|| हरी ॐ ||
मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी जो आपण सामान्य मानव किंवा पशु, पक्षी, प्राणी सहन करू शकत नाहीत त्याला ध्वनी प्रदूषण म्हंटले आहे. दुसऱ्या परिभाषेत सांगायचे झाल्यास ज्यामुळे मनुष्याचे जीवन किंवा पशु, पक्षी आणि प्राणी जीवनाच्या कृती विसकळीत होतात किंवा त्यांचा समतोल बिघडतो. प्रत्येक आवाजाचा डेसिबल (उच्च/निच्च पातळी व मर्यादा) ठरवून दिलेल्या आहेत आणि त्यापेक्षा जास्त आवाज झाल्यास त्याचे प्रदूषणात रुपांतर होते. जगभरात मानवी परिसरातील बहुतेक ध्वनी हा बांधकाम आणि वाहतूक उदा. मोटारी, विमाने, रेल्वे इत्यादींचा आवाज यांच्यामुळे निर्माण होत असतो. शहरी नियोजनात त्रुटी आणि असबंधता असल्यास ध्वनी प्रदूषणात वाढ होते. तसेच औद्योगिक क्षेत्रे आणि निवासाची ठिकाणे एकमेकांना लागून असल्यास निवासी भागात ध्वनी प्रदूषण जाणवते. सततच्या अनावश्यक आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होतं. त्याचे दुष्परिणाम सजीवांसह निजीर्व वस्तूंवरही होतात. मोठ्या आवाजाला सतत सामोरं गेल्यामुळे मानसिक तसंच शारीरिक ताण जाणवतो. नंतर बहिरेपणाही येऊ शकतो.
ऊन, पाऊस, धूळ तसेच ध्वनी प्रदुषणाचे आरोग्यावर होणारे अपायकारक परीणाम आता वाहतूक शाखेतील पोलिसांना भोगावे लागल्याने त्यांना कमी आवाजातील बोलणे ऐकू येईनासे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वाहतुकीचे नियमन करताना सतत कानांवर आदळणाऱ्या वाहने आणि त्यांच्या हॉर्नच्या आवाजामुळे त्याला श्रवणदोष जडल्याचे आढळून आले आहे. ४३ टक्के पोलिसांना अवघ्या विशीत कर्ण रोग असल्याचे नंतर आरोग्य तपासणीत निष्पन्न झाल्याचा आरोग्य तज्ञांचा अहवाल सांगतो. वयोमानानुसार कर्णदोष उद्भवतो असा समज असला तरी चक्क पंचवीस वर्षे वयापासूनच्या कर्मचाऱ्यांमध्येही कर्णदोषाची लक्षणं आढळू लागली आहेत. २५ ते ३५ वर्षे वयोगटातील तब्बल ५२ कर्मचाऱ्यांमध्ये कर्णदोषणाची लक्षणं आढळल्याने वरिष्ठ अधिकारीदेखील चक्रावले आहेत. तपासणीनंतर डॉक्टरांनी कर्णदोषाची लक्षणं आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर उपचारही केले. दरम्यान, पोलिसांच्या आरोग्यावर ध्वनी प्रदुषणाचे दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी वाहतूक शाखा ठोस उपाययोजना करण्याच्या विचारात आहे. रस्त्यावरील गोंगाटाचे प्रमाण कमी करणारी एखादी अत्याधुनिक यंत्रणा या पोलिसांना उपलब्ध करुन देता येर्ईल का याची चाचपणी सध्या सुरू आहे. भ्रष्टाचार न होता तसेच काळ आणि वेळेचे भान ठेऊन अशी यंत्रणा लौकरात लौकर वाहतूक शाखेतील पोलिसांना उपलब्ध होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना..! नाहीतर अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांसारखी स्थिती व्हायची..!
विनाकारण हॉर्न वाजवण्यापासून रोखा, पालकांसोबत प्रवास करताना ते विनाकारण हॉर्न वाजवत असतील, तर त्याचा इतरांना किती त्रास होतो याची जाणीव करुन द्या, असे आवाहन वाहतूक पोलिस विविध शाळा कॉलेजांमध्ये करतांना दिसतात पण त्याचा योग्यतो परिणाम होताना तरुणाई आणि नागरिकांच्या कृतीतून दिसत नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. बऱ्याच मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे कार्यक्रम पोलीस आणि एनजीओज राबवतात पण ते थोडे दिवस लक्षात ठेवले जातात आणि मग ‘येरे माझ्या मागल्या’ ‘उपड्या घागरीवर पाणी’ आणि ‘नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे’ असे होऊन जाते.
