नवीन लेखन...

कोणाच्यो म्हशी?

चांगदेव आणि कुटूमातली सगळीजणा म्हशीक  हाकीत हूती तरी म्हस जाग्यावरना हलत नाय हूती. चांगदेवान जावन बेडरूमातना भायर पडणारा दार उघडल्यान आणि म्हशीक हाकूक लागलो तरी म्हस जावक मागना. लय येळ प्रयत्न करून पण म्हस जागची हलना. अकेरेक चांगदेवान गाव गोळा केल्यान. संत्याकडे निरोप धाडल्यानी.संत्याची लाली म्हस मारकुटी हूती ती उभ्या गावाक म्हायती. म्हस बेडरूमात गेली कशी हेच्यावर चर्चा रंगली.

‘संतू गोवेकाराची लाली म्हस गायब झाली’ ही बातमी सगळ्या गावात पसारली. बरा दुभती म्हस अशी धापू झाली म्हटल्यावर संत्याचो जीव खालीवर झालो. म्हस धापू होवन रात उलटान गेली हूती तरी खयसर माग लागलो नाय हूतो. संत्यान वाडीतल्या चार पाच जणांका घेवन रातीच सोदूक निघालो हूतो. पोरांका संत्याची भगल करूची हूकी इली.

‘संत्या लालीचा खय भायर लफडा नाय मा.’

‘सतल्या तुका नंतर बघतंय. आदी म्हस गावांदे.’ संतो सतल्यावर तरपासलो.

‘अरे म्हसकरांचो वयात इलेलो रेडो तुझ्या कावनाकडे चार पाच येळा कारावताना बघलंय म्हणान इचारलंय.’

’गप सोदूक येतस तर चल. नुको ती आराळा फराळा लाव नूको.’ संतो एका झाळीत ब्याटरी मारीत म्हणालो.

‘मी काय म्हणतंय संत्या, सतलो म्हणता हा तर एकदा म्हसकरांच्या कावनात बघून तरी येवया.’ लाली म्हस सोदूक इलेल्या डिगल्यान संत्याक इनवल्यान.

‘इटंबना हा तुमच्यापुढे. न्हान पोरासारे करतास,’ संतो म्हणालो.

‘आणि थयसर लाली म्हस गावली तर कितीची पैज?’

‘बाबांनू पैजी लावक माका आता घोपान नाया.. चला.’

सगळेजण म्हसकरांच्या कावनात बघूक गेले. लाली थयसर नाय हूती.

‘गेली खय आसात लाली?’ बरा तिच्यावांगडा माझो कसलो वाद पण नाय.. तिका काय बोलाक पण नाय.. मारूचा लांबच र्‍हवला. एकवेळ मी बैलांका नाय नाय ता बोल्लंय आसान पण लाली म्हशीक चुकान एका शब्दान बोलाक नाय. खय गेली आसात?’ संतो मनातल्या मनात बोलत हूतो.

‘संत्या तुझी म्हस नक्कीच किडनॅप झाली आसतली.’ डिगलो व्हाळातना जाताना म्हणालो.

‘कायव बोलतंस.. अरे पोरा किडनॅप होतंत. म्हशी नाय.’ सतल्यान आपला ज्ञान पाजळल्यान.

‘कायवं हा.’

‘पोरांका इंग्रजीत काय म्हणतंत?’

‘किडस असा कायतरी म्हणतंत.’

‘मगे शब्दातच उत्तार आसा मरे.. पोराच किडनॅप होतंत.’

‘होय रे..’ सतल्यान मान हलवल्यान.

‘काय मेल्यानू तर्क करतास…’ संतो परत दोघांवर चिडलो.

तेंच्यावांगडा लाली म्हशीक सोदूक इलेले कालेजात शिकणारे प्वार हसान हसान खळवाटले.

त्या पाच जणानी रातभर लाली म्हशीक सोदल्यानी. डिगल्याच्या म्हणण्यानुसार लाली म्हशीन आत्महत्या केल्यान आसात म्हणान.. गावतल्यो सगळ्यो बावडेंमधी वाकान बघल्यानी. नदीच्या कोंडीवर जावन इले. अकेरेक फाटपटी घराक येवन टकली टेकल्यानी.

संत्याक तेच्या बायलेन काय झोपाक देवक नाय. म्हशीबद्दल इचारून तेचे कान खाल्ल्यान. डेअरीवर दोन येळचा दूध जावक नाय हूता. नाय म्हटला तरी वीस लिटरचो फाडो पडलो हूतो . त्यावरना संत्याची बायल संत्याक बडबडत हूती.

‘तुमका एक साधी म्हस सांभाळूक येयत नाय,’ संत्याची बायल.

‘एक कशी?’ असा तिच्याकडे बघीत म्हटल्यावर संत्याची बायल आजूनच चिडली.

संत्याचो बारको झील दूधासाठी रडा हूतो. संत्याची आवस फुटी चाय पिवची लागता म्हणान पिरपिरत हूती. एकंदरीत लाली म्हस हरवल्यामुळा संत्याचा चक्रच बिघडान गेला हूता. संत्यान पाय मोकळे करूक म्हणान सोडलेल्या संत्याच्या लाली म्हशीन आपले पाय बरेच मोकळे केल्यान हूते.

हकडे त्याच दिवशी घाटावरचो चांगदेव आपल्या नवीन बांधलेल्या घराकडे निघालो. रस्त्यावर कांदे बटाटे इकून तेना कोकणात जागा घीतल्यान हूती.. थयसर टुमदार घरदूकू बांधल्यान. गावातले लॉक आपले वयवरना बघून बघून जायचे. घर बांधल्यान ता दिसला पण तेना कसा बांधल्यान तो लॉक इचार करीत नाय हूते. चांगदेवान चांगला दुमजली घर बांधल्यान हूता.

आपली चारचाकी गाडी कंपाउंडमधी लावन तो घरात शिरलो. पाठोपाठ तेची बायल शिरली. थोड्या वेळान ती केकटत भायर इली.

‘वराडायला काय झालसा?’ चांगदेव बायकोवर खेकासलो.

‘आव निजायच्या खोलीत कोणतरी हाय..’

‘कोण आसणार… बघू,’ असा म्हणान चांगदेव बेडरूमकडे धावलो.

हातात दांडो घेवन तेना लायट लावल्यान थयसर बघता तर नया कोऱ्या बेडवर संत्याची लाली म्हस बसान रवांथ करीत हूती.

चांगदेवाक आणि तेच्या बायलेक बघून लालील दात काढल्यान. असा चांगदेवाच्या झिलाक वाटला.

‘आवं बाबा, म्हस बघा हसतीया.’ झील पण दात काढून म्हणालो.

‘एशी पण चालू हायसा’ बायको असा बोलल्यावर चांगदेव आजूनच चिडलो पण तो कायपण बोलाच्या मनःस्थितीत नाय हूतो. म्हशीन खोलीभर बुळकान ठेवल्यान हूता.

बेडरूमचो एशी चालू कसो र्‍हवलो हेचो इचार करताना लक्षात इला की. कल एशी बसवताना लायट गेली हूती. ती बसवून झाली तरी येवक नाय हूती. एशी म्याक्यानिक बाबू कंटाळान निघान गेलो पण एशीचा बटान बंद करूक इसारलो.

चांगदेव आणि कुटूमातली सगळीजणा म्हशीक  हाकीत हूती तरी म्हस जाग्यावरना हलत नाय हूती. चांगदेवान जावन बेडरूमातना भायर पडणारा दार उघडल्यान आणि म्हशीक हाकूक लागलो तरी म्हस जावक मागना. लय येळ प्रयत्न करून पण म्हस जागची हलना. अकेरेक चांगदेवान गाव गोळा केल्यान. संत्याकडे निरोप धाडल्यानी.संत्याची लाली म्हस मारकुटी हूती ती उभ्या गावाक म्हायती. म्हस बेडरूमात गेली कशी हेच्यावर चर्चा रंगली.

