लॅटिन भाषेत पेट्रोस म्हणजे खडक. त्यापासून मिळवलेले तेलकट पदार्थ म्हणजे पेट्रोलियम पदार्थ.रॉकेल हा शब्दही रॉक ऑईल म्हणजे खडकापासून मिळवलेले तेल असाच | होतो. यातील मूळ पदार्थ आहे क्रूड ऑईल अथवा कच्चे तेल. हे भारतातआसाम, कच्छ, कर्नाटक, मुंबईजवळील समुद्रात (मुंबई हाय) येथे जसे मिळते तसेच ते रशिया, कॅनडा, इराण. इराक, मध्य पूर्वेतील देश असे जगात अनेक | ठिकाणी मिळते. यातील मध्य पूर्वेतील देशातून मिळणारे कच्चे तेल अधिक गुणवत्तापूर्ण असते. क्रूड ऑईल तेल शुद्धिकरण कारखान्यात आणून ते उच्च तापमानाला उकळवतात. कच्चे तेल उच्च तापमानाला उकळवत असताना त्यातून विविध तापमानाला विविध घटक मिळू लागतात. पुढे त्यावर आणखी काही प्रक्रिया करुन आणि इतर काही घटक मिसळून पेट्रोल, डिझेल, नॅफ्था, केरोसिन, विमानाचे इंधन, डांबर, इंधन वायू (एलपीजी) इत्यादी पदार्थ मिळवतात. दूध तापवल्यावर जसे साय,बासुंदी, रबडी, दही, ताक, लोणी, तूप हे पदार्थ मिळतात तसेच कच्च्या तेलापासून मिळणारे हे निरनिराळे पदार्थ आहेत. पेट्रोल, नॅफ्था, विमानाचे इंधन हे अती बाष्पनशील पदार्थ आहेत म्हणजे हे पदार्थ हातावर ठेवले तर क्षणांत हातावरुन उडून जातात कारण त्यांची वाफ होते.
यातील नॅफ्था ह्या पदार्थात भरपूर हायड्रोकार्बन असतात. परत एकदा तो पदार्थ भट्टीत उकळविल्यास (भंजन करणे) त्यापासून इथेन आणि प्रॉपेन वायू मिळतात. पुढे त्यापासून इथिलिन आणि प्रॉपिलिन हे पदार्थ मिळतात.या पदार्थांचा वापर करुन पुढे हजारो पदार्थ बनवता येतात. ती रसायने असतात आणि पेट्रोलियम या मूळ पदार्थापासून मिळालेली असल्याने त्यांना पेट्रोरसायने असे म्हणतात.
पेट्रोरसायने फक्त नॅफ्था या पदार्थापासून मिळतात असे नसून ऊसापासून साखर तयार करताना ऊसाच्या रसावरची मळी काढावी लागते. त्या मळीपासूनही हेक्झॉनॉल, ब्युटिनॉलसारखी पेट्रोरसायने मिळू शकतात. मद्यार्के जशी अनेक पदार्थापासून मिळवता येतात तशी पेट्रोरसायने मिळवण्याचेही कोळसा, गॅस असे अनेक मार्ग आहेत.
अ.पां. देशपांडे, (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply