नवीन लेखन...

झोप का हवी

(झोप हा फार गहन विषय आहे. झोपेसंबंधीच्या फक्त येथे आवश्यक असलेल्या संकल्पनांचा उल्लेख केला आहे.)

माणसाने मनुष्य देहाचा अभ्यास करून वैद्यकशास्त्र विकसित केले. त्यात अनेक उपशाखा निर्माण होत गेल्या. मेंदू हा आपल्या शरीराचा एक अवयव आहे. त्या मेंदूचा अभ्यास काही दशकांपूर्वी सुरू झाला, इतर शाखांच्या तुलनेत तो बाल्यावस्थेत आहे. साहजिकच त्याविषयीचे गूढ कायम आहे. प्रत्येक उत्तरागणिक प्रश्न वाढत आहेत. शरीराला विश्रांती मिळावी म्हणून आपण झोपतो असा आपला समज काही अंशी खरा आहे. झोप ही मेंदूशी जास्त संबंधित आहे. दिवसाचा एकतृतियांश काळ आपली झोप व्यापत असते. हेच आयुष्याचेही सूत्र आहे. आपण का झोपतो हे अजून आपल्याला कळलेले नाही. पण झोप यायला हवी हे नक्की.

झोपलेल्या माणसाच्या शरीराची बाह्य स्थिती पाहून झोपेचा थोडाफार अंदाज येतो व वाटते की या माणसाला विश्रांती मिळत असेल. पण झोपेत असतानादेखील त्याच्या शरीरात अनेक क्रिया घडत असतात व त्या अनैच्छिक असतात. या अनैच्छिक क्रियांचे केंद्र छोट्या मेंदूत असते व त्याचे काम झोपेत सुरू असते. पण मोठा मेंदू झोपेत विश्रांती घेत असतो का? नाही. मग त्याचे काय उद्योग चालू असतात? तो कामात प्रचंड व्यस्त असतो हे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे समजले आहे. आपल्या झोपेची आवर्तने असतात. त्यात REM निद्रा ही एक अवस्था असते. ही अवस्था शांत झोपेची असते. पण प्रत्यक्षात याच झोपेच्या काळात डोळ्यांची बुबुळे अतिशय वेगाने फिरत असतात. अशी चंचल स्थिती असूनही याला शांत झोप म्हणायचे? आहेत ना गोंधळात टाकणारी निरीक्षणे व निष्कर्ष. एखाद्याने जर सकाळी उठून सांगितले, ‘मला काल रात्री खुप छान झोप लागली. मी ताजा तवाना झालो आहे. मला विश्रांती मिळाली.’ तर ते वरकरणी खरे असू शकते. प्रत्यक्षात खुप उलथापालथ झालेली असते मेंदूत. मेंदूत घडणार्‍या या घडामोडी आवश्यक असतात आणि जागेपणी त्या होऊ शकत नाहीत. म्हणून झोप यायला हवी.

प्राणघातक आनुवंशिक निद्रानाश (Fatal Familial Insomnia)  या मानवी आनुवंशिक रोगाची लागण जगातील केवळ 20 कुटुंबांना झालेली आहे. या कुटुंबातील सदस्यांची झोप अचानक उडते व त्यांना नंतर कधीच झोपता येत नाही. मध्यम वयानंतर त्यांच्यात ताप, थरथर, स्नायूंचे अनियंत्रित झटके, नैराश्य वाढू लागते. प्रौढत्वानंतर ते मनोरुग्ण बनतात, कोमामधे जातात व मरण पावतात. हा विकार दुर्मिळ आहे हे सुदैवच नाही का? म्हणून झोप यायला हवी.

