माणसाला होणारे अनेक रोग हे दूषित पाण्यामुळे होतात. त्यापासून वाचण्यासाठी स्वच्छ पाणी हा सर्वांचाच हक्क आहे. पाण्यात तुरटी फिरवल्याने पाण्यातील माती व घाण खाली बसते पण तरीही ते जंतुमुक्त होतेच असे नाही. काहीवेळा पाणी स्वच्छ कापडाने गाळूनही काम भागवता येते.
क्लोरिननेही पाणी स्वच्छ केले जाते. क्लोरिनच्या गोळ्या बाजारात मिळतात. दहा मिनिटे उकळलेले पाणी हे सर्वात शुद्ध मानले जाते. पाणी शुद्ध करण्यासाठी काही यंत्रे पूर्वीपासून बाजारात आहेत त्यांना वॉटर प्युरिफायर असे म्हणतात. बोअरवेलचे क्षारयुक्त पाणीही क्षार कमी करून स्वच्छ करणारी यंत्रे आता उपलब्ध आहेत. ही यंत्रे पाच हजारांपासून पंधरा हजारांपर्यंत आहेत. पाणी स्वच्छ करण्यासाठी ज्या पद्धती वापरल्या जातात त्यात अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) डिसइनफेक्शन ही आहे. या यूव्ही फिल्टर्समध्ये घाण पाण्यावर अल्ट्राव्हायोलेट किरणांची प्रक्रिया केली जाते. यात काही वेळा क्लोरॅमाईनचा वापर करावा लागतो.
ओझोन प्रक्रियेत पाण्यात ओझोनचा वापर केला जातो यात ओझोनचा रेणू अस्थिर असल्याने तो ऑक्सिजनचा अणू ऑक्सिडीकारक म्हणून काम करतो. तो पाण्यातील जंतूंना जगण्यास हानिकारक ठरतो,त्यामुळे प्रोटोझासारखे सूक्ष्मजीवही मरतात. ऑक्सिजन अल्ट्राव्हायोलेट किरणातून पाठवून किंवा इतर पद्धतींनी ओझोन तयार केला जातो. यात ब्रोमेट हे उपउत्पादन तयार होते ते कर्करोगकारक आहे असे म्हटले जाते, तरीही अमेरिका, फ्रान्स या देशात हीच पद्धत वापरली जाते.
विजेवर चालणाऱ्या काही फिल्टरमध्ये एक पॉझिटिव्ह व एक निगेटिव्ह इलेक्ट्रोड ठेवून आयन एक्सचेंज मेंब्रेन (पटल) वापरून पाणी स्वच्छ केले जाते. त्याला इलेक्ट्रोडायलिसिस म्हणतात. सँड फिल्टरेशन हा एक प्रकार आहे त्यात वाळूच्या थरातून पाणी गाळले जाते. याच तत्त्वामुळे कुठल्याही झऱ्याचे पाणी हे स्वच्छ मानले जाते कारण ते वाळूच्या थरांमधून गाळत आलेले असते.
आरओ म्हणजे रिव्हर्स ऑसमॉसिस ही पद्धत जास्त विश्वासार्ह मानली जाते. त्यात ०.००१ मायक्रॉनचे कणही वेगळे केले जातात, धातूंचे आयन व क्षारही काढले जातात. नॅनो तंत्रावर आधारित नॅनोफिल्टरेशनमध्ये एका पारपटलाच्या मदतीने ०.०००१ ते ०.००५ मायक्रॉनचे कण वेगळे केले जातात. यात विषाणू, कीडनाशके, तणनाशकेही दूर केली जातात. पाणी नुसते स्वच्छ असून चालत नाही त्याची पीएच किंमत बघावी लागते.
नळातून पाणी येते त्यावेळी त्यात क्षरणामुळे शिसे मिसळण्याची शक्यता असते. वॉटर प्युरिफायर एकदा लावले की काम संपले असे नसते. त्यांची वेळोवेळी निगा राखावी लागते.
Leave a Reply