ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर, कर्णधार आणि विख्यात समालोचक विल्यम मॉरिस तथा बिल लॉरी यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९३७ रोजी झाला.
बिल लॉरी म्हणजे प्रथमदर्शनी दिसतं ते जबरदस्त नाक. एकदम मोठं आणि टोकदार. बोलण्याची लकब, शब्दोच्चार एकदम ऑस्ट्रेलियाला साजेसे. उत्साहाचा धबधबा. नसलेला थरार निर्माण करण्यात, असलेला थरार अजून वाढीव करण्यात हातखंडा. की जीभखंडा म्हणूया! बोलण्याची शैली टोनी ग्रेगशी साधर्म्य असलेली आणि दिग्गज रिची बेनोला पूरक अशी. हे सगळेच चॅनल नाईनचं वैभव होते. ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध चॅनल नाईन कॉमेंट्री टीमचे आधारवड बिल लॉरी यांनी तब्बल ४० वर्षांच्या कारकिर्दीतून २०१८ मध्ये निवृत्ती घेतली. सत्तरच्या दशकात पॅकरची वर्ल्ड सिरीज चालू झाल्यावर खेळातला ‘कमर्शियल एलिमेंट’ वाढत होता. तेव्हाच चॅनल नाईनने रिची बेनो, बिल लॉरीसारखे कॉमेंटेटर्स जमा केले. मग इयान चॅपल, टोनी ग्रेगही येऊन मिळाले. ऑस्ट्रेलियातली भव्य मैदानं, मस्त प्रक्षेपण आणि चॅनल नाईनची टीम हे भन्नाट कॉम्बिनेशन जगभर लोकप्रिय होतं.
बिल लॉरी हे भक्कम आणि अतिशय चिवट फलंदाज होते. रॉबर्ट ‘बॉबी’ सिम्पसन आणि बिल लॉरी या सलामीच्या जोडीने एक काळ गाजवला. लॉरी नंतर कर्णधार झाले. पण दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध मालिका गमावल्यामुळे त्यांची ही इनिंग फारशी यशस्वी ठरली नाही. मात्र निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या फलंदाजी शैलीशी पूर्णपणे फारकत घेतलेला समालोचक कमेंटरी बॉक्समध्ये जन्माला आला! अतिशय आक्रमक, तितकीच आकर्षक, चटपटीत आणि नाकात बोलण्याची त्यांची छबी बिल लॉरींना एक लोकप्रिय कमेंटेटर बनवून गेली. अवघ्या काही सेकंदांमध्ये मैदानावरील परिस्थितीचे बिनचूक वर्णन करणे हे तर त्यांचे खास वैशिष्टय होते. बिल लॉरी यांनी २०१८ मध्ये चॅनल नाईनवर ४० वर्ष कमेंटेटर म्हणून काम करून निवृती घेतली.
बिल लॉरी यांची कारकीर्द:
६७ टेस्ट मैच, लॉरी यांनी १२३ डावांच्या मध्ये ५२३४ रन बनवल्या ते ४ वेळा रिटायर्ड हर्ट झाले आहेत. बिल लॉरी यांचा सर्वाधिक टेस्ट स्कोर २१० आहे. त्यांनी १३ शतक व २७ अर्धशतक बनविले आहेत. बिल लॉरी यांनी एकच वनडे मैच खेळली आहे, त्यात त्यांनी २७ रन केल्या.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply