नवीन लेखन...

शुध्द आणि बेशुध्द !

Watch what you write

कोणत्याही ग्राहकोपयोगी वस्तूंची उदा. तेल – साबण, खाद्यपदार्थांची जाहिरात करताना त्या वस्तूच्या शुध्दतेवर नेहमीच भर दिलेला आढळतो. कारण शुध्दतेला आपण नेहमीच अनन्य साधारण महत्त्व देतो. मग ती चारित्र्याची असो, विचारांची असो किंवा वस्तूंची असो. पण एका बाबतीत मात्र हा “शुद्धतेचा नियम” सर्रास धुडकावून लावलेला दिसतो. आणि ती गोष्ट म्हणजे लेखनातील, उच्चारातील शुद्धता. शुद्धलेखन म्हणजे जुन्या पिढीने लादलेले ओझेच आहे असा खेदजनक दृष्टिकोन अनेकदा पहायला मिळतो.

स्वत:चे कपडे, वेषभूषा, केशभूषा याबाबत काटेकोर दक्षता पाळणारे अनेक महाभाग आपल्या लेखनाबाबत मात्र अशी दक्षता पाळताना दिसत नाहीत. किंबहूना शुध्दलेखनाबाबत बेफिकीरी दाखवणे हे पुढारलेपणाचे लक्षण आहे असा ही गैरसमज काहींचा झालेला दिसतो. वस्तुत: तुमचे लेखन हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा मानले जाते. तुम्ही जर शुध्दलेखनाचे नियम पाळले नाहीत आणि ऱ्हस्व दीर्घाची पर्वा न करता मजकूर लिहीलात तर त्याचा एक अर्थ असाही होतो की तुम्ही कोणतीच बंधने, नियम पाळत नाही.

भिन्न भिन्न विचारसरणीच्या, मनोवृत्तीच्या लोकांनी तयार झालेला आपला समाज एकसंध राहण्यासाठी, त्याचे व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी काही बंधने, नियम मग ते कायदेशीर असोत, नैतिक असोत वा धार्मिक आवश्यकच असतात. त्याचप्रमाणे भाषेचे व्यवहार नीटनीटके पार पडण्यासाठी शुध्दलेखन अपरिहार्यच असते. संपर्क, संवाद साधणे हाच भाषेचा मुख्य उद्देश असतो, तो साधला की झाले, त्यासाठी शुध्दलेखनाचा आग्रह कशाला? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. मी हा प्रश्न विचारणार्‍यांना इतकेच सांगेन की लज्जा रक्षण करणे हाच कपड्यांचा मुख्य हेतू आहे म्हणून कोणत्याही प्रकारे ते साधले की झाले हा विचार जेवढा चुकीचा व हास्यास्पद आहे तेवढाच तुमचा शुध्दलेखनाबाबतचा प्रश्न ही आहे.

भाषेत शुध्द- अशुद्ध असे काढीचे नसते ‘ या विचारात तथ्य असले तरीही बोली भाषा, लेखी भाषा, प्रमाण भाषा अशी व्यवहाराच्या सोयीसाही केलेली वर्गवारी नजरेआड करून चालत नाही. प्रमाणभाषाही केवळ काही मूठभरांची भाषा आहे आणि म्हणून या भाषेचे शुद्धलेखनाचे नियम आम्हाला मान्य नाहीत या युक्तिवादातही काही अर्थ नाही. शेवटी समाजाचे नेतेपद मूठभर मंडळीच्याच हातात असते आणि त्यांनी घालून दिलेले संकेत, नियम, कायदे सर्वांनाच बंधनकारक असतात हे विसरता कामा नये.

आजच्या विद्यार्थीवर्गामध्ये शुद्धलेखनाबाबतची अनास्था सार्वत्रिकपणे दिसून येते. या अनास्थेला कारण ठरली आहे शिक्षकवर्गाची शुद्धलेखनाबाबतची उदासीनता. अनेक ठिकाणी शिक्षकानाच शुद्धलेखनाचे किमान नियम माहित नसतात. साहजिकच आपले अज्ञान झाकण्यासाठी ते विद्यार्थ्यांच्या अशुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करतात. लेखनातील ही अशुद्धता विद्यार्थ्यांच्या वर्तनातूनही कळत नकळत परावर्तित होताना दिसते. शालेय जीवनातील सर्वात आवश्यक असा शुद्धलेखनाचा संस्कार विद्यार्थ्यांवर न घडल्याने त्यांचे व्यक्तिमत्व अपुरे रहाते. शुद्धलेखनासारखी लहानशी शिस्तही न पाळणाऱ्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे कायद्याची पर्वा न करणारे नागरिक जन्माला येतात. म्हणून शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर शुद्धलेखनाचा संस्कार घडणे आवश्यक आहे. त्यासाठी आधी शिक्षकांचे प्रबोधन करणे, त्यांना या संस्काराची महती पटवून देणे व त्यासाठी सक्षम करणे गरजेचे आहे.

मराठी लेखन कोशकार अरूण फडके सचिवालयापासून ते प्राथमिक शाळांपर्यंत विविध स्तरावर शुद्धलेखन विषयक जागृती करीत आहेत. अशा मोहिमांमधून निश्चितच अपेक्षित परिणाम साधला जाईल. शुद्धलेखनचा आग्रह धरावा लागता कामा नये तर ती सवय बनली पाहिजे. स्वत:चे व्यक्तिमत्व नीटनेटके ठेवणे जितके अंगवळणी पडले आहे, तितकेच शुद्ध लिहिणेही अंगवळणी पडले पाहिजे. तरच समाजात वैचारिक शुद्धता प्रस्थापित होईल व शुद्ध विचारांतून तितकेच शुध्द आचरण घडेल आणि हा समाज सुंदर बनेल.

— चिंतामणी कारखानीस

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..