नवीन लेखन...

‘स्वतंत्र विदर्भ’ म्हणजे काय रे भाऊ?

What is Independent Vidarbha and Why?

दिवसभराचे कामकाज आटोपून आपल्या घरी निघालेल्या एका मध्यमवर्गीय पांढरपेशा वैदर्भीय कर्मचाऱ्याला मी विचारले

– ‘विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हायला पाहिजे का?’

एखादा मनोरुग्ण भेटावा अशा तऱ्हेने माझ्याकडे बघत तो म्हणाला

‘‘स्वतंत्र विदर्भ म्हणजे काय रे भाऊ? महाराष्ट्रापासून विदर्भ जर वेगळा झाला तर नक्की कोणाचे भले होणार भाऊ? केवळ कागदोपत्रीच असणाऱ्या रस्त्यांचे की अस्तित्वात असलेल्या रस्त्यांमधील लोणार सरोवराच्या आकाराशी स्पर्धा करणाऱ्या खड्ड्यांचे? ग्रामीण भागातील जीवघेण्या पाणी टंचाईने हैराण झालेल्या जनतेचे की कर्जाच्या वरवंट्याखाली चिरडल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांचे? ग्रामपंचायतीपासून तर महाराष्ट्राच्या उपराजधानीपर्यंत बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचे, की त्याला सक्रीय मदत करणाऱ्या पुढाऱ्यांचे? माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला वेगळ्या विदर्भाशी काहीही देणेघेणे नाही. माझ्यासारख्या असंख्य वैदर्भीयांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे एवढीच माझी राज्यकर्त्यांकडून माफक अपेक्षा आहे.’’

असं म्हणून काही क्षणातच तो आपल्या घराकडे चालता झाला. त्याने माझ्यावर केलेल्या प्रश्नांच्या भडिमारामुळे मी अंतर्मुख होऊन स्वतःलाच प्रश्न विचारला

‘विदर्भ खरंच स्वतंत्र झाला तर त्यामुळे नक्की कोणाचे भले होईल?’

विदर्भातील जनतेच्या मतांचा अत्यंत प्रामाणिकपणे कौल घेतला तर वेगळा विदर्भ ही जनतेची मागणी नाही हे स्पष्ट होईल. असं असताना ‘स्वतंत्र विदर्भ’ ही नक्की कोणाची व कशासाठी मागणी आहे? या प्रश्नाचे एकमेव उत्तर म्हणजे ही जनतेची नाही तर पराकोटीच्या लोभी, स्वार्थी व अत्यंत सत्तापिपासू नेत्यांची मागणी आहे. वैदर्भीय जनतेच्या दुर्दैवाने महाराष्ट्रापासून विदर्भ जर वेगळा झालाच तर त्याचे काय भवितव्य असेल याची ही छोटीशी झलक.

१. श्रेय घेण्याच्या वादातून मिहान प्रकल्पाच्या प्रगतीत खीळ घालण्यासाठी अहमहमिकेने भांडणारे कर्तृत्वशून्य नेते विदर्भातील एकही प्रकल्प यशस्वी होऊ देणार नाहीत.

२. विदर्भातील गरीब शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये हडपून साखर कारखाने लिलावात काढणारे दिवाळखोर नेते पुन्हा नविन उत्साहाने साखर कारखाने व सूतगिरण्या उभ्या करून शेतकऱ्यांना पूर्णतः नागवतील व अफाट माया जमवतील.

३. पेन्शनीत निघालेले, अडगळीत पडलेले, व मतदारांनी दूर सारलेले नेते स्वतःची ‘सोय’ लावण्यासाठी राज्यकर्ते बनून वैदर्भीय जनतेच्या उरावर बसतील. अशा नेत्यांना विदर्भाच्या भल्याचे काडीचेही सोयरसूतक नसेल याचा मुद्दाम उल्लेख करण्याची गरज नाहीच!

४. विदर्भातील सर्वसामान्य जनतेला आंदोलने करायला व पोलिसांच्या लाठ्या खायला लावून वेगळ्या विदर्भाचे श्रेय स्वतः लाटत हे लोकप्रतिनिधी राज्य करण्याच्या बहाण्याने अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून अफाट संपत्ती गोळा करतील व आधीच अस्तित्वात असलेल्या त्यांच्या साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार करतील.

५. एकूण लोकसंख्येत तब्बल ६५ टक्के वाटा असलेल्या शेतकऱ्यांना वेगळा विदर्भ नव्हे तर सन्मानाचं जीणं हवं आहे याचा स्वार्थी नेत्यांना जेव्हा साक्षात्कार होईल तेव्हा खूप उशीर होऊन गेलेला असेल.

६. ‘एकाही नेत्याला एकही पैसा खर्च करण्याचा अधिकार नाही. स्वतंत्र विदर्भाचा कारभार एखाद्या खाजगी कंपनीसारखा कॉर्पोरेट पद्धतीने चालविल्या जाईल’ असं जर विदर्भातील नेत्यांना स्पष्ट शब्दात बजावलं तर स्वतंत्र विदर्भासाठी अत्यंत उत्साहाने रस्त्यावर उतरणारे हेच अप्पलपोटे नेते सर्व काही विसरून जनतेला विचारतील – ‘‘स्वतंत्र विदर्भ म्हणजे काय रे भाऊ?’’

(शिक्षण,नोकरी,व्यवसाय व समाजकार्याच्या निमित्ताने तब्बल ४५ वर्षे विदर्भात घेतलेल्या अनुभवांवर आधारित.)

श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com

श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 Articles
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..