आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनीअर ह्यात काय फरक आहे? घर १९५०-६० सालापर्यंत लोक काँट्रक्टरला बोलावून घरे बांधीत.आर्किटेक्टकडून घराचा नकाशा बनवून घ्यावा हे तोपर्यंत फारसे प्रचलित झाले नव्हते. तेव्हा मुंबईचे जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सोडता महाराष्ट्रात अन्यत्र जवळ जवळ अशी महाविद्यालयेही नव्हती. आर.एस. देशपांडे यांच्या घरबांधणीवरील पुस्तकात घरांचे चार-पाच नमूने दिले होते, त्याबर हुकूम काँट्रक्टरकडून (जो मुळात गवंडीच असे) बांधून घेतले जाई.
१९८४ साली, आर्किटेक्चरची महाविद्यालये मोठया प्रमाणात सुरु झाली आणि लोक आर्किटेक्ट लोकांकडे जाऊ लागले. घर बांधताना घरात किती खोल्या असाव्यात,प्रत्येक खोलीचा उपयोग कसा करणार, त्यामुळे तिचा आकार किती असावा, उन्हाची, वाऱ्याची दिशा कोणती, संडास, बाथरुम कुठे आणि कशी हवी वगैरेचा बारकाईने विचार करणारे लोक म्हणजे आर्किटेक्ट.याशिवात ते घरबांधणीत इमारतींच्या बाह्य आणि अंतर्गत सौंदर्याचा, माणसांच्या सवयी आणि शारीरिक हालचालीचाही (इर्गानॉमिक्स) विचार करतात. तर स्ट्रक्चरल इंजिनिअर जरा वेगळे काम करतो. आर्किटेक्टने आराखडा काढून दिला की स्ट्रक्चरल इंजिनिअरचे काम सुरु होते.योग्य संरचना क रुन तो इमारतीच्या मजबुतीकडे लक्ष देतो.एका परीने म्हटले तर त्याचे काम पडद्यामागचे असते. इमारतीत आपल्याला दिसते ते तिचे फक्त बाह्यस्वरुप.एखाद्याच्या शरीरातील अस्थींचा सापळा जसा आपण बघू शकत नाही तसेच हे आहे. पण शरीरातील एक जरी हाड मोडले तरी आपले जीवन कठीण होते, तसेच इमारतींचेही असते. त्यामुळे कोणत्याही प्रकल्पासाठी योग्य स्ट्रक्चरल इंजिनिअर निवडणे अतिशय महत्वाचे असते.
नाहीतर एखाद्या व्यक्तीला खूप सजवले तरी जोवर तिची मूळ प्रकृती धडधाकट नाही तोवर ती सुंदर दिसत नाही. स्ट्रक्चरल इंजिनिअरचे कार्यक्षेत्र मोठे आहे. आपण मोठमोठ्या इमारती पाहतो. पण त्यांच्या डिझाईनशिवाय तो विविध प्रकारचे पूल, बोगदे, स्टेडियम, धरणे, कालवे, वीज वाहक, मनोरे, रस्त्यांचे तारांचे जाळे, समुद्रातील बंदरे इत्यादी अनेक प्रकारच्या कामात मुख्य भूमिका निभावतो.
Leave a Reply