खरंतर ह्या वरील सर्व मुद्यातच ‘काय करायला पाहिजे’ह्याचे उत्तर लपलेले आहेच.म्हणून त्याशिवाय आणखी पूरक काय-काय करता येईल त्याचा विचार करुया.
हे काम तीन टप्प्यावर करावे लागेल.
1. शिक्षक.
2. पालक.
3. इतर घटक.
विनोबांनी शिक्षणाची व्याख्या केली आहे,’जे देता येत नाही ते शिक्षण.’
पण आपल्या शिक्षकांना वाटतं ‘शिकवणं ही त्यांची मक्तेदारी आहे!’खरंतर शिक्षकांनी शिकवायचं नाही तर,शिकण्यासाठी मुलांना उत्सुक करायचं;शिकण्यासाठी/शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार करायचं व स्वयंअध्ययनासाठी त्यांना संधी द्यायची.ह्या संदर्भात विविध भाषिक खेळ,उफम व प्रकल्प कसे कार्यान्वित करावेत ह्याचे प्रशिक्षण शिक्षकांना द्यावे लागेल.
त्याचप्रमाणे शिक्षकाला भाषा शिकविताना येणारी नेमकी अडचण व त्यावरील ठोस उपाययोजना,ह्याचा मुख्यत्वे प्रशिक्षणात सहभाग करावा लागेल.(अशा गोष्टी शासकीय प्रशिक्षणात शिकविल्या जात नाहीत.) त्यामुळे शिक्षकाला भाषेविषयी असणारा आकस व भीती कमी होण्यास मदत होईल.त्याला मोकळेपणाने प्रश्न विचारता येतील. उदा.त्यांच्या काही समस्या अशा असू शकतात,’मुलांना शब्दाचा अर्थ समजतो,पण त्याचा त्यांना वाक्यात उपयोग करता येत नाही.किंवा,बैल लिहिण्यास सांगितले असता, ‘बईल’लिहितो.’ अशावेळी काय करावे? इत्यादी.
म्हणून शिक्षकांना मिळणारे प्रशिक्षण हे शिक्षकांतील सुप्त सर्जनशीलता जागे करणारे, त्यांा कार्यप्रवण करणारे त्यांना मातृभाषेविषयी अभिमान व आत्मविश्वास देणारे असायला हवे.
मुलांची भाषिक गोडी वाढविण्यासाठी कुठल्याही शाळेत सहज शक्य होणारे आणि शून्य खर्चाचे काही उफम/प्रकल्प पुढीलप्रमाणे :
1. प्रत्येक वर्गाचे,प्रत्येक महिन्याचे एक भिंती-पत्र,त्यात अधिकाधिक मुलांचा सहभाग.
2. शाळेत वर्गा-वर्गांच्या व केंद्रात शाळा-शाळांच्या भिंती-पत्र स्पर्धा.
3. इयत्ता चौथीच्या मुलांनी लिहिलेले लेखनपाठ हे इयत्ता पहिलीच्या/दुसरीच्या मुलांसाठी वाचनपाठ.
4. प्रत्येक वर्गाचे त्रैमासिक.
5. प्रत्येक वर्गाचा’म्हणी व वाक प्रचार संग्रह.’
6. प्रत्येक शाळेची ‘वर्ड बँक.’
7. शाळेच्या वाचनालयातील पुस्तकांचा उपयोग करून,मासिक स्पर्धा.
8. ‘शाळेचे वाचनालय हेच गावाचे वाचनालय!’ हे लक्ष्य समोर ठेवून समाजाच्या मदतीने शाळेचे वाचनालय वर्षभर खुले राहील व मुलांप्रमाणेच गावालाही त्याचा फायदा होईल ह्यासाठी शाळेने/शिक्षकांनी प्रयत्नशील असणे.
9. ‘वेगवेगळ्या भाषांतील समान अर्थी शब्द शोधा’..स्पर्धा.उदा.वडिलांच्या भावाला मराठीत काका म्हणतात.हिंदी,गुजराती,इंग्रजी,तेलगू किंवा आणखी कोणत्याही बोली भाषेत सुध्दा काय म्हणतात ते शोधून काढा.चार पेक्षा अधिक भाषातून नावे शोधणाऱ्या मुलांची नावे आठवडाभर शाळेच्या फलकावर लिहा व त्यांनी लावलेले शोध सुध्दा!! (ह्यासाठी संदर्भ ग्रंथांची किंवा परिसरातील कुणाचीही मदत घ्या.)
10. निबंध लेखनाच्या विविध पध्दती.
11. किमान वर्षातून एकदा,’भाषा जत्रा,विज्ञान जत्रा’असे काही उपक्रम.
12. मुलांनीच भरवलेली ‘बोलकी प्रदर्शने.'(संदर्भ : प्रस्तुत लेखकाचे ‘आमची शाळा’हे पुस्तक.प्रकाशक : मनोविकास प्रकाशन.)