‘झोप आवश्यक आहे’ हे निर्विवाद सत्य आहे. कमीत कमी किती काळ झोप हवी याविषयी मतभेद असू शकतात. ‘एखादी व्यक्ती किती काळ झोपेशिवाय राहू शकते’ हे वैयक्तिक पातळीवर सांगता येईल. याला नियम नाही. आपल्याला झोप मिळत नाही तेव्हा फार वाईट गोष्टी घडतात. रॅंडी गार्डनर या 17 वर्षाच्या युवकाने ‘सलग न झोपण्याचा’ 11 दिवसांचा जागतिक रेकॉर्ड करण्याचे ठरविले. विल्यम डेमेंट या शास्त्रज्ञाला रॅंडीच्या झोपरहित अवस्थेचा अभ्यास करण्याची परवानगी मिळाली. हा प्रयोग सुरू झाल्यावर 5 दिवसांनी रँडीमध्ये अल्झायमरसारखी लक्षणे दिसू लागली होती. तो खूप गोंधळला होता. त्याच्या मनात खुप बदल घडले होते. तो चिडचिडा, विसरभोळा झाला होता. त्याला मळमळत होते, प्रचंड थकवा आला होता. हे अपेक्षितच होते. अखेरच्या चार दिवसात तो आपले मोटर फंक्शन गमावून बसला, त्याची बोटे थरथरू लागली आणि बोबडी वळू लागली. डेमेंटने निद्रा आवर्तनाच्या अनेक पैलूंचा अभ्यास केला. ‘निद्रिस्त मेंदू भीषण अशा जैविक संघर्षात व्यग्र असतो’ हे तथ्य डेमेंटने प्रकाशात आणले. दोन सैन्यांमधील लढाई असे याचे वर्णन करता येईल. ही आहेत न्यूरॉन्स, हार्मोन्स व रसायनांपासून बनलेली दोन सैन्ये. 1) Circadian Arousal System – प्रोसेस C. हे सैन्य त्यांच्या अधिकारात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा वापर करून तुम्हाला जागे ठेवते. यांनी ठरविले तर ते तुम्हाला अष्टौप्रहर जागेच ठेवतील. 2) Homeostatic Sleep Drive – प्रोसेस S. हे लढवय्ये त्यांच्या नियंत्रणातील प्रत्येक शक्तीचा वापर करून तुम्हाला झोपविण्याचा प्रयत्न करतात. जर या सैन्याला हवे तसे करता आले तर तुम्ही झोपी गेल्यावर पुन्हा कधीच जागे होणार नाहीत. प्रोसेस C व प्रोसेस S या दोन सैन्यांमधील हे युध्द आहे, पण ते विचित्र आहे. विरोधाभासी नियम पाळत दोन्ही सैन्ये हे युध्द खेळतात. कसे ते पहा. तुम्ही जेवढे जास्त जागे रहाल तेवढी प्रोसेस C ची विरोधी शक्तीकडून हार मानण्याची शक्यता वाढते. मग तुम्ही झोपी जाता. ही शरणागतीची स्थिती बहुतेक लोकांमध्ये 16 तासांच्या जागेपणानंतर येते. या उलट, तुम्ही जेवढा जास्त वेळ झोपाल तेवढी प्रोसेस S विरोधी पक्षाकडून हार मानण्याची शक्यता वाढते. ही शरणागतीची स्थिती बहुतेक लोकांमध्ये 8 तासांच्या झोपेनंतर येते. या दोन्ही क्रिया अशाच आलटून पालटून घडतात. डेमेंटचे रशियन गुरू क्लेटमन यांनी 1938 मध्ये केंटकीत जमिनीखाली 150 फुटावरील गुहेत एक महिना राहण्याचा प्रयोग करण्याचे ठरविले. त्यांचा एक सहकारीही तयार झाला. सूर्यप्रकाश व दैनंदिन दिनचर्या यांच्या अनुपस्थितीत जागृतावस्था व निद्रावस्था यांची आवर्तने चालू राहतात का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न होता. आपल्या शरीरात खरोखरच अशी स्वयंचलित यंत्रणा असते असे त्यांच्या लक्षात आले. मेंदूतील हायपोथलॅमस मधील सुप्रक्रायस्मॅटिक न्यूक्लियसमध्ये हे समय यंत्र असते. मेंदूतील हे सूप्त भाग आपली जागृतावस्था व निद्रावस्था यांची लयबध्द आवर्तने नियंत्रित करीत असतात. हे नैसर्गिक चक्र सुरळित चालले पाहिजे. म्हणून झोप यायला हवी.

झोपेचे प्रिस्क्रिप्शन घेण्याची वेळ येऊ नये

झोपेची एक निराळी तर्‍हा म्हणजे डुलकी. मोठी झोप ही रात्रीच्या काळात होते तर डुलकी ही मध्यान्हीनंतरच्या काळात येणारी तात्पुरती झोप असते. हा सुध्दा निसर्गाचा नियम आहे. या कालावधीत कोणतीही गोष्ट नीट करणे अशक्य असते. याचा भरपूर जेवणाशी काहीही संबंध नाही. प्रोसेस C व प्रोसेस S यांच्यात काही वेळ ही ‘समान तणावाची’ असते असे आलेखावरून शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. ही डुलकीची वेळ असावी असा अंदाज आहे, कारण या कालावधीत आपला मेंदू नीट काम करीत नाही. एखाद्या वक्त्याला विचारा दुपारी भाषण देणे हे किती महत्प्रयासाचे काम आहे ते. दिवसातील इतर कोणत्याही वेळेपेक्षा या काळात वाहतुक अपघात जास्त होतात. नासाने वैमानिकांवर संशोधन केल्यावर त्यांना आढळले की, 26 मिनिटांच्या डुलकीनंतर वैमानिकाची कार्यक्षमता 34 टक्क्यांनी वाढते. नुसत्या डुलकीचे इतके फायदे असतील तर रात्रीच्या संपूर्ण झोपेचे किती तरी फायदे असतील. डुलकी छोटीशी असली तरी मेंदूची ती गरज आहे. त्यामुळे झोप ही यायलाच हवी.

झोपेत समस्या सुटल्याचे अनेक दाखले आहेत. मेडेलिव्ह या शास्त्रज्ञाला डुलकीनंतर आवर्तसारणीची (Periodic Table) रचना स्पष्ट झाली. केक्युलला स्वप्न पडले ज्यात एक साप स्वतःचीच शेपटी तोंडात पकडत असताना दिसला. यावरून त्याला कार्बन रिंगची कल्पना सुचली. जागेपणी न सुटलेले कोडे झोपेत सुटण्याची शक्यता असते. निद्रा ही आपली सखी आहे वैरीण नाही. कारण निद्रेचा नाश म्हणजे बुध्दीचा र्‍हास. आपल्या अनेक पैलूंवर निद्रानाशाचा विपरित परिणाम होतो जसे की एकाग्रता, कार्यक्षमता, कामाशी संबंधित स्मरण, अल्पकालीन स्मृती, तर्कसंगत विचारसरणी, आकडेमोड वगैरें. निद्रेचा शिकण्याशी खुप जवळचा संबंध आहे हे विद्यार्थ्यांवरील प्रयोगातून समजून आले आहे. आपला मेंदू दिवसातील शिकण्याच्या अनुभवांची उजळणी रात्री करतो, त्याची पुनरावृत्ती करतो. हे ‘मंद वलय निद्रे’च्या काळात घडते. पण भावनाप्रधान घटनांची व  आठवणींची  उजळणी झोपेच्या वेगळ्या खंडात होते. यासाठी मुलांच्या मेंदूच्या विकासात झोपेचा वाटा महत्वाचा असतो हे विसरून चालणार नाही. तेव्हा मुलांना चांगल्या झोपेची सवय लागणे आवश्यक आहे. बालवयात व पुढेही याचे फायदेच दिसून येतील. शास्त्रज्ञांना झोपेचे प्रयोजन यथावकाश समजेल. मला झोपेची गरज पटली आहे आणि मला चांगली झोप लागते हे माझे भाग्य आहे.

— रविंद्रनाथ गांगल

संदर्भः ‘Brain Rules’ by John Medina

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..