पाठ्यपुस्तकाकडून म्हणजेच बालभारती कडून काही माफक अपेक्षा असतात उदा :
— भाषेची गोडी लावणं.
— भाषेच्या विविध प्रकारांची ओळख करुन देणं.
— विविध वाङमय प्रकारांची ओळख करून देणं.
— वाचनाची आवड रुजवणं.
— मुलांना स्वयं लेखनास प्रवृत्त करणं.
— रटाळ नव्हे तर रंजक व आव्हानात्मक वाटतील असे स्वाध्याय.
— शब्द कोडी,शब्द-चित्र कोडी.
— मुलांची शब्द संपत्ती वाढेल,अशा भाषिक खेळांचा समावेश.
— मुलांना आपल्या मातृभाषेविषयी अभिमान वाटेल,ह्यासाठी समाजाचा सहभाग असणारे काही उफम.
— मराठीतील विविध लेखकांची/कवींची मुलांना ओळख व्हावी,व त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची किमान नावे तरी मुलांना समजावीत.
— पाठ्यपुस्तकात संदर्भ पुस्तकांची सूची असणं.
— संदर्भ ग्रंथांचा उपयोग कसा करावा ह्याची माहिती व त्याचे फायदे मुलांना समजतील ह्याची काळजी घेणं.इत्यादी.
पण ह्या निमित्तमात्र असणाऱ्या माफक अपेक्षा पाठ्यपुस्तक पुरे करते का? तर प्रामाणिकपणे ह्याचं उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल! किंबहुना अरुची निर्माण करण्यातच पाठ्यपुस्तकाचे योगदान आहे! ह्याबाबत तीन प्रमुख गोष्टींकडे मी शिक्षणप्रेमींचे लक्ष वेधू इच्छितो.
एक,घरात बसून किंवा थंड हवेच्या ठिकाणी जाऊन बालसाहित्य लिहिता येत नाही. मुलांसाठी सोपं लिहिणं कठीणच आहे! कारण मुलांचा विचार करताना प्रथम त्यांच्या वयोगटाचा व त्यांच्या भावविश्वाचा विचार करावा लागतो.अनोळखी मुलाशी पण बोलू शकणारा,मूल समजून घेऊ शकणारा आणि ह्रदयातलं मूल जागं असणारा माणूसच मुलांसाठी लिहू शकतो. बालभारतीच्या भाषा विषयाच्या अध्यक्षपदी असणारी व्यक्ती ही लहान मुलांशी आणि बाल साहित्याशी संबंध असलेली असावी.
दोन,मराठी विषयाची समिती ही ‘कोटा पध्दतीने’तयार होते.समितीमधल्या व्यक्तींचा बाल साहित्याशी किंवा मुलांशी काय संबंध आहे हे मुद्दे तिथे गौण आहेत.’इतर घटक’ अधिक प्रभावी आहेत,असे समजते.
तयार झालेली समिती कधीही बरखास्त होऊ शकते.किंवा काम पूर्ण होत आल्यावर समितीतील काही व्यक्तींना अचानक वगळले जाऊन,त्यांच्या जागी आलेल्या नवीन व्यक्ती आधीच्या कामाचा सहजी ताबा घेऊ शकतात.त्यामुळे ह्या समितीचे काम प्रचंड दडपणाखाली सुरू असते.असा संशयाने पछाडलेल्या आणि दडपणाखाली वावरणाऱ्या समितीकडून सर्जनशील कामाची अपेक्षा तरी काय करणार? सध्या तर हे काम ‘निमंत्रित’ मंडळीच करत आहेत. ‘निमंत्रित’चा अर्थ,विभागप्रमुखाची मर्जी असेल तर निमंत्रण! नाहीतर फक्त शुभेच्छाच!!
तीन,बालभारतीची साहित्य निवड पध्दती आणि पाठाखालील स्वाध्यायांची रचना.(हा खरं तर संशोधनाचा आणि प्रबंधाचाच विषय आहे.)बालभारतीच्या मराठी विभागाच्या,साहित्य निवड पध्दती बाबत माझे वैयक्तिक मत इथे नोंदवत आहे.इतर भाषांच्या निवड पध्दती बाबत मला माहित नाही.
