भारतातील पहिले तेल शुद्धिकरण केंद्र आसाममध्ये सुरु झाले. त्याला आता १०७ वर्षे झाली.मधे काही वर्षे हे तेल शुद्धिकरण केंद्र बंदही पडले होते. पण परत ते सुरु झाले. या तेल शुद्धिकरण केंद्रातील पदार्थ जनतेच्या मागणीएवढे नसत, त्यामुळे या पदार्थांची फार मोठी आयात करावी लागे. शिवाय एकेका काळाची अशा पदार्थांची गरजही वेगवेगळी .असे.१९०० सालाच्या सुमाराला जेव्हा मोटर गाडया जवळ जवळ नव्हत्या तेव्हा पेट्रोल हा टाकाऊ पदार्थ होता आणि केरोसिनला मोठी मागणी होती कारण ते कंदीलासाठी लागे.
पुढे मोटार गाडया आल्यावर पेट्रोलची मागणी वाढली आणि आता त्याबरोबर पण बऱ्याचशा कमी प्रमाणात अशी विमानाच्या इंधनाची गरजही वाढली. लोक घरगुती जळणासाठी एलपीजी गॅस वापरु लागल्यावर तुलनेने केरोसिनची गरज कमी झाली. मुंबईत प्रथम मोबिल ऑईल कंपनी सुरु झाली. पुढे त्याचे नाव एस्सो आणि नंतर हिंदुस्थान पेट्रोलियम असे झाले, तर प्रथम बर्मा शेल नाव असलेली कंपनी आता भारत पेट्रोलियम म्हणून ओळखली जाते.
ही तेल शुद्धिकरण केंद्रे १९५५-५६ सुमाराची. त्याचवेळी सालाच्या कॅलटेक्स नावाच्या कंपनीचे तेल शुद्धिकरण केंद्र मुंबई आणि विजगापट्टणला सुरु झाले होते. मात्र या सर्व परदेशी कंपन्या होत्या आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ही पहिली भारतीय कंपनी आणि तिची तेल शुद्धिकरण केंद्रे 1964 पासून सुरु झाली. हळुहळू ही केंद्रे बरौनी, कोयाली, पानिपत, दिग्बोई, मथुरा अशा एकूण १० ठिकाणी झाली. एस्सो आणि बर्मा शेलचे राष्ट्रीयीकरण १९७५ साली झाले.
तेल शुद्धिकरण कारखान्याची म्हणून जी अभियांत्रिकी होती त्यात आपले अभियंते तरबेज झाले ते एवढे की मध्य पूर्वेतील देशात जाऊन आपल्या अभियंत्यांनी अनेक केंद्रे बांधून सुरु करुन दिली. नंतर आली पेट्रोरसायनांची शुद्धिकरण केंद्रे. त्यात युनियन कार्बाइड, नोसिल, हर्डेलिया केमिकल्स, पिल, कॅलिको, आयपीसीएल या कंपन्या १९६७ ते ७० सालाच्या सुमारास सुरु झाल्या. पुढे रिलायन्स कंपनीची केंद्रे हाजिरा, पाताळगंगा येथे सुरु झाली.
अ.पां. देशपांडे, (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply