इमारतीची निर्मितीप्रक्रिया आर्किटेक्टने आराखडा बनवण्याने सुरू होते. तेव्हा त्यांनी इमारतीवर विशेष लक्ष द्यायला हवे. जसे इमारतीचा आकार साधा हवा. उगाच कुठले तरी कलात्मक संदर्भ देत तो वेडावाकडा करू नये. उभा किंवा आडवा आकार खूप निमुळता करू नये. इमारतीला खूप कोपरे नसावेत. लांब लांब बाल्कन्या नसाव्यात. इमारतीच्या बाह्य सुशोभीकरणासाठी जास्तीचा भार टाकू नये. अनेक वेळा असे सुटे वजन कोसळून जीवित हानी झाल्याचे निदर्शनास आले आहे. जेव्हढे हलके अतिरिक्त वजन तेव्हढे चांगले. तसेच अंतर्गत सजावटी दरम्यान खांबाना नुकसान करू नये.
स्थापत्य अभियंत्याने आराखडा बनवताना इमारतीवरील सर्व भाराचा विचार करून, भूकंपाचा अतिरिक्त भार ध्यानात ठेऊन आराखडा बनवावा. खांबाना आवश्यक तेव्हढा आकार द्यावा. सर्व खांबांवर इमारतीवरील वजन समप्रमाणात वाटण्याचा प्रयत्न करावा. फ्लोटिंग खांब टाळावेत. हे आराखडे मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही फार मोठी जबाबदारी आहे. त्या आराखड्यातील एफ एस आय, मोकळ्या जागा वगैरे नियमांना अधिक महत्व देण्यापेक्षा आर्किटेक्ट व स्थापत्य अभियंत्याच्या आराखड्यांना जास्त महत्व द्यावे. हे आराखडे तज्ज्ञांकडून नीट तपासून घ्यावेत. बांधकामादरम्यान दिलेले आराखडे तंतोतंत पाळले गेले पाहिजेत. बांधकामांचे साहित्य चांगल्या दर्जाचे घ्यावे. आणि काटेकोरपणे साहित्याचा तसेच कारागिरीचा उत्तम दर्जा पाळावा. असे सगळे करून बांधलेली इमारत रहिवाशांच्या हाती दिली जाते तेव्हा सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांच्या शिरावर येते, ती म्हणजे इमारत उत्तमपणे सांभाळणे. त्यांनी अनधिकृतपणे कुठलेही बदल करू नयेत. खांबाना तुळयांना हानी पोचवू नये. अंतर्गत सजावटीसाठी खांब काढू नयेत. इमारतीवर अतिरिक्त भार टाकू नये, जसे अंतर्गत पाण्याच्या टाक्या वाढवणे, पोटमाळे टाकणे इ. ठराविक काळाने स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे. कुठलाही बदल करताना तज्ज्ञ स्थापत्य अभियंत्याचा सल्ला घ्यावा.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा या नियमाने आधीच्या भूकंपातून बोध घेऊन, झालेल्या चुका दुरूस्त करून बांधकाम नियमावलीत योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. गुजरात सरकारने याची अंमलबजावणी केली आहे.
Leave a Reply