बालभारतीच्या मराठी समितीने एखाद्या लेखकाचे साहित्य निवडले (साहित्य कसे निवडले जाते ही एक मनोरंजक व उत्कंठावर्धक कहाणी आहे.जागेअभावी ती इथे देताच येणार नाही.) की, त्याला तसे पत्र पाठवले जाते.’साहित्यात काही बदल करावे लागल्यास आपली परवानगी असावी’ असे त्या लेखकाला कळवून त्याच्याकडून होणाऱ्या बदलासाठी ‘आगाऊ परवानगी’ घेतली जाते.पण त्यानंतर त्याच्या लेखनात काय बदल केले आहेत हे त्या लेखकाला न कळवताच,त्या बदलाला जणू काही लेखकाने परवानगीच दिली आहे असे गृहित धरून बदलासकट मजकूर प्रकाशित होतो. हे अनैतिक व लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे असे मला वाटते. लेखकाची परवानगी मिळाल्यानंतर,समिती त्यात जो बदल करते,तो बदल लेखकाला कळवलाच पाहिजे.केलेला बदल जर त्या लेखकाला मान्य नसेल तर त्याचे साहित्य सन्मानपूर्वक त्याला परत पाठविले पाहिजे.हे बालभारतीच्या प्रतिष्ठेला शोभा देणारे आहे.
बालभारतीच्या ह्या मनमानी कारभाराचा तडाखा विंदा करंदीकरांना पण बसला आहे.(संदर्भ : सुलभ भारती.इयत्ता 6 वी.2001) विंदा करंदीकरांनी कधी लिहिलीच नाही अशा कवितेखाली विंदांचे नाव आहे! आणि ही कविता महाराष्ट्रातील चाळीस लाख मुले विंदांचीच समजून वाचत आहेत.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासकच त्यावेळी मराठी समितीचे अध्यक्ष होते.
त्यावेळी वर्तमानपत्रातून ह्याबाबत अनेक पत्रे आली.पण हे गैर आहे असे, बालभारतीचे संचालक,मराठी विभागाचे प्रमुख आणि मराठी समितीचे अध्यक्ष ह्यांना वाटले नाही हे विशेष!! त्यामुळे ह्या ‘अनैतिक प्रकाराला राजाश्रय मिळाला आहे’ ह्याची खात्रीच पटल्याने,बालभारतीच्या मराठी विभाग प्रमुखांनी ही (महान) परंपरा तशीच इमानेइतबारे पुढे चालू ठेवलेली आहे!!
असले दुय्यम दर्जाचे ‘ढवळाढवळ साहित्य’ जर मुलांना,भाषा शिक्षणाच्या पहिल्या पायरीवरच भेटत असेल तर त्यांना का वाटावा मातृभाषेविषयी अभिमान? आणि कशी निर्माण होणार त्या मराठीची गोडी? बालभारती मधले स्वाध्याय हा एक अजबच प्रकार आहे.मुख्य म्हणजे हे स्वाध्याय स्मरणशक्तीवर आधारित आहेत,आकलनशक्तीवर नाहीत! त्याचप्रमाणे हे स्वाध्याय हे निव्वळ पाठावर आधारित आहेत,पाठातील आाशयावर नाहीत! हे स्वाध्याय इतके पकाव असतात की मुले अक्षरश: पिसून निघतात. ‘सक्तमजूरी परवडली पण हे स्वाध्याय नको’ अशी त्यांची अवस्था होते.आणि त्यामुळेच पाठ्यपुस्तकातील धडे/कविता ह्याविषयी एक घृणा त्यांच्या मनात पैदा होते!
वानगी दाखल एक छोटेसे उदाहरण पाहू.’चामड्याची एक चौकोनी पिशवी घेऊन सुरेश ऑफिसला निघाला होता.’ ह्या वाक्यावरचा ‘बालभारतीय स्वाध्याय’ पुढीलप्रमाणे असू शकतो :
1. सुरेश कुठे निघाला होता?
