नवीन लेखन...

वेबसिरीज : एक रेसिपी 

काही दिवसांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात एका अनोळखी माणसाने मला थांबवलं . म्हणाला ,
” तुम्ही मला ओळखत नाही पण मी ओळखतो तुम्हाला लेखक म्हणून . माझी एक उत्सुकता आहे की वेबसिरीज कशा तयार करतात ? कारण मी सर्व प्रकारच्या मराठी चॅनल्सवरच्या मालिकांचा धसका घेतला आहे . आणि त्या मालिका बघून मराठी प्रेक्षक आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्यासमोर मला वेबसिरीज सादर करायच्या आहेत .”

मुळात मी त्यांना ओळखत नव्हतो . पण त्यांच्या धारिष्ट्याची गंमत वाटली . सहसा सिव्हिल मध्ये गेल्यावर लांब चेहरे , चालण्याची घाई , शोधक नजरा आणि कोरोनाची दहशत असं चित्र असतं .
पण त्यांना वेगळीच उत्सुकता होती .
मला माहीत नाही असं सांगून मी वेळ मारून नेली .
पण मनात मात्र किडा वळवळत राहिला .
हे वेबसिरीज काय प्रकरण आहे ? त्याची उत्सुकता एवढी का असते ?
या वेबसिरीज मोठ्या पडद्यावर का दाखवत नाहीत ?
केवळ मोबाईल आणि स्मार्ट टीव्हीवर त्या पाहणं आवश्यक का असतं ?
असे असंख्य प्रश्न माझ्या इवल्याशा मनाचे भुस्कट पाडू लागले .

मग नेहमीचं तंत्र उपयोगात आणलं .
गुगल धुंडाळलं .
पण मनासारखी उत्तरं मिळाली नाहीत .

मग मुलांना म्हटलं , माझा आहे तो टीव्ही फार खर्च न करता स्मार्ट करून द्या .

आणि गंमत म्हणजे टीव्ही स्मार्ट झाला आणि अहो आश्चर्यम !
कुठल्या कुठल्या कंपन्यांनी निर्माण केलेल्या वेबसिरीज धडाधड पडद्यावर येऊ लागल्या .
सिझन वन , सिझन टू …
म्युझिक सिस्टिमवर त्या ऐकतांना आणि पाहतांना चक्क मल्टिफ्लेक्स वर चित्रपट पाहतोय असं फिलिंग येऊ लागलं .
हां . आता त्या आवाजाच्या व्हायब्रेशन मुळं घरातले काचेचे ग्लास पडून फुटू लागले . खिडक्यांच्या काचा फुटू लागल्या .
आणि रस्त्यावरून जाणारे येणारे आवर्जून आमच्या घराकडे पाहत जाऊ लागले .
मध्येच बॉम्ब फुटल्याचा आवाज घुमला की रस्त्यावरून बेसावध जाणारा बाईकवाला दचकून खाली पडू लागला .

हे सगळं सोडा , पण त्यामुळं माझ्या हाताशी वेबसिरीजची रेसिपी आली .
अगदी कुठलंही मानधन न घेता , उदार अंतःकरणानं , मी ती सर्वांसाठी पाठवत आहे .

वैधानिक इशारा:

या रेसिपीमुळं कुणाचं मनःस्वास्थ्य बिघडलं , घरात भांडणं होऊ लागली , लहान पिढी आणि तारुण्यातली पिढी वाया जाऊ लागली , संस्कृती नष्ट होऊ लागली , शिक्षणावर कुणी पाणी सोडलं , समाजात अनाचार , अत्याचार होऊ लागला , सगळ्या प्रकारचं प्रदूषण होऊ लागलं तर त्याला लेखक जबाबदार नाही !

तर आता आपल्या मूळ विषयाकडे .
वेबसिरीज का बनवायची ?

वेबसिरीजवर कुठल्याही प्रकारचं सेन्सॉर बंधन नसल्यामुळं मुक्त आविष्कार स्वातंत्र्य घेता येतं .

वाङ्मयातील हिंसा म्हणून ज्याला आजपर्यंत हिणवलं गेलं , त्या शिव्यांना समाजाश्रय , राजाश्रय देता येतो .

अत्यंत गलिच्छ प्रकारच्या शिव्या ( अ ते ह पर्यंतच्या ) या सांस्कृतिक वारसा म्हणून भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवता येतात .

किळसवाण्या शृंगाराला कलात्मक असे नाव देऊन ते काम करणाऱ्या अभिनेता आणि अभिनेत्रींना पैसे , प्रसिद्धी आणि जगभर हिंडण्याची मुभा मिळते .

