शेअर्स किंवा स्टॉक मार्केट गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकानेच वॉरेन बफेट यांचं नाव ऐकलं असतं . आजच्या घडीला जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीत गणना होणाऱ्या वॉरेनना गुंतवणूक विश्वाने ‘ ओरॅकल ऑफ ओमाहा ‘ असं नामाभिधान प्रदान केलं आहे . एक गुंतवणूकदार म्हणून वॉरेननी मिळवलेलं यश अद्वितीय असेच आहे . वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात करणाऱ्या वॉरेननी नुकताच ३० ऑगस्ट २०१ ९ रोजी आपला ८ ९ वा वाढदिवस साजरा केला .
या त्यांच्या तब्बल ७८ वर्षांच्या प्रदीर्घ गुंतवणूक प्रवासात त्यांनी स्वानुभवातून मिळवलेले ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचा सतत प्रयत्न केला . संपूर्ण जगभरात त्यांच्या गुंतवणूकपद्धती अंगीकारणाऱ्या गुंतवणूकदारांचा जणू एक पंथच तयार झाला आहे . भारतातीलही अनेक गुंतवणूक तज्ज्ञ दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या शनिवारी वॉरेनच्या बर्कशायर हॅथवे कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला अमेरिकेतील ओमाहा शहरात प्रत्यक्ष हजेरी लावतात .
१९३० साली अमेरिकेत वॉरेन बफेट यांचा जन्म झाला . वॉरेन बफेट यांचे वडील हे स्टॉक ब्रोकर होते . लहानपणापासून ते आपल्या वडिलांच्या ऑफिसमध्ये जात होते . वडिलांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर ते तेथील सर्व पुस्तके वाचून काढत . तिथेच त्यांना बेन ग्राहमचे ‘ इंटेलिजंट इन्वेस्टर ‘ हे पुस्तक मिळाले . त्यांनी पहिली गुंतवणूक वयाच्या अकराव्या वर्षी केली . पहिल्या शेयरवर त्यांनी थोडासा नफा कमवला . परंतु नंतर त्यांना पश्चात्ताप झाला , कारण तो शेअर पुढे जाऊन खूप जास्त वाढला होता . तेव्हा त्यांनी गुंतवणुकीचा पहिला धडा , संयम हा शिकला . सहा वर्षाचे असताना ते कोकाकोलाच्या बॉटल विकत होते . वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता , बातमीपत्र वाटणे व घोड्याच्या शर्यतीचे टीप पत्रक विकणे . त्याच वर्षी त्यांनी पहिल्यांदा टॅक्स रिटर्न भरला व सायकलवर टॅक्स सूट मिळवली . माध्यमिक शाळेत असताना त्यांनी पिन बॉल मशीन विकत घेतली आणि न्हाव्याच्या दुकानात स्थापन केली . त्यापासून मिळालेल्या नफ्यातून त्यांनी आणखी मशीन विकत घेतली . पुढे त्यांनी आपल्या तीन मशीनचा व्यवसाय बाराशे डॉलरमध्ये विकला . कॉलेजमध्ये न जाता वॉरेन बफेट यांना बिजनेसमध्ये उतरायचे होते . पण वडिलांनी नकार दिल्यामुळे त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला .
वॉरेन बफेट यांची लोककल्याणाची प्रतिज्ञा
२००६ मध्ये वॉरेन बफेट यांनी लोककल्याणकारी संस्थांना हळू हळू बर्कशायर हॅथवे कंपनीचे शेयर दान करण्याची प्रतिज्ञा केली . माझ्या जीवनभरात किंवा मृत्यूच्या वेळी माझी ९९ % पेक्षा अधिक संपत्ती परोपकारात जाईल असे ते सांगतात . अब्जाधीश वॉरेन बफेटची संपत्ती जवळ जवळ संपूर्णपणे त्यांच्या बर्कशायर हॅथवे गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये आहे . बर्कशायर हॅथवे ही GEICO Insurance , Duracell Batteries आणि See’s Candies यासह अनेक कंपन्या आणि साहाय्यक कंपन्यांचा समावेश असलेली एक होल्डिंग कंपनी आहे . बर्कशायर हॅथवेच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये – PPLE , बँक ऑफ अमेरिका आणि कोकाकोला कंपनीसारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे .
वॉरेन बफेट यांचा गुरुमंत्र
ज्या कंपनीचा शेअर कधीही विकण्याची वेळ येणार नाही , अशा कंपनीतच गुंतवणूक करा , ‘ असे वॉरेन बफेट सांगतात .
या एका मंत्रावर बफेट श्रीमंत झाले . केवळ श्रीमंत झाले नाहीत , तर समृद्ध आयुष्यही जगले . आपण श्रीमंत झालो , म्हणजे ऊत – मात करायला मोकळे झालो , असे त्यांनी कधी मानले नाही . अर्थात , त्यांचे हे गुरूपण एका दमात आपल्याला झेपणारे नाही .
१ . ‘ जेव्हा शेअर बाजारात पराकोटीचा हावरेपणा निर्माण होतो तेव्हा तिथून पळ काढा . जेव्हा पराकोटीची चिंताजनक परिस्थिती निर्माण होईल , तेव्हा मात्र तुम्ही गुंतवणूक करा ‘ .
२. ‘ गुंतवणुकीला लवकरात लवकर सुरुवात करा आणि तिला वाढायला वेळ द्या ‘ .
३. ‘ आपण नक्की काय करतो आहोत हे न समजणं ही गुंतवणूक क्षेत्रातली सर्वात मोठी जोखीम आहे .
४. ‘ महापुराच्या भाकितांना काहीच अर्थ नाही . तुम्ही तुमची नौका बनवली आहे का ? ‘
५. ‘ बाजारातील चढउतारांना घाबरू नका .
६. गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे , पण जवळ पुरेसे पैसे नाहीत अशी परिस्थिती उद्भवू देऊ नका .
‘वॉरेन बफेट यांची गुंतवणूक कंपनी बर्कशायर हॅथवे हिचे बाजारमूल्य सुमारे ५०० अब्ज डॉलर्स आहे ! बर्कशायर हॅथवेच्या एका शेअरचे बाजारमूल्य सुमारे ३.१ लाख डॉलर्स , म्हणजेच सव्वादोन कोटी रुपये आहे ! मात्र गेल्या ५ वर्षातील बर्कशायर हॅथवेची कामगिरी निराशाजनक ठरली .
डाऊजोन्स निर्देशांकातील ५४ % वाढीच्या तुलनेत तिचे बाजारमूल्य केवळ ३३ % ने वाढले . तरीही सामान्य गुंतवणूकदारांना देखील उपयोगी पडतील असे हे वॉरेन बफेट यांचे धडे प्रत्येकानेच गिरवले पाहिजेत . त्यांच्यामुळे आपल्या गुंतवणुकीच्या प्रवासाची मानसिक तयारी नक्कीच चांगली होईल.
–संकलन
Leave a Reply