मराठी चित्रपट हा ग्लोबल होतो आहे यासाठी अनेक बाबी कारणीभूत आहेत. माध्यमं आणि वेबसाइट्स सुद्धा यामध्ये महत्वाची कामगिरी पाडत आहेत, कारण गेल्या काही वर्षांमध्ये मराठी माध्यमांचा उदय होऊन चित्रपटाला मोठी बाजारपेठ मिळाली आहे. हिंदी सिनेमासाठी आधीपासून अनेक वेबसाईट्स लोकप्रिय होत्या व त्यांची संख्याही लक्षणीय आहे. हिंदी आणि दाक्षिणात्य वेबसाइट्स प्रमाणे मराठी वेबसाइट्सचा ही बोलबाला सध्या वाढतो आहे, पण मराठी वेबसाइट्स केवळ मराठी माणसंच चालवतात किंवा वाचतात असंही नाही हं! अमराठी माणसं सुद्धा “माय मराठीला” वेगळी प्रतिष्ठा व लौकिक प्राप्त करुन देताना दिसत आहेत, दादरच्या केयुर सेता या अमराठी तरुणानं “हलती चित्रे” ही मराठी सिनेमाची वेबसाईट निर्माण करुन सिनेप्रमींना पर्वणी देऊन आदर्श ही रचला आहे.
या वेबसाईट्स विषयी बोलताना केयुर सांगतो की लहानपणापासूनच मला चित्रपट पहाण्याची हौस व आवड, बालपण दादर सारख्या मराठी वातावरणात व्यतित झाल्यामुळे मराठी मित्र, मराठी कुटुंबांशी तर घनिष्ठता होतीच, त्यामुळे मनाने सुद्धा मी मराठी असल्याचं केयुर अगदी अभिमानानं सांगतो; शालेय महाविद्यालयीन शिक्षण जरी इंग्रजी माध्यमात झालं असलं तरी पण मुंबईत राहिल्यामुळे मराठी संस्कृतीची नेहमी अप्रुपता वाटत असे. फिल्म जर्नालिझम हा आवडीचा विषय असल्याने केयुरने अनेक हिंदी तसंच इंग्रजी चित्रपटांची समीक्षा व लेखन केलं आहे. मराठी सिनेमासाठी लेखन किंवा समीक्षा करावी किंवा वेबसाईट काढावी का ? असं विचारल्यावर केयुर उत्तरतो की साधारणत: २००८ पासून मराठी चित्रपट जागतिक पातळीवर दखल घेण्याजोगी कामगिरी बजावत आहेत. मी सुद्धा हे चित्रपट पाहून ब्लॉग्स लिहित होतो, पण खासगी ब्लॉग्स वर लिहिण्यापेक्षा जर स्वत:ची वेबसाईट असेल तर त्याला परदेशस्थ मराठी माणसांकडून ही उत्तम प्रतिसाद मिळू शकेल, आणि त्याच्या कल्पकतेतनं साकारलेली “हलती चित्र” ही वेबसाईट. मराठी चित्रपटांचे रिव्ह्यू, प्रिव्ह्यू पासून प्रोमोज आणि कलाकारांचे खास व्हिडिओ असा सर्व “स्टफ” या वेबसाईटमध्ये पहायला मिळतो. अर्थात वेबसाईट सुरु करण्यापूर्वी मराठी चित्रपटांचा अभ्यास व अलिकडे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांवर पुरस्कार सोहळ्यांवर तो नजर ठेवून होता. त्याम,ुळे मराठी सिनेविश्वात घडणार्या घाडामोडींचा वेध त्याच्या वेबसाईटमध्ये असायचा. (दिसायचा). जेव्हा मराठी निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांना “हलती चित्रे” विषयी कळलं त्यावेळी त्यांच्याकडूनही केयुरची प्रशंसा तर झालीच शिवाय फिल्म्स विषयी ही अनेकदा “एक्सक्लुसिव्ह” कंटेंट दिला. यामध्ये “आयना का बायना” चे समीर कक्कड, “जन गण मन” चे अमित अभ्यंकर, “पुणे ५२” चे दिग्दर्शक निखील महाजन यांचा प्रतिसाद महत्वाचा होता असं केयुर आवर्जुन नमुद करतो.
सध्या अनेक नॉन फिचर फिल्म्स आणि डॉक्युमेंट्रीज सुद्धा मराठी भाषेत बनवल्या जात आहेत. यावर प्रकाश टाकताना केयुर सांगतो की विविध विषय आणि आशय संपन्न अशा या नॉन फिचर फिल्म्स समाजाला निश्चितच दिशा देणार्या ठरत आहेत. पण अजुनही प्रेक्षकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद त्याला मिळत नाही अशी खंत ही तो बोलून दाखवतो; चित्रपटसृष्टी जवळून पाहिल्यामुळे आणि त्याचा अभ्यास केल्यामुळे भविष्यात चित्रपटाची कथा, पटकथा लिहिणार असल्याचा मनोदय तो व्यक्त करतो, केयुरच्या वेबसाईटच्या कामामध्ये त्याचा मित्र पद्मनाभ सुब्रमण्यम ही साथ देत आहे.
तटस्थ वृत्तीने तुझं मराठी सिनेमा विषयीचं मत काय ? यावर केयुर म्हणतो की मराठी चित्रपटांचे विषय आणि कथा या बाजू जरी भक्कम असल्या तरीसुद्धा, चित्रपटांचं मार्केटिंग होत नाही. त्यामुळे चांगली कलाकृती प्रेक्षकांपर्यंतं पोहचायची राहून जाते, व माराठी चित्रपटांना दर्जा नाही असा अपसमज पसरवला जातो. म्हणून मराठी सिनेमा चालत नाही असं मत तो व्यक्त करतो.
सध्या तुझी वेबसाईट ही इंग्रजी भाषेत आहे, मराठीत आणीवी असं नाही का वाटत तुला? यावर त्याचं अगदी स्पष्ट मत आहे की “परदेशी लोकांनाही मराठी सिनेमा विषयीच्या बातम्या आणि स्वरुप कळावं यासाठी “हलती चित्रे” ची रचना झाली आहे, पण लवकरच ती मराठी भाषेत येईल” असं आश्वासन द्यायला ही तो विसरत नाही.
एकूणच केयुर सेता चं मराठी चित्रपटांविषयी असलेल्या आपुलकी बद्दल आणि यशाच्या शिखरावर घेऊन जाण्याची तळमळ पाहिली की आपण मराठी माणसं सुद्धा चित्रपटगृहात जाऊन कितीवेळा मराठी सिनेमा पहातो हा प्रश्न मनात आल्यावाचून रहात नाही, तरी केयुरच्या उपक्रमांमुळे त्याच्याविषयीचा आदरभाव वाढवणारा आहे, असच म्हटलं पाहिजे.
Leave a Reply