आंतरराष्ट्रीय राजकारण , भारतीय राजकारण , दहशतवाद्यांचे राजकारण , कौटुंबिक राजकारण महाविद्यालयीन राजकारण असे राजकारणाचे अनेक पैलू उलगडता येतात .

परदेशातील स्थळे , वेगवेगळी अत्याधुनिक शस्त्रे , विविध वस्त्रालंकार , फॅशन्स हे विनासायास दाखवता येते .

आपण सर्वच बाबतीत सजग होऊन जातो .

अशी काही उद्दिष्टे समोर ठेवावी लागतात .

आता रेसिपी लक्षात आली असेल .

प्रथम प्रचंड पैसा विनातक्रार देईल असा निर्माता , प्रॉडक्शन हाऊस शोधायचे .

त्यांच्या ‘ सगळ्या ‘ अटी मान्य करणारे नट नट्या आणि इतर सहकारी शोधायचे .

शूटिंगसाठी वेगवेगळे स्पॉट शोधायचे .

दारू , सिगरेट , सगळ्या प्रकारची ड्रग्स उपलब्ध होतील आणि कथानकासाठी त्याचा वापर करता येईल असे कथानक शोधायचे .

दर एका मिनिटाला रक्ताची थारोळी , दर दुसऱ्या मिनिटाला प्रचंड वेगाने जाणारी वाहने , दर तिसऱ्या मिनिटाला अक्सिडेंट , दर चौथ्या मिनिटाला अघोरी शृंगार , दर पाचव्या मिनिटाला शिव्यांचा भडिमार , दर सहाव्या मिनिटाला गूढ जागेतून कॅमेरा फिरवणे , दर सातव्या मिनिटाला भावनिक प्रसंग रचणे , दर आठव्या मिनिटाला राजकारण , दर नवव्या मिनिटाला कौटुंबिक ओलाव्याची फोडणी आणि दर दहाव्या मिनिटाला तत्वज्ञान अशा फ्रेमची मांडणी करायची .
ती पहिली दहा मिनिटे संपली की पुन्हा त्याच क्रमाने पुन्हा फ्रेम मांडायच्या . त्यात किरकोळ बदल करायचा .

वेबसिरीज पाहणाऱ्याला विचार करू द्यायचा नाही आणि तो विचार करतोय असे वाटले तर हृदयाचे ठोके बंद पडतील असे पार्श्वसंगीत हाणायचे .

नऊ दहा भागांचा एक सिझन बनवायचा , त्याच्या शेवटी दुसऱ्या सिझनचं संसूचन करायचं आणि दुसऱ्या सिझनची मालिका सुरू करायची .

त्या दरम्यान अतिशय बटबटीत , कथानकाशी संबंधित असो नसो असे टीझर बनवायचे , प्रोमोज बनवायचे आणि ते वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून प्रेक्षकांवर आपटायचे .
त्यांची उत्सुकता चाळवायची .

एवढं करून अपेक्षित प्रतिसाद नाही मिळाला तर वेगवेगळ्या धर्मांत संघर्ष होईल असे प्रसंग रचून , त्याचा प्रपोगंडा करायचा , आणि मग समाजात , समाजमाध्यमात , न्यूज चॅनल्सवर चर्चा सुरू झाली की वेबसिरीज गाजते आहे असा स्वतःच धांडोरा पिटायचा .

बस !

ही वेबसिरीजची रेसिपी !
सुरुवातीला वैधानिक इशारा दिला आहे , तो पुन्हा देत नाही , तो पुरेसा आहे .

पण एक खात्री आहे , तुम्ही नक्की वेबसिरीज बनवू शकाल .

अगदी मोबाईलवर सुद्धा !
चला तर , लॉकडाऊनच्या बंधनात टाईमपास करू या .

तुमच्या जबाबदारीवर !
तुमची वेबसिरीज , तुमची जबाबदारी !!

आणि हो , सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेटलेले ‘ ते’ तुम्हाला कुठे भेटले तर सांगा , म्हणावं , वेबसिरीजची रेसिपी तयार आहे .

– डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
———-
रेसिपी आवडल्यास सर्वांना पुढे पाठवायला हरकत नाही , अर्थात नावासह !

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 121 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

1 Comment on वेबसिरीज : एक रेसिपी 

  1. एक भयानक वास्तव न घाबरता आपण मांडले आहे ! आजकाल कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची फार काळजी घ्यावी लागते. बिभत्सता ही कडवी झाली आहे.‌आपण कुठे चाललो आहोत याचे हे विदारक चित्रण तुम्ही केले आहे. खूप छान !

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..