आज भारत देश स्वतंत्र होऊन ६७ वर्ष झाली. देश विज्ञान-तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करीत आहे. भारतीय शास्त्रज्ञ चंद्र आणि मंगळावर यान उतरविण्याच्या तयारीत आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानात वेगवेगळे शोध लावण्याच्या प्रयत्नात आहेत. भारत महासत्ता होण्याच्या प्रयत्नात असतांना भारतातील काही नागरिकांच्या मनातून जुने, बुरसटलेले विचार आणि अंधश्रद्धा काहीकेल्या जाता जात नाहीत. काहींना असे वाटते मुलगी म्हणजे डोक्याला विनाकारण ताप. तिची अब्रू म्हणजे काचेचे भांडे वगैरे समजुतींमुळे मुलीच्या जन्मा आधीच तिचा गळा घोटला जातो. कुटुंबात एखादी मुलगी जन्माला आली तर काही कुटुंबीय सुतकी चेहेरे करून किंवा स्त्रीकडून काहीतरी मोठा गुन्हा, अपराध घडल्यासारखे जीवन जगताना त्यांच्या कृतीतून व्यक्त होत असते. असे का?
एखाद्या कुटुंबामध्ये स्त्रीला मुलगा झाला म्हणजे कुलदीपक जन्माला आला असे म्हंटले जाते. सगळ्यांना पेढे वाटले जातात. पण मुलगी जन्माला आली की एखाद्या अपराध्यासारखे वाटते ते इतरांचे धन संबोधले जाते..! एक गोष्ट मात्र आपण विसरत असतो की आपली आई सुद्धा कोणाचीतरी मुलगीच होती ना? आईने जे कष्ट घेऊन नऊमहिने नऊ दिवस आपल्या उदरात त्याला/तिला आपला श्वास, आपले रक्त, आपले विचार, चांगले संस्कार आणि मुख्य म्हणजे पालन पोषण केले त्याच्या/तिच्या लाथा खाल्या याचे कोणाला काही वाटतं नाही. पण एखाद्या स्त्रीने मुलीला जन्म दिला की तिचीच चूक, ती वाईट, तिला घालून-पाडून बोलणे, टोमणे मारणे, छळ करणे, तिला तिच्या मुलीसकट जाळून टाकणे असे कित्येक प्रकार अजून आपल्या समाजात बघण्यास/ऐकण्यास मिळतात. असे का? कोठे घेऊन जाणार आहोत आपला देश?
आपल्या श्रद्धावान डॉक्टरांनी दैनिक प्रत्यक्षच्या ‘देहाग्राम’ मधून आपल्या विविध रोगांबद्दल, औषधांनबदल आणि त्यावरील उपचारांबद्दल लेख लिहून आपल्या उत्तम मार्गदर्शन करत आहेत. मनात असणाऱ्या शंका-कुशंकांचे निरसन करीत आहेत. तसेच त्या त्या शाखेतील उदा. आयुर्वेद, होमिओपॅथी, अलोपॅथिक आणि नेचोरोपथी तज्ञ डॉक्टरांनी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनातील समज-गैरसमज, अंधश्रद्धा नाहीश्या करण्यासाठी आपल्या लेखात रोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन त्या दूर करण्याचे प्रयास करीत आहेत. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद..!
दैनिक प्रत्यक्षच्या, ५ मे, २०१५ अंकातील देहाग्राम सदरात डॉ.शिरीष दातार यांचा हार्मोन्स, अंतस्त्रावी ग्रंथी हा लेख वाचण्यात आला आणि लेखाचा शेवटचा परिच्छेद डॉक्टर साहेबांच्या शब्दात जसाचा जसा देत आहे म्हणजे आपल्याला पटेल की दांपत्याला मुलगा/मुलगी होणे कोणाच्या हातात आहे आणि त्याला कोण जबाबदार आहे. “गर्भाचे लिंग कशावरून निश्चित होते याची माहिती आपण पूर्वी पाहिली आहे. तरी थोडी उजळणी करू या. x या रंगसुत्राला स्त्रीलिंगदर्शक रंगसूत्र (female sex chromosome) असे म्हणतात. तर y या रंगसुत्राला पुरुषलिंगदर्शक रंगसुत्र (male sex chromosome) असे म्हणतात. स्त्रियांच्या शरीरपेशींमधील लिंगदर्शक रंगसुत्रांची जोडी (पेअर) x-x अशी असते. म्हणूनच प्रत्येक परिपक्व डिंबामध्ये एक रंगसुत्र हे x असते. पुरुषांच्या शरीरपेशींमधील लिंगदर्शक रंगसुत्रांची जोडी ही x-y अशी असते. त्यामुळे एकूण शुक्रजंतूंपैकी अर्ध्याअधिक शुक्रजंतूमध्ये x हे रंगसूत्र असते तर अर्ध्याअधिक शुक्रजंतूंमध्ये y हे रंगसूत्र असते. म्हणून डिंबाशी एकरूप होणाऱ्या शुक्रजंतूंमध्ये कोणते रंगसूत्र आहेत यावर जन्मणाऱ्या बाळाचे लिंग निश्चित होते. x हे रंगसूत्र असणारा शुक्रजंतू डिंबाशी एकरूप झाल्यास नव्या पेशीमध्ये x-x ही रंगसुत्रांची जोडी तयार होते व मुलगी जन्माला येते. y हे रंगसूत्र असणारा शुक्रजंतू डिंबाशी एकरूप झाल्यास नव्या पेशीमध्ये x-y ही रंगसुत्राची जोडी तयार होते व मुलगा जन्माला येतो. यावरून हे स्पष्ट होते की मुलगी किंवा मुलगा जन्माला येणं हे स्त्रीवर नव्हे तर सर्वार्थाने पुरुषावर अवलंबून असते”. कारण आजसुद्धा भारतातील शहर आणि गावखेड्यातील कित्येक कुटुंबात अजूनही मुलगा की मुलगी होण्यावरून स्त्रीलाच दोषी आणि जबाबदार धरण्यात येते. पण काही अंधश्रद्ध माणसांच्या मनातील सैतानाला डॉक्टर शिरीष दातार साहेबांच्या लेखाने चांगलीच चपराक बसली असेल.
स्त्रीला मुलगी झाली म्हणजे त्याला तीच जबाबदार आहे ही मनाची भ्रामक कल्पना सोडून वास्तव स्वीकारण्याची मनाची तयारी ठेवावी. तसेच मुलगी किंवा मुलगा याचे स्वागत करून त्यांना भविष्यात समान ज्ञाय द्यावा व आपल्या देशाचे आधारस्तंब बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करावे.
‘मुलगा की मुलगी’ या समाजातील अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजुतींचे पुनर्मुल्यांकन आणि मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल पुन्हा एकदा डॉ. शिरीष दातार यांचे आभार आणि धन्यवाद श्रीराम, अम्बज्ञ.
जगदीश पटवर्धन