बऱ्याच शहर आणि गावात वाहन चालक कळत-नकळत वाहतुकीचे नियम तोडतांना दिसतात. काही तरुण जीवघेण्या स्पीडने गजबजलेल्या रत्यातून मोटरबाईक चालवताना दिसतात आणि त्यांचा आवाज सुद्धा कर्णकर्कश्य असतो. वाहतूक कायद्याच्या नियमात यावर काही बंधने नाहीत का? अश्या रेसमध्ये धावणाऱ्या मोटरबाईकना गजबजलेल्या रस्त्यावरून चालविण्यासाठी का परवाने देण्यात येतात? एकंदरीतच आज सर्व शहर आणि गावात माणसांपेक्षा दोन आणि चारचाकी वाहने जास्त झाली आहेत की काय असे वाटते. शहर आणि गावातील नागरिक सार्वजनिक वाहनांचा उपयोग कमी करतांना दिसतात असे म्हणावे का? प्रत्येकाचे वाहन असणे हा एक स्टेट्स सिम्बॉल झाला आहे? का गाड्या घेण्यासाठी लोन पटकन आणि स्वत मिळते म्हणून वारेमाप दोन आणि चारचाकी वाहनांची खरेदी केली जाते? याला काही अंशी वाढणारी लोकसंख्या आणि सरकारच्या परदेशातील वाहन निर्मिती उद्योगांना प्रचंड प्रमाणत देण्यात येणाऱ्या सवलती, करात देण्यात येणारी सुटी आणि आपल्या देशात वाहन उद्याग सुरु करण्यास देण्यात येणारे परवाने जबाबदार आहेत असे वाटते?
ध्वनी प्रदूषण हा जागतिक पातळीवरचा प्रश्न असून तो गंभीर बनत चालला आहे. सर्वच प्रकारची गर्दी असणाऱ्या मोठ्या महानगरांमध्ये या प्रश्नाची तीव्रता अधिक जाणवते. सतत मोठा आवाज कानावर आदळत असेल तर माणसाला बहिरेपणा किंवा बधीरपणा येतो. ध्वनी प्रदूषणामुळे हृदयरोग, ब्लडप्रेशर, अल्सर, कोलेस्टेरॉल, श्वसन आणि पचनाचे विकारही जडतात. दररोजच्या ध्वनी प्रदूषणामुळे तणाव, मानसिक विकार आणि सृजनशीलता कमी होण्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. या प्रदूषणामुळे चेतासंस्थेवर परिणाम होतो. सततच्या ध्वनी प्रदूषणामुळे इमारती आणि पुलांसारख्या निजिर्व गोष्टींचंही आयुष्य कमी होतं.
महानगरांमध्ये झाडांची संख्या वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. कारण ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी झाडं फायदेशीर ठरतात. आवाज करणारे फटाके फोडू नयेत. ‘डिपार्टमेण्ट ऑफ एक्सप्लोझिव्ह’ने प्रमाणित केलेले फटाकेच उडवावेत.
वरील सर्व गोष्टी मन सुन्न करणाऱ्या असून यावर तातडीने काहीतरी ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. असे का होते? काय आपण आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष देत नाही? कर्णरोग सध्या वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांच्यात दिसत आहेत. पण यावर काही ठोस उपाय आणि सामाजिक जाणीव आणि बांधिलकी समाजाने लक्षात घेतली नाही तर पुढे जाऊन सर्व नागरिकांना ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात गोवले जाईल आणि मग वेळ गेलेली असेल. का अजून अशी काही करणे आहेत ज्यामुळे तरुणाईत अश्या त्रुटी दिसावयास लागतात? कदाचित सतत मोबाईल कानाला लाऊन बोलणे किंवा त्यामधील गाणी ऐकण्याने असे कर्ण दोष होण्याची संभाव्यता जास्त असते असे तज्ञ सांगतात. कारणे बरीच असतील पण महानगरातील नागरिकांपुढील प्रश्न गंभीर आहेत. मग आता आपण सर्व आत्मपरीक्षण करून ध्वनी प्रदूषण थांबविण्यासाठी स्वेच्छेनं प्रयास करणार ना? तशी इच्छाशक्ती आपल्यात आहे पण ती कृतीत आणणे म्हत्वाचे आहे. कळत पण वळत नाही म्हणतात ते हेच का?
