भगवान श्रीकृष्णांना पूर्णावतार म्हटले जाते. बालपणापासूनच त्यांच्या विविध लीलांचे वर्णन वाचायला मिळते. या लीलांमधील एक म्हणजे ‘पुतना वध’. कंसाने पाठवलेल्या पुतना नामक राक्षसिणीचा बालकृष्णाने वध केला अशी ही रोचक कथा. मात्र ही कथा एखाद्या सत्यस्थितीचा विपर्यास तर नाही ना अशी शंका आयुर्वेद अभ्यासताना येते.
आयुर्वेदात लहान मुलांना होणारे व्याधी वर्णन करण्यात आले आहेत. या व्याधींना ‘बालग्रह’ असे म्हणतात. या बालग्रहांतील एकाचे नाव आहे ‘पूतना’!!
इतकेच नव्हे तर याव्यतिरिक्त शीतपूतना आणि अंधपूतना असे अन्य दोन प्रकारही सुश्रुतसंहितेत आढळतात. बालग्रहांच्या उपचारांत औषधींचासहच काही विधी आयुर्वेद सुचवतो. यातील एका विधीत नदीकिनाऱ्यावर या शीतपुतनेची पूजा करून नैवेद्य दाखवावा असेही वर्णन आहे. अन्यत्र एका ठिकाणी या देवीची प्रतिमा तयार करून त्या बालकामार्फत पूजा केली जावी असेही वर्णन आढळते. भागवतात असेही वर्णन आहे की; बालकृष्णाला पूतनेपासून उपद्रव होवू नये यासाठी गोपिकांनी अंगन्यास- करन्यास करून प्रार्थना केल्या आणि कृष्णाला गोमूत्रमिश्रित जलाने स्नान घातले. बालग्रहाने पीडित बालकाला औषधी स्नान घालण्याचा उल्लेख सुश्रुत संहितेतदेखील मिळतो.
हे वाचल्यावर स्वाभाविकपणे हा प्रश्न आपल्या मनात येतो की श्रीकृष्णकथेत वर्णन केलेली ही पूतना खरंच कोणी राक्षसी होती की पूतना ग्रहाच्या वर्णनाचा विपर्यास होत ही दंतकथा तयार झाली?! दंतकथा तयार होण्यास फार काळ लागत नसतो. जिथे स्वामी विवेकानंद वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांसंबंधी दंतकथा निर्माण होतात तिथे प्रत्यक्ष भगवंतांचीही काय कथा?! मात्र एका परीने आयुर्वेद हा भारतीय मनात किती रुजला आहे याची ही साक्षच नव्हे का?!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Aug 25, 2016
Leave a Reply