि थोरली सून पुजा यांच्यात लहान मोठे खटके उडायचे पण तरीही पहिले आई आणि त्यानंतर चार वर्षांनी बाबा वारल्यानंतर जवळपास वर्षभर ते एकत्र राहिले.
बाबा गेल्यानंतर आठ नऊ महिन्यांनी मंगलने रमेशच्या मागे लागून घराचे आणि जमिनींचे हिस्से आणि वाटण्या करण्यासाठी विषय काढायला सांगितला.
आज बोलतो उद्या बोलतो करून दोन महिन्यांपूर्वी रमेशने कुंदा आणि मंदा दोघींना बोलावून घेतले.
अनिलचा हिस्से व वाटण्या करण्याला विरोध होता.
कुंदा ने सांगितले मला चार एकर जागेपैकीच काय पण इतर कशातही वाटणी आणि हिस्सा नको आहे.
मंदा ने सांगितले मला जागेपैकी माझ्या हिश्श्याची जमीन माझ्या नावावर करून द्या बाकी घरात मला काहीच नको. आज ना उद्या हे करावेच लागेल तर सगळे एकमेकांशी चांगले आहोत तर आताच करून घेऊ या.
रमेश ने मान डोलावली आणि बोलला, ठरला तर मंग, मंदा ताईला एक एकर, घराचं दोन हिस्स, कुंदा बायचे वाट्याची जमीन दोघांना वाटून.
कुंदा ने पण संमती दर्शवली.
अनिल न राहवून बोलला, तुमच्या तिघांच्या मागण्या मना कबूल हन, रमेश मी आवरं दिस समाजाचो, क मना तीन नाय चार पोरा हन. आपल्या चार भन भावाना आपल्या अस बापासाने जसा मायेने वारोला न आपून पीन एकमेकांव जीव लावून म्होटं व्हलो तशी आपल्या दोघांची चार पोरा पीन याच घरान म्होटी व्हतील. तुला चार वर्सा पोर झला नव्हता तर तू ना मंगल माझ्या तिन्ही पोरांना कवरा जीव लावाचा. पुजानी जवरा आमच्या पोरांचा केला नसेल तवरा मंगल ने केला. तुला तुझा पोऱ्या व्हला ना मंगलची ना तुझी माझ्या पोरांवरची माया लगेच आटली क रं.
तुला मुलबाळ व्हावा म्हणून तुमचे दोघांचे जास्ती मी ना पुजा ने कवर नवस ना उपास तपास केल्यानं या पीन तू इसारला क?
आर तू बारका आसून कंच्या पावण्यावी नायतर अस बापुस कई खाऊ झेऊन अला तरी तू आमी तिघा येपर्यंत त्या खाऊला हात लावत नसाचा.
आज तू आवरा म्होटा व्हला क तूनी आपल्या सगल्यांच्या जागेच्या ना घरादाराच्या वाटन्या पीन करून टकल्या.
रमेश आणि अनीलचे वडिलोपार्जित घर, घर कसलं तो तर एक अवाढव्य वाडाच होता. भला मोठा लांब रुंद हॉल आणि दोन्ही बाजूला चार चार खोल्या पुढे मागे अंगण आणि भरपूर जागा. घराच्या मधोमध एक लाईन काढली तर दोन्ही बाजूंना एकसारखं बांधकाम सममितीय आकृती प्रमाणे.
महिनाभरापुर्वी घराच्या मधोमध भिंत बांधली गेली, एका घराचे दोन घरं झाली.
रमेश आणि अनिलच्या मुलांना हे असं का घडलं ते कळलं नाही.
रमेशचा पोराला त्याच्या काकाचा जास्त लळा होता, अनिलला तो मोठा बाबा म्हणून हाक मारायचा. अनिल त्याला त्याच्या सोबत एकाच ताटामध्ये जेवायला घेतल्याशिवाय जेवत नसे. घरात भिंत बांधली त्या दिवशी रमेशचा मुलगा अनिल जवळ जेवायला गेला नाही. अनिल वाट बघून तसाच उपाशीपोटी झोपला.
अनिलच्या मुलींची शाळेची तयारी त्यांची मंगल काकी करायची, त्यांच्या छानशा वेण्या बांधायची, पावडर लावून नजर लागू नये म्हणून कानाच्या मागे काजळाचा टिळा लावायची. पण भिंत बांधल्या पासून त्या दोघी आप आपली तयारी करून निमूटपणे शाळेत जाऊ लागल्या.
रमेश त्यांना शाळेतून घेऊन यायचा ट्यूशन क्लास ला घेऊन जायचा.
पण घरात बांधलेली भिंत नात्यात सुद्धा पडून आडवी यायला लागली. भिंत बांधण्या अगोदर मुलांच्या हसण्या खिदळण्याने आणि बागडण्याने सुखी असणारे घर आता उदास आणि भकास वाटू लागले होते.
रात्री मंगलने भाकरी आणि सुक्या मच्छीचे कालवण केले होते. सगळी भावंडं पुन्हा दुपारसारखीच जेवली.
मंगल आणि पुजा किचन मध्ये आवरत बसल्या होत्या.
रमेश,अनिल, कुंदा आणि मंदा एकत्र समोरा समोर काही न बोलता बसले होते , चारही पोरं बाहेर खेळत होती.
चौघांमधली अव्यक्त शांतता तोडत कुंदाने रमेशला विचारले , रमेश तुझी तब्येत बरी नाय क? माजा आवरा ध्यास कनाला झेतलेला?
रमेश चे डोळे भरून आले, त्याचा स्वर जड झाला, तो बोलू लागला. क सांगू तुला बाय, जवापाश्श्या घरान भीत बांधले तवा पाश्श्या मना झोप नाय लागत. माजा पोऱ्या मना इचरतं बाबा भिंत का बांधली आपल्या घरात?
बाय मना उत्तर नाय देता ये त्याला, सांग मी क करू. दादाच्या पोरी या बाजूला येत नाय, समोरून जेल्या तरी मान खाली घालतान.
मंगलला पीन तिची चूक समाजले आता, आख्ख्या गावानच्या बायका तिला टोमनं माराच्या पोरं व्हत नव्हती तवा. आपली अस नव्हती पीन पूजा वयनीनेच तिला धीर दिला, तिची लेकरं मंगलच्या मांडीव दिली.
रमेशने अनिल कडे बघितले त्याचे डोळे पण पाण्याने भरले होते. रमेशने त्याच्या पायांवर डोकं ठेवलं आणि बोलू लागला, दादा मना माफ कर, घरान बांधलेली भीत आपुन उंद्याच्या उंद्या तोरून टाकू. अनिलने त्याला उचलले आणि छातीशी कवटाळून घेतले.
बाहेर अंगणात खेळणारी पोरं आत आली. त्यांचे बाप आणि त्यांच्या आत्या चौघेही रडत होते.
चारही बहीण भावंडांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. मंगल तिच्या मुलाला बोलली, बाळा उद्या पासून तू रोज तुझ्या मोठ्या बाबांच्या ताटात जेवायचे बरं.

-प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनिअर
कोन,भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..