सहकार कायद्यातील नविन बदलानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्याकरिता मुदतवाढ देणेची तरतूद नाही. परंतु, कोव्हीड-१९ च्या पार्श्वभुमीवर कायद्यात केलेल्या बदलाने सर्व गृहनिर्माण संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ डिसेंबर, २०२१ पर्यंत सुट देऊन मोठा दिलासाच दिला आहे. तसेच, काही मार्गदर्शक सुचना देखील केल्या आहेत. तथापि, सदर सुचना सर्वसामान्य सदस्यांना माहित नसल्याने बरेच गोंधळून जातात. कायदे तज्ञाचा सल्ला न घेता, इतर कमेटी सदस्यांचा विचार न करता फक्त स्व:ता कायद्याच्या बडग्यापासून वाचण्यासाठी कमेटी सदस्यत्वाचा राजीनामा देतात. असो..
प्रश्न क्र. ६४) संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दर वर्षी कधी पर्यंत घेणे कायद्याने अपेक्षित आहे?
उत्तर: महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ७५ अन्वये, वित्तीय वर्ष संपल्यानंतर ६ महिन्यांच्या आत (३० सप्टेंबर रोजी किंवा तत्पूर्वी) अधिमंडळाची वार्षिक सभा घेण्याची तरतूद आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्याकरिता मुदतवाढ देणेची तरतूद नाही. मात्र कोव्हीड-१९ च्या महामारीच्या प्रकोपाने वार्षिक सभा घेणे शक्य नसल्याने उक्त कलमात वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या वित्तीय वर्षाच्या समाप्तीपासून बारा महिन्याच्या आत (३१.०३.२०२१) बोलविता येईल अशी सुधारणा कलम ७५ मध्ये करण्यात आली आहे.
प्रश्न क्र. ६५) वार्षिक सर्वसाधारण सभा कोव्हीड-१९ च्या महामारीच्या प्रकोपात संस्थेने प्रत्यक्ष सहभागाने घेणे अपेक्षित आहे का?
उत्तर: राज्यात कोरोना विषाणुमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग व महसुल व वन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनाचे काटेकोर पालन करावे. या मार्गदर्शक सूचनानुसार ५० पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास शासनाचे निर्बंध असल्याने, ५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांनी प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊ शकतील.
प्रश्न क्र. ६६) ५० पेक्षा जास्त सभासद असणाऱ्या संस्थानी त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा कोव्हीड-१९ च्या महामारीच्या प्रकोपात कशी घेणे अपेक्षित आहे?
उत्तर: ५० पेक्षा जास्त सभासद असणाऱ्या संस्थांनी व्हीसी (Video Conferencing) अथवा ओएव्हीएम (Other Audio Visual Means) कार्यप्रणालीचा अवलंब करून त्यांची वार्षिक सर्व साधारण सभा ह्या कोव्हीड-१९ च्या महामारीच्या प्रकोपात कशी घेणे अपेक्षित आहे.
प्रश्न क्र. ६७) संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याआधी सदस्यांना माहिती कशा प्रकारे देता येईल?
उत्तर: संस्थेच्या प्रत्येक सदस्यास वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांक, वेळ व ठिकाण, विषय (Agenda) या बाबतची माहिती किमान पंधरा दिवस अगोदर एसएमएस/मेल/व्हॉटसअप द्वारे कळविण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच इमारतीच्या नोटीस बोर्डवर सुद्धा लावण्यात यावी. ज्या सभासदांचे इमेल पत्ता किंवा मोबाईल क्र. नसेल अशांना सभेची माहिती पोच करण्याची जबाबदारी संस्थेची राहील.
प्रश्न क्र. ६८) वार्षिक सर्वसाधारण सभेचे अभिलेख (Record) तयार करणे गरजेचे आहे का?
उत्तर: होय. संस्थेने वार्षिक सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष सहभाग की व्हीसी / ओएव्हीएम कोणत्याही पद्धतीचा अवलंब केला तरी अभिलेख प्रचलित पद्धतीत जतन करून ठेवण्याची जबाबदारी ही संस्थेची असेल.
– अॅड. विशाल लांजेकर.
Leave a Reply