गुरु आणि सदगुरु यातील भेद न समजल्यामुळे परमार्थात अनेक चांगले साधक वाया जातात असे दिसून येते .
विद्यागुरु , कलागुरु , मंत्रगुरु आणि मोक्षगुरु असे गुरुंचे स्थुलमनाने चार प्रकार आहेत . विद्या आणि कला शिकविणारे विद्यागुरु आणि कलागुरु होत .
या सर्व विद्या आणि कला पोट भरण्यासाठी किंवा करमणुकीसाठी असतात . विद्या अनेक कला अनेक असल्यामुळे प्रत्येक विद्येत आणि प्रत्येक कलेत गुरु वेगवेगळा असतो . परिणामी अनेक विद्या आणि अनेक कला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक गुरु करणे अपरिहार्य असते.
परमार्थाच्या प्रांतात मंत्रगुरु आणि मोक्षगुरु असे प्रकार आहेत . मंत्रगुरु त्यांनाच म्हणतात जे शिष्यांना किंवा साधकांना मंत्र देतात किंवा नाम देतात आणि काही कर्मकांडात्मक गोष्टी करण्यास शिकवितात . उदाहरणार्थ – भजन-पुजन , यज्ञ-याग, जप-जाप्य , तीर्थयात्रा , व्रतवैकल्ये , उपास-तापास व ग्रंथ पोथ्यांची पारायणे करणे हे होत .
विशिष्ट मर्यादेपर्यंत हे मंत्रगुरु परमार्थाला पोषक ठरतात , हे खरे , परंतु त्या विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे हे मंत्रगुरु मुळीच उपयोगी पडत नाहीत ; इतकेच नव्हे तर परमार्थाचा पुढील मार्ग अशा मंत्रगुरुंच्या शिष्यांना किंवा साधकांना जवळ जवळ बंदच होतो .
मंत्रगुरुंना चिकटून राहून मोक्षगुरुकडे न जाणारे साधक शेवटपर्यत अज्ञानी व अडाणी राहून स्वतःचे अपरिमीत नुकसान करुन घेतात . हा ब्रम्हघोटाळा होण्यास एकच कारण आहे व ते म्हणजे प्रचंड प्रमाणात समाजात असलेली अंधश्रध्दा हे होय .
” गुरु केल्याशिवाय गती नाही म्हणून कोणाला तरी गुरु करुन मोकळे व्हावयाचे व एकदा तो गुरु केल्यानंतर त्याला सोडून दुसरा गुरु करणे म्हणजे महापाप ” अशी परमार्थात पडलेल्या अनेक साधकांनी स्वतःची प्रामाणिक समजूत करुन घेतलेली असते . किंबहुना अशा तऱ्हेची अंधश्रध्दा साधकांच्या ठिकाणी निर्माण करण्यात व तशी ती दृढ करण्यात तथाकथित गुरुजनांचाच सिंहाचा वाटा असतो .
या मंत्रगुरुंनाच मोक्षगुरु कल्पून त्यांनाच शेवटपर्यंत चिकटून राहणारे एकनिष्ठ साधक समाजात बहुसंख्येने आढळून येतात .
वास्तविक , सदगुरुंकडून मिळवायचे असते ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान होय . या संदर्भात ज्ञानेश्वर महाराजांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे . ते सांगतात –
१) गुरु तेथे ज्ञान ।ज्ञानी आत्मदर्शन ।।
दर्शनी समाधान ।आथी जैसे ।।
२) जयासी मोक्ष व्हावा । तेणे सदगुरु सेवावा ।।
म्हणून समाधान व आत्मज्ञान मिळविण्यासाठी मोक्षगुरुकडे जाणे अत्यंत आवश्यक आहे .
वास्तविक , मंत्रगुरु व मोक्षगुरु यातील फरक लोकांना समजणे आवश्यक आहे . मंत्रगुरुलाच मोक्षगुरु समजून चिकटून राहणे म्हणजे अडाणीपणाचे व निर्बुध्दतेचे लक्षण होय .
आपण ज्यांना सदगुरु मानतो ते जर मंत्रगुरु असतील तर अशा मंत्रगुरुंना सोडून मोक्षगुरुकडे जाण्यात पाप तर नाहीच पण महापुण्य मात्र निश्चित आहे . या सत्याची जाणीव त्यांनाच होऊ शकते , ज्यांच्या जवळ बुध्दिची प्रगल्भता असून आत्मज्ञानाची ज्यांना तहान लागलेली आहे .
याच्या उलट खोट्या पाप-पुण्याच्या कल्पनांच्या आहारी गेलेल्यांना व अंधश्रध्देला बळी पडलेल्या साधकांना मंत्रगुरुचे जन्मभर दासानुदास होऊन राहण्यापलीकडे पर्याय उरत नाही .
वास्तविक, गुरु म्हणजे सदगुरु करावयाचा असतो , तो शोभेसाठी नसून सदगती प्राप्त करुन घेण्यासाठीच व ही सदगती प्राप्त होते आत्मज्ञान प्राप्त झाल्यानेच . परंतु प्रत्यक्षात मात्र लोक गुरु करतात ते केवळ एक विधी म्हणून व अंधश्रध्देच्या आहारी जाऊन .अशा गुरुचे साधक , संप्रदायाच्या नांवाखाली स्वतःला कर्मकांडात गुंतवून घेऊन कर्मठ किंवा मठ्ठ होऊन , मरेपर्यंत नर्मदेतले गोटे होऊन राहण्यात धन्यता मानतात , ही मोठी खेदाची गोष्ट आहे .
वास्तविक, आपला व आपल्या कुळाचा उध्दार करुन घेण्यासाठीच मोक्षगुरुकडे जाऊन आत्मसाक्षात्काराचा मार्ग संपादन करणे अत्यंत आवश्यक असते .
थोडक्यात , गुरुसाठी गुरु करावयाचा नसून आत्मसाक्षात्काराचे महाभाग्य प्राप्त करुन घेऊन जन्माचे सार्थक करण्यासाठी गुरु म्हणजे सदगुरु करावयाचा असतो , याचे भान साधकांना असणे आवश्यक आहे .
या संदर्भात खऱ्या सदगुरुंचे मार्गदर्शन फार वेगळे असते , हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे . ” शहाणपण ” हे अमृत देऊन प्रपंच नेटका कसा करावयाचा हे सदगुरु शिकवितात , त्याचप्रमाणे दिव्य स्वरुपाच्या विस्मृतीरुप गाढ झोपेतून हलवून हलवून जागे करुन सतसाधकांना ते आत्मज्ञानाचा प्रसाद देतात .
जे खरे सदगुरु असतात त्यांचे कार्य फार मोठे असते . ते साधकांना नाममंत्र तर देतातच पण कर्मकांडाच्या जंजाळात न अडकविता त्यांना साधनेची विविध अंगे टप्प्याटप्प्याने शिकवित शिकवित आत्मसाक्षात्कारापर्यंतचा मार्ग दाखवितात .
समाजात निरनिराळ्या थरावरचे (Levels) साधक असतात . प्रत्येकाची कुवत , बुध्दी , ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती व क्षमता वेगवेगळी असते . या सर्वांना त्यांच्या त्यांच्या कुवती प्रमाणे योग्य ती साधना शिकवून , हे सदगुरु साधकांचा उध्दार करतात . त्याचप्रमाणे सदगुरुंवर मनापासून प्रेम करणारे एकनिष्ठ , प्रामाणिक व नम्र असे जे अधिकारी साधक असतात त्यांना दिव्य बोध व दिव्य साधना शिकवून ” आपणा सारिखे करितो तात्काळ ” असा साक्षात्काराचा सोपान दाखवितात .
जे खरे सदगुरु असतात ते या भूलोकावरचे चालते बोलते देव होत . म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात –
ते चालते ज्ञानाचे बिंब । अवयव ते सुखाचे कोंब ।।
येर माणूसपण भांब । लौकिक भागु ।।
थोडक्यात , अशा मोक्षगुरुंना – सदगुरुंना शरण जाऊन त्यांच्याकडून आत्मज्ञानाचा मार्ग शिकून घेऊन स्वतःचे शाश्वत कल्याण साधण्यातच साधकांचे खरे हित असते , याची जाणीव साधकांना होणे आवश्यक आहे
या संदर्भात एकनाथ महाराजांचे व ज्ञानेश्वर महाराजांचे खालील वचन बोधप्रद आहे –
सदगुरुविण ब्रम्हज्ञान । सर्वथा नव्हे नव्हे जाण ।
हे उपनिषदर्थे प्रमाण । परम निर्वाण सांगितले ।।
— सदगुरु श्री वामनराव पै
माहिती उत्तम पण मोक्ष गुरू किंवा सद्गुरू करावेत हा विचार अमान्य.ते आपणहून सत्शिष्याच्या शोधात असतात त्यामुळे तेथे फसगत होण्याचा प्रश्र्नच नाही.