— जगदीश पटवर्धन
जगदीशजी,
ध्वनीप्रदुषणाबद्दलचा हा माहितीपूर्ण लेख आवडला…
याच संदर्भात मला स्वत:ला भेडसावणाऱ्या ध्वनी समस्येकडे लक्ष वेधु इच्छितो…
मी पश्चिम रेल्वेचा नियमित प्रवासी आहे. सध्या मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वेच्या फलाटांवरील संगणकीकृत उद्घोषणांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे.येणारी लोकल कोणती हे सांगुन झाले की लगेच “कृपया रेल्वे रुळ ओलांडुन जाऊ नये..एका प्लॅटफॉर्म वरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याकरता पुल किंवा सबवेचा वापर करा” ही उद्घोषणा ऐकवली जाते. हेच हिंदीत व इंग्रजीतही. सततच्या या उद्घोषणांनी अक्षरश: वात आणला आहे. गाडीची १० मिनिटे वाट पहायची असेल तरी किमान ३०-४० वेळा हे ऐकावे लागते.रेल्वे रुळ ओलांडणे हा गुन्हा असताना या गुन्हेगार प्रवाशांना पकडून दंड करण्याऐवजी विनंत्या केल्या जात आहेत. उलट जे लाखो लोक पुल व सबवे वापरतात त्यांचा मात्र आवाजाचा भडीमार करून छ्ळ केला जातोय. पुल आणि सबवे हे कशासाठी बांधले आहेत हे सतत सांगायला प्रवासी कुक्कुली बाळं आहेत का? रेल्वेचे कोणीतरी अतिशहाणे अधिकारी वातानुकुलित कक्षात बसुन असले फतवे काढतात. यांना वाटते की सतत अशा उद्घोषणा केल्या की प्रवाशांचे प्रबोधन होईल आणि रेल्वेने आपली जबाबदारी पार पाडली असेही सांगायाला हे मोकळे. पण तसे काहीही होत नसते. लातों के भूत बातोंसे नही मानते. रेल्वे रुळ ओलांडणारे रोजच्या रोज न चुकता रूळ ओलांडतातच. यांना शिक्षाच व्हायला हव्या. दुसरे असे की ध्वनीमुद्रित उद्घोषणा असल्याने फक्त बटणे दाबून काम होते. प्रत्यक्ष उद्घोषकाला घसाफोड करावी लागत नसल्याने ध्वनीक्षेपक अखंड वाजवत ठेवले जातात, तेही उच्च पातळीच्या आवाजात.
याच बरोबर प. रेलवेवर अपंगांच्या डब्याजवळ लावलेले कर्कश्य बीपर्स सर्वांनाच खुप त्रासदायक झाले आहेत. अंधबांधव घरापासून स्थानकापर्यंत येताना असंख्य अडथळे पार करुन येतात. त्यांना अपंगांचा डबा शोधणे अवघड नाही.स्थानकात आल्यावर जिना शोधण्यासाठी त्यांना कोणतीही मदत नसते.स्टेशनातील बाके, कचरा कुंड्या, उंचवटे, भटके कुत्रे, खड्डे यांना चुकवत ते चालतात. मग फक्त डबा शोधून देण्याचा आव कशाला?
फलाटावर काम करणाऱ्या (स्टॉल,बुटपॉलिशवाले इ) लोकांच्या कानांचे या बीपर मुळे किती नुकसान होत असेल याचा विचार रेल्वेने केलाय? या लोकांना म्हणे आवाजाची सवय होते. पण या तीव्र आवाजाच्या लहरी कानांवर आदळत राहुन नुकसान करायचे ते करणारच. गाड्या बंद झाल्यावरही हे बीपर सुरु असतात. किमान रात्री तरी बंद ठेवा. पण तेही नाही.
मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मात्र उद्घोषणा ह्या खूप सुसह्य असतात.तेथील ध्वनिक्षेपकही चांगल्या दर्जाचे आहेत. पण प.रे. वर “सतत अनावश्यक” तसेच अकारण लांबलचक उद्घोषणा सुरू असतात. तसेच प.रे. वरील ध्वनीक्षेपक जुन्या पद्धतीचे असल्याने उद्घोषणा कर्कश्य होतात. प.रे. ने मध्य रेल्वे प्रमाणे अनावश्यक उद्घोषणा टाळुन फक्त गाड्यांबद्दलच उद्घोषणा कराव्यात तसेच ध्वनीक्षेपकांच्या आवाजाची पातळी कमी ठेवावी ज्यामुळे स्थानकांवर शांतता लाभू शकेल.
पण हे समजून घेईल ती पश्चिम रेल्वे कसली?
-मंदार