2. चामड्याच्या पिशवीचा आकार कोणता असतो?
3. ऑफिसमधे कशाची पिशवी नेतात?
4. सुरेश किती पिशव्या घेऊन ऑफिसला जातो?
ह्या स्वाध्यायात नाही काही कल्पकता/रंजकता/उपक्रम/प्रकल्प किंवा मुलांच्या सर्जनशीलतेला आवाहन व आव्हान! केवळ ‘घोकंबाज’ मुलेच ह्यातून तयार होतात.
स्वाध्यायातील प्रश्न हे बहुआयामी असायला हवेत.त्या प्रश्नांना अनेक उत्तरे असायला हवीत.मुलांच्या विचाराला चालना मिळणे,त्याच्यातील सूप्त सर्जनशीलता जागी होणे,विचार करण्याच्या विविध पध्दतींची त्यांना ओळख होणे आणि मी स्वत:हून शिकू शकतो/नवीन शोधू शकतो हा विश्वास त्याच्या मनात निर्माण होणे हे स्वाध्यायाचे मुख्य उद्दीष्ट असले पाहिजे.
समजा, त्याच वाक्यातील आशयावर जर स्वाध्याय तयार करायचा असेल तर तो पुढील प्रमाणे असावा :
1. कुठल्या-कुठल्या गोष्टींपासून पिशव्या तयार होतात? उदा.नायलॉन,कापड इ.
2. ऑफिसला नेण्यासाठी,भाजी आणण्यासाठी,तेल आणण्यासाठी अशा आणखी कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या तुम्हाला माहित आहेत?
3. एकच पिशवी वेगवेगळ्या कामासाठी वापरता येऊ शकते का? कशाप्रकारे?
4. पिशव्यांचे किती वेगवेगळे आकार तुम्हाला माहित आहेत? तुम्हाला आवडणारा आकार तुमच्या वहीत काढा व रंगवा.
5. जुनी वर्तमानपत्रे घेऊन त्यापासून वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्या तयार करा.त्यावर नक्षी काढून त्या रंगवा.ह्यासाठी कुणाचीही मदत घ्या.तुम्ही तयार केलेल्या पिशव्यांचे वर्गातच प्रदर्शन भरवा.इ.
भाषेची गोडी निर्माण करण्याचे प्रयत्न पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळांपासूनच सुरू व्हायला हवेत.आणि हे जरी खरं असलं तरी,ह्याच्याशी संबंधित पुन्हा अनेक घटक आहेत.त्यांचाही आपल्याला विचार करावाच लागेल कारण ते ‘मराठीशी’संबंधित आहेत. उदा.
— इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मराठी मुलांचे भाषिक प्रश्न.
— परराज्यात राहणाऱ्या मराठी मुलांचे भाषिक प्रश्न.
— परदेशात राहणाऱ्या मराठी मुलांचे भाषिक प्रश्न.
— पालकांपैकी एक मराठी व दुसरा अन्य भाषिक असणाऱ्या मुलांचे प्रश्न.
— कर्ण बधिर मुलांचे,मराठी भाषा विषयक प्रश्न.(उदा.ह्या मुलांना प्रत्यय आणि उपसर्ग शिकविताना खूप त्रास होतो.)
— अंध मुलांचे मराठी भाषेबाबतचे प्रश्न.
— अंधांसाठी मराठीतून सीडी व ब्रेल मधे पुस्तके उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या अडचणी.
असो.काम तर खूपच आहे,आणि ते आपल्यालाच करावयाचे आहे.त्यामुळे कामाचा आराखडा तयार करण्यासाठीच हे छोटेसे टिपण.
———————————————————————————————————————————————
राजीव तांबे.
ए/202 पूर्णिमा दर्शन. श्रीखंडे वाडी.
डोंबिवली (पूर्व) 421201
Leave a Reply