सद्यस्थितीत बाजारात ना कपड्यांची कमतरता आहे, ना रंगांची उधळण कुठेही कमी आहे. पण रंगाचा बेरंग होण्याचे प्रसंग वेळोवेळी घडतात. असे का होते? याचे उत्तर शोधायचे तर कापड किंवा सूत रंगवण्याची प्रक्रिया समजावून घ्यावी लागेल. तंतूंच्या रचनेवर कोणत्या रंगाचा प्रभाव उपयुक्त ठरेल हे अवलंबून असते. द्रावणाशी असलेले नैसर्गिक बंध तोडून तंतूंकडे आकर्षित होण्याची शक्ती रंगांत असल्याशिवाय तंतू रंगू शकत नाहीत. हे नैसर्गिक बंधन तोडायची शक्ती असायला रंगाच्या अणुगटाची रचना काही विशिष्ट प्रकारची असावी लागते.
सुती तंतूंसाठी तसेच कापडासाठी थेट रंग वापरायची पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे. हे सर्व रंग नैसर्गिक रंग होते. पण जसजशी लोकसंख्या वाढली आणि कापडाची गरज वाढली त्यामुळे नैसर्गिक रंग कमी पडू लागले. मग कृत्रिम रंगांकडे वळावे लागले.
त्यामध्ये तीन-चार प्रकारांनी रंगाइ ची प्रक्रिया केली जाते. त्या सर्व प्रकारात रंगांचा टिकाउपणा, म्हणजेच रंग फिका न होता तसेच टिकून राहतील यादृष्टीने वेगवेगळया पध्दती वापरल्या जातात. त्यामध्ये भिन्न-भिन्न रसायनांचा वापर होतो. या रसायनांची शुध्दता चोख होती म्हणून त्यावेळी कापडाचा रंग जायचे प्रकार होत नसत. तसेच रासायनिक प्रक्रियासुध्दा काटेकोरपणे केली जात असे.
कालांतराने रंगांकरिता वापरल्या जाणाऱ्या रसायनांमध्येसुध्दा भेसळ केली जाउ लागली. त्याबरोबर अशी भेसळयुक्त रसायने वापरुन रंगवलेले कापड बाजारात येउ लागले आणि त्याचा रंग जाउ लागला.
आता जवळपास सर्वच मोठ्या दुकानाच्या कॅशमेमोमध्ये ‘आम्ही रंगांची कोणतीही हमी देत नाही’ अशी ओळ बारिक अक्षरात छापलेली असते. म्हणजेच दुकानदारही रंग जाण्याची जबाबदारी घेत नाहीत. यावर उपाय म्हणूनच तंतूंबरोबर रासायनिकदृष्टया प्रक्रिया होणारे रंग वापरले जाउ लागले. त्यामुळे किंमती वाढल्या तरी रंगांच्या टिकाउपणाला महत्व देत जनतेने त्याचा स्वीकार केला. अन्यथा कमी किंमतीचे गडद रंगाचे कापड घेतले तर त्याचा रंग कालांतराने फिका होणार हे लोकांनी स्वीकारले.
दिलीप हेर्लेकर
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply