पुनर्भेट : आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : (जागतिकीकरणाबद्दल एक चिंतन) : १९९३
भाग २
प्रस्तुत लेखकानें १९९३ सालीं जागतिकीकरणातील धोक्यांविषयीं एक लेख लिहिला होता, व तो ‘जागतिक मराठी अकादमी, बडोदा चॅप्टर’ यांच्या ‘संवाद’ या अनियतकालिकात १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला होता. परिस्थितीत , या १९९३च्या लेखाची पुनर्भेट प्रस्तुत लेखकाला आवश्यक व उपयुक्त वाटली. कांहीं तत्कालीन कारणांनें हा लेख भाषणसदृश लिहिलेला आहे, हें ध्यानांत घ्यावें. तसेंच, परकीय जन हे कसे भारतीय विचारांवर परिणाम करत आलेले आहेत, याचा ऊहापोह इतिहासात जाऊन, लेखाच्या सुरुवातीच्या भागात, केलेला आहे, याचीही वाचकांनी नोंद घ्यावी.
आजची स्थिती :
आज आर्थिक, वित्तीय व औद्योगिक क्षेत्रात परदेशियांनी (पाश्चिमात्यांनी) आपल्यावर आक्रमणच केलेलें आहे. ‘बळी तो कान पिळी’ या न्यायानें सगळीकडे आम्हांस ते त्यांच्या मर्जीप्रमाणें वाकवतात. शस्त्रास्त्रनिर्मिती करणार्या परदेशी कंपन्या चालाव्यात म्हणून अविकसित देशांना शस्त्र विक्री केली जाते . रासायनिक युद्धतंत्रविषयक ( केमिकल वॉरफेअर ) ज्ञानातून कीटकनाशकांची ( पेस्टिसाइडस् ) निर्मिती होते , त्या हानिकारक उत्पादनांवर विकसित देशांत बंदी घातली जाते आणि इकडे तेच तंत्र भारतीय कंपन्यांना पुरवलें जातें. पेटंटचा कायदा बदलावा म्हणून भारतावर दबाव आणला जातो तो कशासाठी, तर औषधोत्पादक ( फार्मास्युटिकल ) पाश्चिमात्त्य उद्योगांच्या सुरक्षिततेसाठी आणि संगणक आदेशबंध (कॉम्प्युटर सॉफ्टवेअर ) क्षेत्रातील कंपन्यांच्या वाढीसाठी. अति-शीत वातावरणात चालणारे (क्रायोजेनिक) एंजिन, महासंगणक (सुपर कॉम्प्युटर ) आम्हाला द्यायचे नाहींत, पण रेफ्रिजरेटर, टी.व्ही. इत्यादी ‘कंझ्युमर ड्युरेबल्स’ (व्हाइट गुडस्) म्हणून ओळखल्या जाणार्या व इतर तत्सम उत्पादनाचें तंत्रज्ञान विकत घ्यावं म्हणून आम्हाला उत्तेजन दिलं जातं , प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आमच्यावर दबावही आणला जातो. वस्तुतः या वस्तूंची निर्मिती आम्ही अनेक वर्षे करतच आलेलो आहोत, त्याविषयीचं तंत्रज्ञान आमच्या तंत्रज्ञांनी केव्हांच आत्मसात केलेलं आहे ; तरीही असल्याच उत्पादनांसाठी आम्ही परदेशियांशी करार करतो व पुन्हां अशा वस्तूंचे सुटे-भाग सुद्धा त्यांच्याचकडून विकत घेतो. मग आमच्या देशाच परकीय चलन संपलं नाहीं तरच नवल ! परकीय चलनाअभावी आम्हाला पुन्हा हातात कटोरा घेऊन पाश्चिमात्त्य देशांपुढे भीक मागायला उभं राहावं लागतं आणि पुन्हां नवनवीन कंपन्या भारतात प्रवेश करतात , साबण, टूथपेस्ट, वॉशिंग मशीन, शीतपेये बनवायला अन् इथल्या पैशांचा ओघ परदेशाकडे वळवायला.
-आण्विक ( न्यूक्लिअर ) तंत्रज्ञान विकसित देशांनी वापरत राहायचं, पण आम्हाला तो अधिकार असूं नये म्हणून आमच्यावर त्यांचा दबाव येतच राहणार. आमची वित्तीय नीती कशी असावी हे ‘इंटरनॅशनल मॉनिटरी फंड’ आम्हाला सांगणार. आम्ही आमच्या विकास योजना कशा आखाव्यात ते ‘वर्ल्ड बँक’ ठरवणार! प्रत्येक क्षेत्रात आमच्या स्वायत्ततेवर असं आक्रमण होत आहे आणि आम्ही ते स्वीकारत आहोत.
- भारताच्या इतिहासाच विश्र्लेषण करतांना वीर सावरकरांनी एके ठिकाणीं असं विशद केलं आहे की, मध्ययुगात आमच्याच बांधवांचं धर्मांतर त्यांच्या इच्छेविरुद्ध झालं पण पुढील पिढ्यांसाठी ते धर्मांतर संस्कृतीबदल ठरले व त्यामुळे आमच्याच बांधवांचे वंशज आमचे शत्रू बनले. आपण येथें धर्मविषयक चर्चा करत नाहीं आहोत ; मात्र या कथनाचा अर्थ असा की ‘संस्कृती-बदल’ हा मित्राला शत्रू बनवूं शकतो. आमच्या बुद्धिजीवी वर्गाचा आज असाच संस्कृतीबदल झालेला आहे. अनेक बुद्धिवंत कायमचेच परदेशवासी झालेले आहेत आणि बाकीचेही पाश्चिमात्त्य संस्कृतीचे दास झालेले आहेत.
-प्रस्तुत लेखकाचे स्नेही श्री. निशिगंध देशपांडे एक अवतरण सांगत असतात ते खरं आहे की ‘दास्यत्व बंदुकीच्या नळीमधून उगम पावत नाही, ते बुद्धिवंतांच्या मनांमधून प्रवाहित होतं ’. जेव्हां केंव्हां कुठेही बुद्धिवंतांच्या वर्गानें परकियांचें अधिपत्य मनानें स्वीकारलें आहे, तेव्हां तेव्हां तिथें दास्यत्व आलेलें आहे , आणि जेव्हां जेव्हां बुद्धिवंतांनी अशा अधिपत्याविरुद्ध लढा दिलेला आहे तेव्हां तेव्हां सामान्य जनता त्यात सामील झालेली आहे , तिनें परकीयांचें जोखड झुगारून दिलेलं आहे, हेच आम्हाला इतिहासात वारंवार दिसलेलं आहे.
- भारतीय बुद्धिवंतांनी पाश्चिमात्त्यांचें आर्थिक, बौद्धिक, औद्योगिक व सांस्कृतिक अधिपत्य स्वीकारलेलं आहे! भारताच्या गुलामगिरीचा, पारतंत्र्याचा आणखी काय पुरावा हवा ?
- भारताची ही गुलामगिरी, ही परतंत्रता बघून तुम्ही चकित व्हाल, अस्वस्थ व्हाल. होतंय तें अकल्पित आहे, भयानक आहे असंही तुम्हाला वाटेल ; यावर उपाय काय, असाही सवाल तुम्ही कराल.
(पुढें चालूं )
— सुभाष स. नाईक
Leave a Reply