दिनांक १२ जानेवारी १७७९
स्थान वडगाव, पुणे जिल्हा महाराष्ट्र
परिणती मराठ्यांचा विजय
वडगावची लढाई मराठे व इंग्रज यांच्यामध्ये पुण्यापासून साधारणपणे ४० किमी दूर असलेल्या वडगाव या ठिकाणी झाली.याला पहिले मराठा-इंग्रज युद्ध म्हणून सुद्धा ओळखले जाते. मराठे व इंग्रज यांच्यात एकूण तीन लढाया झाल्या. भारताच्या इतिहासात या तीनही लढाया अतिशय महत्त्वाच्या आहेत. या लढायांत मराठ्यांचे नेतृत्व तुकोजीराव होळकर व महादजी शिंदे यांनी केले. मराठ्यांनी या लढायांत शिस्त आधुनिक डावपेच यांचे प्रदर्शन करून इंग्रजांना परास्त केले व अखेरीस जेरीला आलेल्या इंग्रज फौजेचा वडगाव येथे पराभव केला. इंग्रजांना या पराभवामुळे मराठ्यांशी तह करावा लागला. परंतु इंग्रज गव्हर्नर यांनी हा तह नामंजूर करत युद्ध चालू ठेवले.
पावसाळा संपल्यानंतर इंगजांनी मुंबईहून साधारण ४००० सैनिकांची फौज घेत प्रयाण केले. रघुनाथरावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते. इंगजांच्या सैन्यात ६०० युरोपियन तर उरलेले भारतीय सैनिक होते. रघुनाथरावांना व इंगजांना वाटत होते की शिंदे, होळकर हे पुण्याच्या आसपास त्यांनाच येऊन मिळतील. इंग्रजांनी पनवेल मार्गे, कर्जत-खंडाळा-पुणे असा मार्ग आखला होता.
मराठा सैन्याचे नेतृत्व महादजी शिंदे यांनी केले, होळकरही मराठा सैन्यासोबतच राहिले. त्यामुळे रघुनाथरावांचे बेत फसले. यावेळी मराठ्यांच्या सैन्य हालचाली वाखाणण्यासारख्या होत्या. कार्ले, खंडाळा या भागात इंग्रज पोहोचेपर्यंत मराठ्यांनी त्यांना गनिमी काव्याने सतावण्याचे काम केले. इंग्रज फौजेवर सतत गनिमी हल्ले करत त्यांची रसद मिळण्याचे मार्ग कापले. इंग्रज फौज जसजशी पुढे सरकत होती, तसतशी मराठ्यांनी वाटेतली सर्व गावे ओस केली, शेते पिके कापून जाळून टाकली, शिवाय पाणवठे विष टाकून त्यातील पाणी पिण्यायोग्य ठेवले नाहीत, अशावेळी अन्नासाठी इंग्रज फौजेला आशा ठेवत पुढे पुढे चालत राहावे लागले. रात्रीचे वेळीसुद्धा छोटे हल्ले करत त्रास देणे सुरू ठेवले, तरीही चिकाटीने इंग्रज फौज खंडाळ्याला आली. खंडाळ्याला आल्या वर मात्र इंग्रज फौजेला त्रास न देता मराठ्यांनी घाट चढू दिला, हेतु हाच होता की परतीचा मार्ग कापला जावा.या दरम्यान उत्तर भारतातून येणाऱ्या फौजेचा प्रवासही मराठ्यांनी त्रास देत लांबवला. नागपूरच्या भोसलेंना तशा सूचना दिल्या होत्या. त्यापुढे रोहिल्यांनाही तशाच सूचना होत्या. यामुळे उत्तर भारतातून आवश्यक रसदी इंग्रजांना मिळाल्याच नाहीत.
३१ डिसेंबरला इंग्रज फौजेने खंडाळ्याला मुक्काम केला. ४ जानेवारीला फौजा कार्ल्यात आल्या. इंग्रजांनी नंतर रंगवलेला तथाकथित शूर जेम्स स्टुअर्ट मुख्य लढाईच्या १० दिवस आधीच कार्ल्यात महादजी शिंदेंच्या फौजेकडून मारला गेला. मराठयांनी रसदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी तळेगावाकडे वळली (९ जानेवारी १७७९), पण मराठयांनी तळेगावसुद्धा रिकामे करून जाळले होते, आणि पाणवठेसुद्धा विषारी होते. अखेर इंग्रजांनी न लढताच माघार घेतली. ११ जानेवारी १७७९ला त्या आपले जड साहित्य तसेच टाकत उलट वळले, पण मराठी फौजेने माग सोडला नाही अखेर इंग्रजांनी वडगावचा आश्रय घेतला. १३ जानेवारीला रात्री मराठ्यांनी वडगांववर हल्ला चढवला तो १४ च्या सकाळी इंग्रजांनी पांढरे निशाण फडकवेपर्यंत तो चालूच ठेवला. अखेर १६ जानेवारी १७७९ला नाना फडणिसांनी व महादजी शिंदेनी इंग्रजांची संपूर्ण शरणागती मान्य करत तह लादला. तहानुसार इंग्रजांनी १७७३पासून जिंकलेला सर्व मुलुख परत करायचा होता तसेच मराठ्यांना युद्धखर्चही द्यायचा होता.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply