भारतात अनेक ठिकाणी वीजनिर्मिती केंद्रे आहेत. यातील काही जलविद्युत केंद्रे आहेत, काही कोळशावर चालणारी औष्णिक केंद्रे आहेत, काही अणुभंजन करुन वीज निर्मिती करणारी औष्णिक केंद्रे आहेत तर काही ठिकाणी पवन ऊर्जा केंद्रे आहेत.
एसी वीज बनवल्यावर ती लगेच वापरावी लागते. ती साठवून ठेवता येत नाही. ती बनवल्यावर वीजवाहक तारात सोडून जेथे वापरायची तेथे नेतात. एखादे केंद्र ज्या भागात असते त्याच्या आजुबाजूच्या भागात तेवढी वीज वापरता येणार नसेल तर उर्वरीत विजेचे काय करायचे? यासाठी एखाद्या राज्यातली सगळी विद्युत केंद्रे वीजवाहक तारांनी एकमेकाला जोडतात. विजवाहक तारांना ग्रीड म्हणतात आणि राज्यभरच्या अशा तारांच्या जाळयाला स्टेट ग्रीड म्हणतात.
याच पद्धतीने एखाद्या राज्यात जर जास्तीची वीज निर्मिती होत असेल आणि शेजारच्या राज्यात विजेची टंचाई असेल तर शिलकीचे राज्य दुसऱ्या राज्याला वीज विकू शकते. मात्र त्यासाठी त्या दोन राज्यांची ग्रीड्स एकमेकाला जोडलेली असावी लागतात.
भारतात सगळीच राज्ये विजेच्या तारांनी एकमेकाला जोडलेली आहेत. या ग्रीडला नॅशनल ग्रीड म्हणतात. एका राज्याने दुसऱ्या राज्याची वीज चोरु नये म्हणून ही ग्रीड्स एखादे बटण लावून वेगळीही ठेवता येतात. त्याला आयसोलेटर स्वीच म्हणतात. त्यामुळे राज्ये परत वेगवेगळी होतात.
राज्यातील एखादे केंद्र काही दोषांमुळे बंद पडले तर ग्रीड पद्धतीमुळे दुसऱ्या केंद्रावर विजेची जास्तीची मागणी जाते कारण मागणी तशीच राहते. दुसऱ्या केंद्रावरील जनित्रांवर (जनरेटर) जास्त भार पडल्याने ते जनित्र बंद पडते.परत त्या मागणीचा भार तिसऱ्या केंद्राकडे जातो आणि तेथील जनित्र बंद पडते. अशा पद्धतीने राज्यातील केंद्रे एकामांगे एक बंद पडतात. यालाच कॅस्केड टीपिंग म्हणतात. आयसोलेटर स्विचमुळे इतर राज्यातील केंद्रे मात्र त्यामुळे बंद पडत नाहीत.
Leave a Reply