‘अवो चांगदेव राव.. मी काय म्हणतंय म्हस घरात गेली कशी ताच आमका कळत नाया.’ पक्यान त्वांड उघडल्यान.

‘मला बी काय समजना झालंया,’ चांगदेव.

‘म्हणजे काय?’ कोणतरी बोलला.

‘म्हणजे काय नाय ..हयता पत्र्यापेंडीचा पोता बघ दाराकडे ठेवला हा. तेच्या वासाक ती भुतूर गेली,’ पको म्हणालो.

‘आणि म्हशीन दार लावन घीतल्यान. काय मेल्या सकाळ पासना कोण गावाक  नाय काय तुका?’ खालच्या आवाटातले नाना म्हणाले.

‘आवं ते दार मीच लावलं..काल सांचेला,’ चांगदेव.

‘तेवा भुतूर म्हस दिसाक नाय काय?’ पको.

‘नाय ना.. दार थोडं आड हूतं. काळोख पडला हूता. लाईट बी नाय हूती. मला बी लय घाई हूती.  म्हनून पटकन दार लावनश्यान निघालू.’

‘कर्म.. तुमी दार लावूनश्यान गेलास आणि भुतूर म्हशीन श्यान वाढून ठेवल्यान. आणि पत्री पेंड  अर्धी अधिक करून पलंगावर चढान बसली,’ नाना असा म्हणान हसाक लागले.

‘बाकी पलंगतोड काम म्हशीचा,’ पको म्हणालो. असा बोलल्यावर सगळेच खळवाटले.

इतक्यात थयसर संतो इलो.. संत्याचो आवाज आयकान नाय म्हणाक म्हस जाग्यावरना उठान उभी र्‍हवली. पलंग करकरलो. हकडे चांगदेवाचो जीव हळहळलो. गाववाल्यानी सगळा कसा झाला ता संत्याक सांगल्यांनी. तेका आपली म्हस सुखरूप आसा ह्या बघून बरा वाटला.

‘लाली खाली उतार बघू पयला.’ संतो म्हशीच्या गळ्याखाली खाजवीत म्हणालो.  संत्याक पण गार एशीत बरा वाटला. संत्याच्या पाठोपाठ एशीची हवा खावक चार पाच आजून खोलयेत घुसले आणि भितीक लिपान र्‍हवले.

‘म्हशीन कोतळो काढल्यान तर माका सांगा नुको.’ संतो ओराडलो तशे सगळे भायर झाले.

संत्यान लाली बाबापुता करून बघल्यान पण म्हस हलना. बरा तेना म्हशीवर कधी काठी उगारूक नाय हूती. अकेरेक तेना चांगदेवाक मेन स्वीच बंद करूक सांगल्यान आणि पत्रे पेंडीचो गोण भायर घेवक सांगल्यान. तेवा खय लाली मुरडत  खोलयेतना भायर पडली. पत्रे पेंडीच्या गोणाचो मालक बाबू ( एशी म्याक्यानिक ) थयसर इलो. मनातल्या मनात लालीक गाळी घातल्यान. उघडपणे बोलू शकत नाय हूतो. टेंपोचा भाडा वाचवूसाठी म्हणान चांगदेवाच्या एशी वांगडा हाडलेला पत्रे पेंडीचा पोता तेना चांगदेवाच्या खोलयेत ठेवल्यान थयच घात झालो. म्हशीन ता खाली केल्यान  आणि बुळकान ठेवल्यान हूता.

चांगदेवाच्या बायकोन म्हस बुळाकलेला शान काढूक सपशेल नाय म्हटल्यान. अकेरेक टप घेवन चांगदेव ओणावलो.  नाय म्हणाक गावातल्या टारगट पोरांनी चांगदेवाचे श्यान भरतानाचे चार फोटू काढून व्हाट्सएपवर टाकल्यानी.. आणि क्यापशन लिवल्यानी. ‘कोणाच्यो म्हशी,  कोणाक उठाबशी.. आणि चालू ह्ऱवली एशी..’

नितीन राणे

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..