13. शाळेतील वाचनालये कार्यान्वित करुन मुलांसाठी/शिक्षकांसाठी ‘वाचन पुरस्कार'(वाचन श्री,वाचन भूषण,वाचन रत्न,वाचन हिरा इत्यादी.)
14. मुलांच्या वाढदिवशी एक पुस्तक शाळेला भेट.(ही योजना वैयक्तिक किंवा एकत्रितपणे पण कार्यान्वित करता येईल.)
15. ‘वाचनातून वाचनाकडे!’ महिन्याच्या शेवटच्या दिवशी ज्या-ज्या मुलांना शक्य आहे त्यांनी आपापल्या घरातील वर्तमानपत्रांची रद्दी शाळेत जमा करायची. ही रद्दी एकत्रिपणे विकून त्यातून मुलांसाठी/शाळेच्या वाचनालयासाठी गोष्टीची पुस्तके घ्यायची.
16. प्रत्येक शाळेत आठवड्याला एक ‘वाचन गप्पा’ तासिका.
17. मूल्यांकनाच्या विविध सुलभ पध्दती.(निव्वळ लेखी परीक्षा नव्हे, तर उपक्रम/प्रकल्प/मुलांशी झालेल्या गप्पा/निरीक्षणे/मुलांचा शैक्षणिक सहभाग अशा विविध पध्दती.)
18. समाजाचा सहभाग असणारे काही भाषिक उपक्रम/स्पर्धा.
19. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,विनोबांनी सांगितल्याप्रमाणे ‘शाळा घरात आली पाहिजे आणि घर शाळेत गेलं पाहिजे.’
ही यादी आणखी खूप वाढविता येईल.पण केवळ विषयाचा अंदाज यावा म्हणून अतिशय थोडक्यात मांडणी करत आहे.
पालक ह्या गटात प्रचंड ऊर्जा सामावलेली असते.ह्या ऊर्जेचा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कसा कौशल्याने उपयोग करून घ्यायचा,हे चांगला शिक्षक जाणतोच.
1. ‘गृहपाठ’म्हणजे घरी करावयाचा अभ्यास,असा विचार न करता,गृहपाठ म्हणजे ‘घराने करावयाचा अभ्यास’असा विचार केला तर अनेक प्रश्न सोपे होतात.
2. विशिष्ट वयोगटातील मुलांनी कोण-कोणती पुस्तके वाचावीत,ह्याची यादी पालकांना मिळायला हवी.
3. कथाकथन/वाचन तंत्र,मुलांचा अभ्यास घेण्याच्या (खरं म्हणजे,मुलांना अभ्यास करू देण्याच्या) विविध अभिनव पध्दती,मुलांची भाषा आणि आपण अशा वेगवेगळ्या विषयावर पालक कार्यशाळा व्हायला हव्यात.
4. शाळेतील वाचनालय चालविण्यासाठी/वाचन विकास प्रकल्पासाठी पालकांची मदत घेता येईल.
5. भाषेच्या खेळांचे,व्याकरणांचे,समान अर्थी शब्दांचे,वाकप्रचार व म्हणींचे,हमखास चुकणारे शब्द योग्य प्रकारे कसे लिहावेत ह्यांचे तक्ते तयार करण्यासाठी पालकांची मदत. (काही दिवसांनी हे तक्ते दुसऱ्या शाळेला द्यावेत व त्यांच्या शाळेतील तक्ते आपण आणावेत.ह्यामुळे मुलांसाठी नाविन्य व उजळणी आणि आधीच्या तक्त्यांवर परीक्षा.)
इतर घटक ह्या प्रकारात भाषा विषयक काम करणाऱ्या अनेक संस्थांचा/नागरीकांचा/ गोष्टींचा समावेश करता येईल.उदा.
— महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ.
— महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद.
— बाल चित्रवाणी.
— दूरदर्शन व इतर मराठी वाहिन्या.
— चिल्ड्रन फिल्म सोसायटी.
— राज्य मराठी विकास संस्था.
— साहित्य अकादमी.
— नॅशनल बुक ट्रस्ट (मराठी विभाग)
— नेहरू बाल पुस्तकालय (मराठी विभाग)
— साहित्य संस्कृती मंडळ.
— मराठी विज्ञान परिषद.
— मराठी प्रकाशक संघटना.
— खाजगी व शासकीय वाचनालये.
— पुस्तकांची दुकाने व फिरती पुस्तक प्रदर्शने.
— मराठी वृत्तपत्रांचे व त्यातील पुरवण्यांचे संपादक.
— कॉलेजातील मराठी विभाग प्रमुख व तेथील मराठी वाङमय मंडळे.
— स्वयंसेवी संस्था.
— मराठी प्रेमी नागरीक.इत्यादी.
मराठीची रुची वाढण्यासाठी ह्या वरील सर्व घटकांची विस्तृतपणे मदत मिळू शकते.
Leave a Reply