सुप्रसिद्ध लेखक, निर्माता अजेय झणकर यांचा जन्म १ सप्टेंबर १९५९ रोजी झाला.
लेखक, पटकथा लेखक, गीतकार, दिग्दर्शक, निर्माता असे अजेय झणकर यांचे बहुआयामी व चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते.
झणकर यांचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत त्यांनी लेखनाचे विशेष पारितोषिक पटकाविल्यानंतर त्यांच्या लेखनप्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. झणकर यांनी जाहिरात क्षेत्रात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. ‘मार्केट मिशनरीज’ संस्थेचे ते संस्थापक होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या मुंबई आवृत्तीसाठी त्यांनी अनेक वर्षे काम केले.
झणकर यांच्या ‘सरकारनामा’ व ‘द्रोहपर्व’ या दोन कादंबऱ्यांनी मराठी साहित्यविश्वात वेगळे स्थान निर्माण केले. ‘सरकारनामा’ कादंबरीवर बेतलेला ‘सरकारनामा’ या चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. या चित्रपटाचे निर्माते, पटकथा लेखन तसेच चित्रपटातील ‘अलवार तुझी चाहूल’ या गाण्याचे गीतकार अशी बहुआयामी भूमिका त्यांनी बजावली. तसेच ‘लेकरू’ या चित्रपटाचे निर्माते व पटकथा लेखक झणकर हेच होते. ‘वडगावच्या लढाईत इंग्रज जिंकते, तर हिंदुस्थान १७७९ सालीच पारतंत्र्यात गेला असता,’ असे सांगणारी ‘द्रोहपर्व’ ही त्यांची कादंबरी गाजली. ‘दोहपर्व’ कादंबरीवर ‘सिंग्युलॅरिटी’ हा हॉलिवूड चित्रपट तयार झाला. मराठी लेखकाच्या साहित्यकृतीवर बेतलेला हा पहिलाच हॉलिवूड चित्रपट ठरला. ‘बटरफ्लाइज ऑफ बिल बेकर’ या रहस्यप्रधान चित्रपटाचे दिग्दर्शन झणकर यांची कन्या सानिया झणकर यांनी केले होते. चित्रपटाची कथा झणकर यांची होती. हॉलिवूडमधील मॅनहटन महोत्सवात हा चित्रपट उल्लेखनीय ठरला होता.
अजेय झणकर यांचे २ एप्रिल २०१७ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply